Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 28 August
2024
Time: 7.10
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· मुलांना लैंगिक समानतेबद्दल
शिक्षित आणि संवेदनशील करणं आवश्यक, बदलापूर बाललैंगिक अत्याचारप्रकरणी
मुंबई उच्च न्यायालयाचं निरीक्षण
· नागपूर इथल्या अखिल भारतीय
आयुर्विज्ञान संस्थेच्या विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळेला, मंकीपॉक्स चाचणी प्रयोगशाळा म्हणून मान्यता
· आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना
अनुदान लागू करण्याचा शासन आदेश जारी
· राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
जाहीर, राज्यातल्या दोन शिक्षकांचा
समावेश
आणी
· पुढचे दोन दिवस राज्यात बहुतांश
ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार, जायकवाडी धरणाचा पाणीसाठा
६३ टक्क्यांवर
सविस्तर बातम्या
मुलांना
लैंगिक समानतेबद्दल शिक्षित आणि संवेदनशील करणं आवश्यक असल्याचं, मुंबई उच्च न्यायालयानं
म्हटलं आहे. बदलापूर बालिका अत्याचार प्रकरणी न्यायालयानं स्वत:हून दाखल केलेल्या याचिकेवर
काल सुनावणी झाली. अशा घटना घडल्या की आपण पिडीतांबद्दल बोलतो, मात्र मुलींना नाही, तर मुलांना काय योग्य आणि
काय अयोग्य शिकवलं, तसंच त्यांना मुलींचा, महिलांचा आदर करायला शिकवलं तरच अशा घटना टाळता येतील, असं सांगून न्यायालयानं, मुलांची मानसिकता बदलणं
आवश्यक असल्याचं नमूद केलं. अशा कृत्यांना प्रतिबंध घालण्यासाठी काय उपाययोजना करता
येतील, याची
शिफारस करण्याकरता समिती नियुक्त करण्यासाठी काही नावं सुचवण्याची सूचना न्यायमूर्ती
रेवती मोहिते आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या पीठानं केली आहे. मुलांना लिंग
समानतेबाबत जागरुक करण्याचं काम या समितीने करावं, असंही पीठानं सुचवलं आहे.
या
प्रकरणी प्रसारमाध्यमांनीही पोक्सो कायद्याची माहिती घेत संवेदनशीलपणे वृत्तांकन करण्याची
गरज आहे, काही
बातम्यांमध्ये शाळेचं नाव आल्याबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. राज्यात पोक्सो
कायद्यातल्या सर्व तरतुदींचं कठोरपणे पालन केलं जावं, अशी अपेक्षा न्यायालयानं व्यक्त केली आहे.
****
रत्नागिरीत
झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या दोषी व्यक्तीला लवकरात लवकर शोधून काढून कडक
कारवाई करण्याचे निर्देश, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. त्यांनी काल पीडिता
आणि तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना
ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्याची माहितीही सामंत यांनी दिली.
****
महिला
आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना वेदनादायी असून, यातल्या नराधमांना भर चौकात शिक्षा दिली पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या
आमदार पंकजा मुंडे यांनी दिली आहे. काल लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातल्या वलांडी
इथं, आमदार
संभाजी पाटील निलंगेकर यांच्या जन सन्मान पद यात्रेत त्या माध्यमांशी बोलत होत्या.
दरम्यान, महिला अत्याचार प्रकरणांच्या
निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा वकील संघाच्या वतीनं आज मोर्चा काढण्यात येणार
आहे.
****
अखिल
भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्सच्या नागपूर इथल्या विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळेला, मंकीपॉक्स चाचणी प्रयोगशाळा
म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या मान्यतेनुसार, एम्स नागपूर आता महाराष्ट्रातल्या मंकीपॉक्सच्या
संशयित रुग्णांची चाचणी करण्यासाठी अधिकृत केंद्र म्हणून कार्य करेल. देशभरातल्या मंकीपॉक्सच्या
संशयित प्रकरणांची चाचणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या ३५ प्रयोगशाळांपैकी नागपूरची
ही प्रयोगशाळा, महाराष्ट्रात
मंकीपॉक्सच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
****
आशा
स्वयंसेविका तसंच गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास १० लाख
रुपये, आणि
कायमस्वरुपी अंपगत्व आल्यास पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात
आली आहे. या संदर्भातला आदेश राज्य शासनाने जारी केला. एक एप्रिल २०२४ पासून हा निर्णय
लागू होणार असून, यासाठी प्रत्येक वर्षाला एक कोटी पाच लाख रुपये इतका आवर्ती
निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे
उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
****
सिंधुदुर्ग
जिल्ह्यातल्या राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याचं कारण शोधण्यासाठी
आणि पुतळा पुनर्स्थापित करण्यासाठी नौदलाचं एक पथक रवाना करण्यात आलं आहे. नौदलानं
एका निवेदनाद्वारे काल ही माहिती दिली. या संदर्भात राज्य सरकार आणि तज्ज्ञांच्या सहकार्यानं
काम सुरू असल्याचं नौदलानं म्हटलं आहे.
दरम्यान, हा पुतळा कोसळणं हा अपघात
असून, त्या
जागी १०० फूट उंचीचा पुतळा उभारावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री दीपक
केसरकर यांनी म्हटलं आहे. काल राजकोट इथं संबंधित ठिकाणाची पाहणी केल्यानंतर ते बोलत
होते. या ठिकाणी धक्का उभारून सिंधुदुर्गपर्यंत फेरीद्वारे वाहतूक सुरू केली, तर हे स्मारक पर्यटकांसाठी
आकर्षणाचं केंद्र होऊ शकतं, असंही ते म्हणाले. पुतळा कोसळणं हा एक अपघात आहे आणि त्या
दृष्टीनेच सर्वांनी त्याकडे पहावं, या अपघाताची चौकशी शासन करेल, असं आश्वासन केसरकर यांनी
दिलं.
दरम्यान, धाराशिव इथं काल सकल शिवप्रेमींनी
या घटनेचा निषेध करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
****
नेपाळ
बस अपघातातल्या सात जखमींना विमानाने मुंबईत आणण्यात आलं असून, त्यांना उपचारासाठी बॉम्बे
रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दुपारी
या जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.
****
नांदेडचे
खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिव देहावर काल नांदेड जिल्ह्यात नायगाव इथं शासकीय
इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश
महाजन यांनी राज्य सरकारमार्फत पुष्पचक्र अर्पण करत चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी जिल्हा प्रशासनासह सामान्य नागरिकांची मोठी उपस्थिती होती. पोलीस दलानं हवेत
बंदुकीच्या तीन फैरी झाडून दिवंगत खासदार चव्हाण यांना अखेरची सलामी दिली. प्रकृती
अस्वास्थ्यामुळे चव्हाण यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून हैदराबाद इथं उपचार सुरू
होते. उपचारादरम्यान, परवा पहाटे त्यांचं निधन झालं.
****
केंद्रीय
शिक्षण मंत्रालयातर्फे दिले जाणारे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार काल जाहीर झाले. यामध्ये
राज्यातल्या दोन शिक्षकांचा समावेश आहे. कोल्हापूर इथल्या सौ. स. म. लोहिया हायस्कूल
अँड ज्युनिअर कॉलेजमधले कलाशिक्षक सागर बगाडे आणि गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातल्या
आदिवासीबहुल जाजावंडी इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतय्या बेडके
यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच सप्टेंबरला शिक्षक दिनी नवी दिल्लीत राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होईल.
****
"लाडक्या बहिणी" प्रमाणेच
"सुरक्षित बहीण" ही जबाबदारी देखील शासनाचीच आहे, शासन कोणत्याही गुन्हेगाराला
सोडणार नाही, अशी
ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. काल ठाण्यात आमदार प्रताप सरनाईक यांच्या
संस्कृती युवा प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवात ते बोलत होते. हे शासन गोविंदा पथकांच्या
पाठीशी नेहमी खंबीरपणे उभं असून, गोविंदांसाठी जे जे शक्य आहे ते सर्व काही करण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, दहीहंडीचा उत्सव काल राज्यभरात
साजरा झाला. मुंबई शहर तसंच उपनगरांमध्ये ठिकठिकाणी मानाच्या दहिहंड्या फोडण्यासाठी
गोविंदा पथकांनी एकाहून एक उंच मनोरे उभारले. हा थरार पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठ्या
संख्येनं गर्दी केली होती. महिलांची गोविंदा पथकंही या उत्सवात सक्रीय सहभागी झाली
होती.
छत्रपती
संभाजीनगर इथं गुलमंडी, कॅनॉट प्लेस, टी व्ही सेंटर, गजानन महाराज मंदिर चौक, निराला बाजार या ठिकाणी
दहिहंडी सोहळा उत्साहात साजरा झाला.
****
प्रत्येक
व्यक्तीने पावसाळ्यात वृक्षारोपण करून त्याचं संगोपन केल्यास भविष्यामध्ये पृथ्वीचा
समतोल राखला जाऊ शकतो, असं छत्रपती संभाजीनगर इथल्या देवगिरी महाविद्यालयाचे
प्राचार्य अशोक तेजनकर यांनी म्हटलं आहे. देवगिरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत, एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत
काल पाचशे झाडं लावण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
****
ग्लोबल
वॉर्मिंगमुळे पर्यावरणाचा बिघडलेला समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज असल्याचं, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र
मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनवणे यांनी म्हटलं आहे. विद्यापीठाने
दत्तक घेतलेल्या घनशेत या गावी अश्वमेध सामाजिक संस्थेने दिलेल्या ५१ किलो बियाणातून
२० हजार सीडबॉल तयार करण्यात आले असून, हे सिडबॉल काल विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या श्रमदानाने
घनशेत इथल्या जंगलात टाकण्यात आले, त्यावेळी कुलगुरू बोलत होते.
****
बीड
जिल्ह्यात मांजरसुंबा बस स्थानकातून मागील तीन दिवसांपासून एसटी बस येत नसल्यामुळे
विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंदांना सोबत घेऊन काल बस स्थानकात ठिय्या
आंदोलन केलं. बस येत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात उपस्थित राहता आलं नाही, विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक
आणि आर्थिक ही नुकसान होत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. हे आंदोलन होताच एसटी महामंडळाच्या
अधिकाऱ्यांनी ताबडतोब एसटी बस उपलब्ध करून दिली.
****
पॅरालम्पिक
क्रीडा स्पर्धांना आजपासून पॅरिस इथं प्रारंभ होत आहे. ८४ खेळाडूंचं भारतीय पथक पॅरिसला
दाखल झालं असून, विविध १२ क्रीडा प्रकारांमध्ये हे खेळाडू सहभागी होणार
आहेत. टोक्यो पॅरालम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाच सुवर्णांसह १९ पदकं जिंकली
होती.
****
हवामान
येत्या
दोन दिवसात, कोकण
आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
जालना
शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. नाशिक जिल्ह्यातल्या
पावसाचा जोर कमी झाल्यानं, जिल्ह्यातल्या धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला
आहे.
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणी साठा ६३ टक्क्यांपर्यंत पोहोचला
आहे. धरणात अहमदनगर तसंच नाशिक जिल्ह्यातल्या पाणलोट क्षेत्रातून सुमारे ७१ हजार ११५
घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक होत आहे.
****
No comments:
Post a Comment