Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 30 August 2024
Time: 01.00 to
01.05 PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
आर्थिक आणि तंत्रज्ञान - फिन्टेक क्षेत्रात भारताची क्रांती
सर्वत्र दिसून येत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मुंबईतल्या
जिओ कन्व्हेंशन सेंटरमध्ये आज ग्लोबल फिन्टेक फेस्टचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते
झालं, त्यावेळी ते बोलत होते. जगभरातले
जवळपास पन्नास टक्क्यांहून अधिक डिजिटल व्यवहार भारतात होत असून, भारताचं युपीआय हे ॲप, फिन्टेकचं जगभरातलं उत्तम उदाहरण असल्याचं त्यांनी नमूद केलं.
इतर देशातले लोक भारतात येतात तेव्हा त्यांना सांस्कृतिक विविधतेसोबतच, आता फिन्टेक क्षेत्रातही विविधता दिसून येत असल्याचं पंतप्रधान
म्हणाले. गेल्या दहा वर्षात फिन्टेक स्टार्टअप मध्ये ५०० टक्क्यांनी वाढ झाली असल्याची
माहिती त्यांनी दिली. फिन्टेक मुळे आलेल्या परिवर्तनामुळे आमुलाग्र सामाजिक बदल झाले
असून, तळागाळातल्या लोकांपर्यंत बँकिंग
सुविधा उपलब्ध झाल्याचं त्यांनी सांगितलं. जनधन, मुद्रा योजना यासह महिला सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या
विविध योजनांचा पंतप्रधानांनी यावेळी उल्लेख केला. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर
शक्तिकांत दास यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, पालघर इथं आज विविध विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन पंतप्रधान
मोदी यांच्या हस्ते होणार आहे. डहाणू गावात ७६ हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदराचं
भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. आशिया खंडातलं हे सर्वात मोठं बंदर असेल आणि जगातल्या
आघाडीच्या १० बंदरामध्ये याचा समावेश असेल. या बंदरामुळे १२ लाख लोकांना प्रत्यक्ष
तसंच अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.
****
पुण्यात शिवाजीनगर इथं दूरशिक्षण तंत्रनिकेतन परिसरात
उभारण्यात आलेल्या राज्यातल्या पहिल्या आतंरराष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन
उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास महासंघ
- एन एस डी सी इंटरनॅशनलच्या पुणे विभागाचे सहसंचालक डॉ दत्तात्रय जाधव यांनी पत्रकार
परिषदेत ही माहिती दिली. या प्रशिक्षण केंद्रात पहिल्या टप्प्यात एनएसडीसी इंटरनॅशनल
मार्फत आरोग्य, रूग्णालय, ब्युटी अँड वेलनेस आणि ग्रीन जॉब स्केल सेक्टर, सौर उर्जा या विभागातलं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट इथं शिवरायांचा पुतळा कोसळल्याची
संपूर्णपणे चौकशी करून पुन्हा इथं महाराजांचं भव्यदिव्य स्मारक उभारलं जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. आज सकाळी
राजकोट इथं या दुर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ही घटना
अतिशय दुर्देवी आहे, मात्र याविषयी वाद घालणं
योग्य नाही, नेते आणि कार्यकर्ते यांनी या विषयात
सयंम दाखवावा, असं आवाहन पवार यांनी यावेळी केलं.
****
मुंबई - गोवा महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं करून अनेकांच्या
मृत्यूस जबाबदार असलेले चेतक एन्टरप्रायजेसचे व्यवस्थापकीय संचालक हुकुमचंद जैन, सर व्यवस्थापक अवधेश सिन्हा आणि प्रकल्प अभियंता सुजित
कावळे यांच्यावर आज माणगाव पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. यापैकी
अभियंता कावळे याला अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच या
महामार्गाची पाहणी करुन, कारवाईचे आदेश दिले होते. चेतक एन्टरप्रायजेसकडे इंदापूर ते
वडपाले या टप्प्याचं काम होतं. कंपनीने हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं केल्यानं या
टप्प्यात २०१७ नंतर १७० अपघात झाले, त्यात ९७ जणांचा मृत्यू झाला.
****
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून लातूर जिल्ह्यातल्या
जास्तीत जास्त युवकांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होण्यासाठी, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी काल जिल्ह्यातले
साखर कारखाने, महाविद्यालये आणि सहकारी बँकांच्या
प्रतिनिधींशी संवाद साधला. जिल्ह्यातल्या सर्व शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी आस्थापनांनी या योजनेतून युवकांची प्रशिक्षणासाठी निवड
करावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केले.
****
मध्यप्रदेशात सतना रेल्वे स्थानकावर सतना-बरेठीया या नवीन
रेल्वे लाईनचं काम करण्यासाठी लाईन ब्लॉक घेण्यात
आला आहे. त्यामुळे जालना-छपरा-जालना विशेष गाडीच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या
आहेत, त्यात १८ आणि २५ सप्टेंबर रोजी धावणारी
जालना ते छपरा ही गाडी, तर परतीच्या प्रवासात २० आणि २७ सप्टेंबर रोजी धावणारी छपरा ते जालना गाडी रद्द करण्यात आल्याचं
दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
****
गुजरातमध्ये सौराष्ट्र आणि कच्छवर निर्माण झालेल्या कमी
दाबाच्या क्षेत्राचं रूपांतर येत्या १२ तासांत ईशान्य अरबी समुद्रात चक्रीवादळामध्ये
होण्याची शक्यता असून, सौराष्ट्र आणि कच्छच्या
काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
****
राज्यात येत्या दोन दिवसांत कोकण आणि विदर्भात बहुतांश
ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी
पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह
जोरदार पावसाची शक्यता असून, मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment