Tuesday, 27 August 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 27.08.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 27 August 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २७ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

वैद्यकीय व्यावसायिकांची सुरक्षा तसंच कामाच्या ठिकाणची परिस्थिती याबाबत शिफारशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या राष्ट्रीय कृती दलाची पहिली बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. या बैठकीचे अध्यक्ष केंद्र सरकारचे कॅबिनेट सचिव असतील. दलाच्या इतर सदस्यांमध्ये केंद्रीय गृह सचिव, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष, सर्जन व्हाईस ॲडमिरल आर. सरीन, एम्सचे संचालक डॉ. एम. श्रीनिवास आणि एम्सच्या न्यूरोलॉजी विभागाचे माजी प्राध्यापक डॉ. पद्मा श्रीवास्तव यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयानं कोलकाता इथल्या आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी करताना वैद्यकीय व्यावसायिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय कृती दलाची स्थापना केली होती. सर्वोच्च न्यायालयानं या कृती दलाला तीन आठवड्यात अंतरिम अहवाल आणि दोन महिन्यांत अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

****

राज्यात आज दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे. राज्यभरात सर्वत्र सार्वजनिक मंडळांद्वारे आयोजित दहिहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकं सज्ज आहेत. मुंबई शहर तसंच उपनगरांमध्ये दहिहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. ठिकठिकाणी मानाच्या दहिहंड्या बांधण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहिहंडी उत्सव साजरा होत असल्यामुळे मुंबईत राजकीय पक्षही यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. त्यांनीही भरघोस बक्षीसं ठेवून दहिहंडी उत्सवाचं आयोजन केलं आहे. महिलांची गोविंदा पथकंही या उत्सवात सक्रीय आहेत. मागाठाणे इथं शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सूर्वे यांची दहिहंडी लक्षवेधी ठरणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. मुंबईत अनेक ठिकाणच्या दहिहंडी उत्सवात सेलिब्रिटी देखील सहभागी होणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर इथं कोकणवाडी चौक, गुलमंडी, कॅनॉट प्लेस, टी व्ही सेंटर, गजानन महाराज मंदिर चौक, निराला बाजार या ठिकाणी दहिहंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे आज दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत या मर्गावरची वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.

****

नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिव देहावर आज नांदेड जिल्ह्यात नायगाव इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होत आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून हैदराबाद इथं उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, काल पहाटे त्यांचं निधन झालं. चव्हाण यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त होत आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी, चव्हाण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत, त्यांचं निधन हे काँग्रेस परिवारासाठी कधीही भरून न येणारं नुकसान असल्याचं म्हटलं आहे.

****

राज्यात अनेक भागात मुसळधार पावसामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरली असल्याने, पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे, त्यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीवरील ४२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे आज सकाळी ११ वाजता कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे दोन्ही संच सुरू करण्यात आले असून, दोन हजार शंभर घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणी साठा ५६ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणात सध्या अहमदनगर तसंच नाशिक जिल्ह्यातल्या पाणलोट क्षेत्रातून ८४ हजार ४४६ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक होत आहे.

****

येत्या दोन दिवसात, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी विदर्भात अनेक ठिकाणी, तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

****

अमेरीकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा टेनिसपटू सुमित नागल याचं आव्हान संपुष्टात आलं आहे.  न्यूयॉर्क इथं सुरू असलेल्या या स्पर्धेत नेदरलॅँडचा खेळाडू टॅलोन ग्रीकस्पूर याच्याकडून सुमीतचा १-६, ३-६, ६-७ असा पराभव झाला. या स्पर्धेत भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना, युकी भांब्री आणि एन श्रीराम बालाजी यांचे दुहेरीतले सामने व्हायचे आहेत.

****

No comments: