Saturday, 31 August 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.08.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 31 August 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      महिलांच्या सुरक्षेसाठीचे कायदे आणखी सक्रीय करण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त

·      मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ

·      नाशिक ते डहाणू नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी रेल्वे मंत्रालयाकडून निधी मंजूर

आणि

·      पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच कायम

****

महिलांच्या सुरक्षेसाठीचे कायदे आणखी सक्रीय करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. आज नवी दिल्लीत जिल्हास्तरीय न्यायपालिकेच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्‌घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त आयोजित या परिषदेत एका नाण्याचं तसंच टपाल तिकिटाचंही पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाचा ७५ वर्षांचा प्रवास लोकशाहीची जननी म्हणून भारताचा गौरव वृद्धिंगत करतो, असे गौरवोद्‌गार पंतप्रधानांनी काढले. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी आपल्या संबोधनात या परिषदेमुळे जिल्हास्तरीय न्यायपालिका आणि इतरांमध्ये संवादाला वाव मिळेल, असं मत व्यक्त केलं. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी, ई-न्यायालय उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी ७ हजार २०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली. महान्यायवादी आर. वेंकटरमणी, सर्वोच्च न्यायालयाच्या बार कौन्सिलचे अध्यक्ष कपिल सिबल, आदींनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला.

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून प्रारंभ झाला. आज नागपूर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या टप्प्याचा शुभारंभ केला. केंद्रीय रस्ते मार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या योजनेत लाभार्थी बहिणींची संख्या एक कोटी साठ लाखापर्यंत पोहोचली असून, ही संख्या अडीच कोटी पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, ही संख्या तीन कोटीपर्यंत पोहोचली तरी बहिणींना मदत देण्यासाठी त्यांचे भाऊ सक्षम असल्याचं, शिंदे यांनी सांगितलं.

या योजनेच्या पहिल्या टप्प्यात एक कोटी सात लाख बहिणींच्या बँक खात्यात तीन हजार २२५ कोटी रुपये तर दुसऱ्या टप्प्यात ५२ लाख लाभार्थी बहिणींच्या बँक खात्यात एक हजार ५६२ कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

****

नाशिक ते डहाणू या १०० किलोमीटरच्या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी एकूण दोन कोटी ५० लाख रुपयांचा निधी खर्च करायला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आणि नाशिकमधल्या पंचवटी इथं दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांना रेल्वेसेवा उपलब्ध करून देत, पर्यटनाला चालना देण्यासाठी हा नवीन रेल्वे मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे नाशिक आणि पालघर जिल्ह्यातली अनेक शहरं जोडली जातील तसंच या प्रदेशातल्या आर्थिक वाढ आणि विकासाला चालना मिळेल.

****

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वांद्रे पश्चिम इथल्या नॅशनल लायब्ररीमध्ये डिजिटल नॉलेज सेंटर सुरू करण्यात आलं आहे. आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते आज त्याचं लोकार्पण करण्यात आलं. या सेंटरच्या माध्यमातून सुमारे पाच हजार डिजिटल पुस्तकं, मासिकं यासह विद्यार्थ्‍यांना स्‍पर्धा परीक्षांसाठी आवश्यक वाचन साहित्‍य डिजिटल स्‍वरुपात उपलब्‍ध करुन देण्‍यात आलं आहे.

****

कृषी क्षेत्रातील उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी तरुणांनी नवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची १२४ वी जयंती तसंच शेतकरी दिनाच्या अनुषंगानं आज अहमदनगर जिल्ह्यात लोणी इथं शिवार फेरी काढण्यात आली तसंच कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं होतं, त्याप्रसंगी ते बोलत होते. शेतकरी जागृत झाला असून, शेतीत जैविक खतांचा वापर वाढत आहे‌, अशा परिस्थितीत नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं. बदलत्या कृषी तंत्रज्ञानाचं बँकाँक इथं प्रशिक्षण घेतलेल्या ३० विद्यार्थ्यांचा यावेळी प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.

****

राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाकडून राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या दुसऱ्या टप्प्याचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम२५ जून ते ३० ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात आला. यानुसार सर्व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयांमध्ये, तसंच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रारुप मतदार यादीपेक्षा अंतिम मतदार यादीमध्ये राज्यात १६ लाख ९८ हजार ३६८ मतदारांची संख्या वाढल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राज्याचं पर्यटन धोरण महाराष्‍ट्राला देशात आघाडीवर नेणारं ठरेल, असा विश्‍वास राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी व्‍यक्‍त केला आहे. आज नागपूर इथं खासदार औद्योगिक महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या पर्यटन धोरण 2024 : ॲडव्हान्टेज विदर्भ कॉन्क्लेव्हच्‍या समारोपीय सत्रात महाजन बोलत होते. केंद्रीय रस्‍ते, परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी होते. गडकरी यांनी यावेळी बोलतांना, पर्यटकांना महाराष्‍ट्रात आकर्षित करण्‍यासाठी अभिनव कल्‍पना राबवण्याचं आवाहन केलं. जंगल सफारीसाठी इलेक्‍ट्रीक गाड्यांमुळे ध्‍वनी तसंच वायू प्रदूषण कमी होतं, त्यामुळे या गाड्यांची संख्या तिपटीने वाढवण्याची सूचना गडकरी यांनी केली.

****

रत्नागिरी शहरातल्या बाळासाहेब ठाकरे तारांगणात उभारण्यात आलेल्या सायन्स गॅलरीचं ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आलं. भारतरत्न डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचं नाव या सायन्स गॅलरीला देण्यात आलं आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विकास आमटे, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चिकित्सक वृत्तीला प्रोत्साहन मिळावं, या दृष्टीने या सायन्स गॅलरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रारूपं उभारण्यात आली आहेत. खगोलशास्त्राची ओळख करून देणारी अ‍ॅस्ट्रॉनॉमी गॅलरीही इथे तयार करण्यात आली आहे

****

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच आजही कायम आहे. महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल एस एच वन प्रकारात रुबीना फ्रान्सिस हिने अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर बॅडमिंटनपटू सुकांत कदम तसंच नितेश कुमार यांनी एकल प्रकारात उपांत्यफेरीत तर महिला एकेरीत मनदीप कौर हिने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. नौकानयनात अनिता आणि के नारायण यांनी अंतिम बफेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान, आज रात्री तीरंदाजी स्पर्धेत शितल देवी सुवर्णपदकासाठी खेळणार आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदकं मिळवली आहेत.

****

धुळे इथं पोलीस प्रशिक्षण केंद्रात ६२५ नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत समारंभ आज साजरा झाला. विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीणकुमार पडवळ यांच्या हस्ते पोलीस प्रशिक्षण या ११ व्या सत्रातल्या विजेत्या प्रशिक्षणार्थ्यीचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. पडवळ यांनी यावेळी केलेल्या मार्गदर्शनात, या नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थ्यांनी पोलीस विभागातील कायद्याचं आणि शिस्तीचं पालन करुन नागरिकांना निष्पक्षपातीपणे न्याय देण्याचं काम करावं, असं आवाहन केलं. या सोहळ्यात प्रमुख अतिथींना मानवंदना, परेड निरीक्षण, ध्वज टोळीचे आगमन, प्रशिक्षणार्थींना शपथ, तसंच दीक्षांत संचलन करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर शहरातल्या गुलमोहर कॉलनी परिसरातील राजीव गांधी स्टेडियम मधल्या बहु उद्देशीय क्रीडा संकुलाचं आज भूमीपूजन झालं. राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार डॉक्टर भागवत कराड, महानगर पालिका आयुक्त तथा मुख्य प्रशासक जी. श्रीकांत यावेळी उपास्थित होते.

****

छत्रपती संभाजीनगर इथं प्रत्येक पानटपरी धारकाला एक कचराकुंडी तसंच धुंकीपात्र पानटपरी जवळ ठेवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या नियमाचं पालन न करणाऱ्या पानटपरी धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. पहिल्या तपासणीत एक हजार रुपये, दुसऱ्या तपासणीत दोन हजार तर तिसऱ्या तपासणीत रुपये तीन हजार दंड वसूल करण्यात येईल, असं उप आयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन प्रमुख रविंद्र जोगदंड यांनी सांगितलं आहे.

****

देशभरात विविध ठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार, तसंच बांगलादेश मधील हिंदू समाजावर होणारे अत्याचार तसंच इतर प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आज बीड इथं सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. गोहत्या बंदी कायदा अंमलबजावणी बाबत ठोस कारवाई करावी अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली.

****

No comments: