Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 28 August 2024
Time: 01.00 to
01.05 PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
आसामच्या नऊ लाख पस्तीस हजारहून अधिक लोकांची आधारपत्रं
देण्याला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. २०१९ च्या फेब्रुवारी ते ऑगस्टदरम्यान एनआरसी
अर्थात नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिपशी संबंधित बायोमेट्रिक प्रक्रियेतल्या काही बाबींमुळे
या आधारपत्रांची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. यासंदर्भात आसामचे मुख्यमंत्री हेमंत
बिश्वशर्मा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शह यांची भेट घेतली होती. या लोकांना येत्या
पंधरा ते तीस दिवसात आपली आधारपत्रं मिळणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
वक्फ दुरुस्ती विधेयक, २०२४ साठी सामान्य नागरिक, विविध स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ, इतर भागधारक आणि संबंधित संस्थांकडून मतं आणि सूचना मागवण्यात
आल्या आहेत. खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालच्या संसदेच्या संयुक्त समितीनं
या सूचना मागवल्या आहेत. यासंदर्भातली जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या १५ दिवसांत संबंधितांनी
आपली मतं मांडावीत, असं या निवेदनात म्हटलं
आहे.
****
भारतीय पोलीस सेवेतले वरिष्ठ अधिकारी बी.श्रीनिवासन यांची
राष्ट्रीय सुरक्षा रक्षक महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.श्रीनिवासन हे १९९२
च्या तुकडीचे भारतीय पोलिससेवा बिहार केडरचे अधिकारी आहेत.
****
दिल्लीच्या कथित मद्यधोरण घोटाळ्याशी संबंधित सीबीआयच्या
एका प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी तीन सप्टेंबरपर्यंत
वाढवण्यात आली आहे. दिल्लीच्या राउज अव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश कावेरी
बाबेजा यांच्यासमोर दूरदृष्यप्रणालीद्वारे केजरीवाल यांना हजर करून घेण्यात आलेल्या
सुनावणीत न्यायालयानं हा निर्णय दिला.
****
प्रधानमंत्री जनधन योजनेला आज एक दशक पूर्ण झालं. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी २८ ऑगस्ट २०१४ रोजी ही योजना सुरु केली होती. या योजनेच्या माध्यमातून
उपेक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आधार देण्याचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय
अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत देशभरात आतापर्यंत
५३ कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत.
****
केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात 'एकीकृत निवृत्तिवेतन योजना' -युनिफाईड पेन्शन स्कीम जशीच्या तशी लागू करण्यासाठी येणाऱ्या
अतिरिक्त खर्चास वित्त विभागानं मान्यता दिली आहे. या योजनेची मार्गदर्शक तत्त्वं महाराष्ट्रात
लागू करण्यासाठी "वित्त विभागाला” प्राधिकृत करण्यात येत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मुंबईत जे जे हॉस्पिटलमध्ये आज अत्याधुनिक अँटीमायक्रोबायोल
इमर्जन्सी वॉर्ड, अर्थात सूक्ष्मजीव प्रतिरोधक
कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं. इस्रायलचे निवासी परराष्ट्र व्यवहार महासंचालक कर्नल
याकोव्ह ब्लिटश्टाइन यांच्या हस्ते या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. या कक्षाला आधुनिक
प्रतिजैविक ॲक्रेलिक रंग देण्यात आला आहे. या रंगामुळे ९९ पूर्णांक ९९ टक्के जिवाणू
आणि विषाणूंवर नियंत्रण मिळवता येतं, यामुळे रुग्णांची सुरक्षा आणि संसर्ग नियंत्रणात मोठी मदत होते, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मालवणमध्ये राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
कोसळल्याच्या निषेधार्थ आज मालवण बंदची हाक देण्यात आली आहे. महाविकास आघाडीतर्फे आणि
शिवप्रेमी नागरिकांतर्फे मालवणमध्ये मोर्चा काढण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या अपर तहसील कार्यालयाने आज शहरानजिक
मौजे देवळाई परिसरात गौण खनिजाचं अनधिकृत उत्खनन आणि वाहतुक करणारी अकरा वाहनं जप्त
केली. अप्पर तहसीलदार नितीन गर्जे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या
वाहनांमध्ये ५ पोकलेन आणि ६ हायवा ट्रकचा समावेश असून, ही सर्व वाहनं तहसील कार्यालय परिसरात जमा करण्यात आली आहेत.
****
नाशिक शहरासह उपगरात रात्रभर पावसाचा जोर कायम होता, तर पहाटे मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गोदावरीची पाण्याची
पातळी आणखी वाढली आहे. जिल्ह्यातल्या सर्वच धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी
धरणाची पाणी पातळी साडे ६४ टक्क्यांवर पोहोचली आहे. धरणात सध्या ६६ हजार ६६६ घनफूट
प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.
धाराशिव जिल्ह्यातलं तेरणा धरण पूर्ण भरलं आहे. यामुळे
परिसरातल्या विहिरी आणि कूपनलिकेच्या पाणी पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांना बागायती शेती
करण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, गुजरात मध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या
मुंबई हून गुजरात कडे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात भारताचा भालाफेकपटू सुमित अंतिल आणि गोळाफेकपटू भाग्यश्री
जाधव हे भारताचे ध्वजवाहक असतील. या स्पर्धेत ८४ भारतीय क्रिडापटू सहभागी झाले आहेत.
****
No comments:
Post a Comment