Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 29 August 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– २९ ऑगस्ट २०२४
सायंकाळी ६.१०
****
· आशिया खंडातील सर्वात मोठ्या वाढवण बंदराचं उद्या पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन
· मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं अनुदान लाभार्थ्यांना पूर्णपणे देण्याचे पणन
मंत्री अब्दुल सत्तार यांचे बँकांना निर्देश
· मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं २९ सप्टेंबरपासून पुन्हा आमरण उपोषण
आणि
· राष्ट्रीय क्रीडा दिन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सर्वत्र साजरा
****
पालघर जिल्ह्यात नियोजित वाढवण बंदराचं उद्या पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. हे बंदर महाराष्ट्रासोबत देशाची वेगळी ओळख
निर्माण करायला मदत करेल असा विश्वास केंद्रीय बंदर, नौकानयन
आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केला आहे. ते आज पालघर इथं वार्ताहर
परिषदेत बोलत होते. आशिया खंडातील हे सर्वात मोठं बंदर असेल आणि जगातल्या आघाडीच्या
१० बंदरामध्ये याचा समावेश असेल. समुद्रात सुमारे १४०० हेक्टर जागेवर भर टाकला जाणार
असून,
यात ९ कंटेनर टर्मिनल असतील. याद्वारे वर्षाला ३०० दशलक्ष मेट्रिक
टन सामानाची वाहतूक होईल, अशी अपेक्षा आहे. या बंदरामुळे
१२ लाख लोकांना प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष रोजगार मिळेल आणि आत्मनिर्भर भारतात हे बंदर
एक महत्त्वाची भूमिका बजावेल, असं सोनोवाल यांनी नमूद केलं. इथल्या रोजगारासाठी आवश्यक कौशल्य स्थानिक युवकांना
शिकवली जातील,
अशी माहिती या विभागाचे सचिव टी. के. रामचंद्रन यांनी दिली.
****
राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार
आणि माफक दरात हक्कांची घरं मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं गृहनिर्माण
मंत्री अतुल सावे यांनी म्हटलं आहे. नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्यावतीनं
आज मुंबईत झालेल्या ‘द रिअल इस्टेट फोरम २०२४’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
राज्य शासनानं महिलांना गृहखरेदीमध्ये १ टक्के मुद्रांक शुल्क सवलत जाहीर केली आहे.
याचा रिअल इस्टेट उद्योगाला अप्रत्यक्षपणे मोठा फायदा होणार असल्याचं सावे यांनी सांगितलं.
****
दिल्लीतील प्रसिद्ध 'मऱ्हाटी' महाराष्ट्र एम्पोरियममध्ये आजपासून महाराष्ट्रातील मूर्तिकारांच्या पर्यावरणपूरक
गणेशमूर्तींच्या प्रदर्शन आणि विक्रीला उत्साहात सुरुवात झाली. महाराष्ट्रातील मूर्तिकारांच्या
कलेला राजधानीत प्रोत्साहन मिळावं, या उद्देशानं भरवलेल्या या प्रदर्शनाला
दिल्लीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे.
****
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे येत्या १ सप्टेंबरला सीडीएस म्हणजेच
संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा सकाळी ९ ते ११, दुपारी १२ ते २ आणि ३ ते ५ या वेळेत घेण्यात येणार आहे. तर एनडीएची परीक्षा सकाळी
१० ते साडेबारा आणि दुपारी २ ते साडेचार या वेळेत घेतली जाणार असल्याचं याबाबतच्या
बातमीत म्हटलं आहे.
****
सिंधुदूर्ग जिल्ह्यात राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या
पुतळ्याच्या बाबतीत जे घडले ते दुर्दैवी
असून,
याप्रकरणी दोषींवर कारवाई होणारच, अशी
ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते आज बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाच्या जनसन्मान यात्रेदरम्यान बोलत होते. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी
बोलतांना,
लाडकी बहीण योजनेत बीड जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं
सांगितलं.
****
राज्यात कणा नसलेलं सरकार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस
पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्याच्या
वसमत तालुक्यात तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांची हत्या केल्याची घटना काल
घडली. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या ट्वीट संदेशात हे मत व्यक्त केलं. या राज्यात
महिला आणि मुलींसह, सामान्य नागरिक तर सुरक्षित नव्हताच पण आता
राज्यातील शासनाचे अधिकारीही सुरक्षित नसल्याची टीका त्यांनी आपल्या संदेशातून केली
आहे. याआधी युपी, बिहारला असे प्रकार घडत असल्याचं, ऐकिवात होतं. मात्र आता महाराष्ट्रातही असे प्रकार पाहून वेदना होत असल्याचं जयंत
पाटील यांनी म्हटलं आहे.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या
बँक खात्यात मिळालेली रक्कम, पीक विमा, पीककर्ज यासह कोणत्याही शासकीय योजनेचे अनुदान कपात न करता पूर्णपणे लाभार्थ्यांना
देण्याचे निर्देश, राज्याचे पणन मंत्री तसंच छत्रपती संभाजीनगरचे
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी बँकांना दिले आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन
सभागृहात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सर्व सरकारी योजनांबाबत आढावा बैठक घेतली
त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील कन्नड, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर आणि वैजापूर या चार तालुक्यात पिकविम्याची रक्कम काही कारणास्तव
वितरित झाली नाही, याबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी
पिकविमा कंपनीसाठी कृषी विभागानं पाठपुरावा करावा आणि तात्काळ शेतकऱ्यांना पीक विम्याची
रक्कम उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही पालकमंत्री सत्तार
यांनी यावेळी दिले.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथल्या विविध
उद्यान विकास आणि इतर कामांचं आज पालकमंत्री सत्तार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात
आलं.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी २९ सप्टेंबरपासून
पुन्हा आमरण उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ते आज जालना जिल्ह्यात आंतरवाली
सराटी इथं बोलत होते. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी
गेल्या वर्षी २९ ऑगस्ट २०२३ पुकारलेल्या आंदोलनाची वर्षपूर्ती झाल्यानिमित्तानं जरांगे
आज गोदापट्ट्यातील १२३ गावांच्या आंदोलक समन्वयकांची आंतरवाली इथं बैठक घेतली. त्यानंतर
त्यांनी उपोषणाचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान, जरांगे
यांच्या या निर्णयाला उपस्थित समाजबांधवांनी विरोध करत, हा
निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राष्ट्रीय क्रीडा दिन आज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा
करण्यात आला. हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांना देशभरातून अभिवादन करण्यात आलं. दिल्लीत
मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा संकुलात युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय
यांनी ध्यानचंद यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं.
सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि सांगली हायस्कूल
यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय
क्रीडा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत पदक
प्राप्त खेळाडूंचा सत्कार तसंच प्रोत्साहनात्मक अनुदान प्राप्त शाळांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मानवी मनोऱ्यांसह काही
क्रीडा प्रकारांचं प्रात्यक्षिक ही सादर करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात
राष्ट्रीय छात्र सेना-एनसीसीच्या शहरातल्या विद्यार्थ्यांची यावेळी रन फॉर फिटनेस ही
दौड घेण्यात आली. अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी यात सहभागी झाले.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील खेळाडूंनी
देश आणि राज्यपातळीवरील विविध खेळात यंदा विद्यापीठाला ३३ पदकं प्राप्त करुन दिली आहेत.
या खेळाडूंना पुढील डिसेंबर-जानेवारी महिन्यापासून विद्यापीठातील इंडोयर मल्टीपर्पज
हॉलमध्ये जागतिक दर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू
प्रा. प्रकाश महानवर यांनी ही माहिती दिली. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने विद्यापीठात
झालेल्या कार्यक्रमात कुलगुरु महानवर बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक
वर्ष २०२३-२४ मध्ये आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ठ ठरलेल्या संगमेश्वर
महाविद्यालयाला पुरणचंद्र पुंजाल फिरता चषक प्रदान केला.
****
मुंबईच्या वांद्रे टर्मिनस पासून मडगावला जाणारी नवी एक्सप्रेस
रेल्वेगाडी आजपासून सुरू झाली. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांनी या गाडीला
हिरवा झेंडा दाखवून ही गाडी रवाना केली. या कार्यक्रमाला रेल्वे, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित
होते. गणेशोत्सवासाठी विशेष गाडी असावी या स्थानिकांच्या मागणीवरून ही रेल्वे गाडी
सुरू करण्यात आली आहे.
****
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमेटी च्या वतीनं आज नागपूर
इथं संविधान चौकात “नारी
न्याय आंदोलन” करण्यात आलं. महिलांना न्याय
देण्याकरिता देशातील अनेक राज्यात “नारी
न्याय आंदोलनं” करण्यात येणार असल्याचं महिला
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यांनी सांगितलं.
****
बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ आज छत्रपती
संभाजीनगर इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी च्या वतीने क्रांती
चौक ते गुलमंडी पर्यंत वाहन फेरी काढण्यात आली. क्रांती चौक झाशी राणी पुतळ्याला अभिवादन
करून या रॅलीला सुरुवात झाली. सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून
सदरील रॅलीचा समारोप झाला.
मालवण मधील राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेच्या
निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौक परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या
वतीने आंदोलन करण्यात आलं. पक्षाचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले
होते.
****
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा इथल्या शांताई मंगल कार्यालय उद्यापासून
१ सप्टेंबर पर्यंत आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्ये या विषयावर डिजिटल मल्टीमीडिया
प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत सर्वांसाठी
विनामूल्य खुले राहणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर जिल्हा होमगार्ड सदस्य नोंदणीसाठी बाभळगाव पोलीस मुख्यालयात
नुकतीच पथकनिहाय होमगार्ड नोंदणी प्रक्रिया घेण्यात आली. या चाचणीचा अंतरिम निकाल विभागाच्या
अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment