Thursday, 25 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 25.07.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२५ जूलै २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राज्यात अनेक ठिकाणी आज मुसळधार पाऊस सुरु आहे. पुणे शहरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं असून, अग्निशमन दलाच्या जवानांच्या सहकार्यानं नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातही रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूरस्थिती निर्माण झाली आहे. ६५ मार्ग आणि ८१ बंधाऱ्यांवर पुराचं पाणी आल्यानं निम्म्या कोल्हापूर जिल्ह्यातली वाहतूक ठप्प झाली आहे.

****

दरम्यान, मुंबई, पुणे, ठाणे शहरांसह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयात आपत्कालीन नियंत्रण कक्षात भेट देऊन आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांना परस्पर समन्वय ठेवून बचत आणि मदतकार्य करण्याचे निर्देश पवार यांनी यावेळी दिले.

****

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं आज वसई इथं निधन झालं, ते ८२ वर्षांचे होते. दिब्रिटो यांची आनंदाचे अंतरंग, ओॲसिसच्या शोधात, तेजाची पावले, सृजना मोहोर, आदी पुस्तकं प्रसिद्ध आहेत. हरित वसई संरक्षण समितीच्या माध्यमातून फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली होती. आज सायंकाळी सहा वाजता वसईत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याच्या समाजमाध्यमांवरच्या बातम्या खोट्या असल्याचं केंद्रीय निडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जातील, असं आयोगाकडून सांगण्यात आलं.

****


महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण मंडळात येणाऱ्या वीजग्राहकांसाठी सगळ्या उपविभाग कार्यालयांमध्ये आज वीजबिल दुरुस्ती मेळावा घेण्यात येत आहे. वीजबिलासंबंधी तक्रार असणाऱ्या ग्राहकांनी आपलं वीजबिल सोबत घेऊन संबधित उपविभागीय कार्यालयाशी दुपारी तीन वाजेपर्यंत संपर्क साधावा, असं आवाहन महावितरणनं केलं आहे.

****

No comments: