Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 27
August 2024
Time: 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २७ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
वैद्यकीय
व्यावसायिकांची सुरक्षा तसंच कामाच्या ठिकाणची परिस्थिती याबाबत सर्वोच्च न्यायालयानं
स्थापन केलेल्या राष्ट्रीय कृती दलाची पहिली बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. या बैठकीचे
अध्यक्ष केंद्र सरकारचे कॅबिनेट सचिव असतील. दलाच्या इतर सदस्यांमध्ये केंद्रीय गृह
सचिव, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे
अध्यक्ष, सर्जन, व्हॉईस ॲडमिरल, एम्सचे संचालक आणि न्यूरोलॉजी विभागाचे माजी प्राध्यापक यांचा समावेश आहे. कोलकाता
इथल्या आरजीकार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिला निवासी डॉक्टरवर लैंगिक
अत्याचार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं, वैद्यकीय व्यावसायिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय
कृती दलाची स्थापना केली होती.
****
जम्मू
काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा
दिवस आहे. ३० ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. पहिल्या टप्प्यात २४
मतदारसंघात येत्या आठ सप्टेंबरला मतदान होणार आहे.
****
नागरिकांच्या
तक्रार निवारणासाठी केंद्र सरकरानं नव्या सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना जारी केल्या
आहेत. यामुळे तक्रार निवारण व्यवस्था प्रणाली अधिक सुसूत्र होऊन नागरिकांच्या अधिकारातही
वाढ होणार आहे. केंद्र सरकारच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी जी पोर्टल डॉट जीओव्ही
डॉट इन या पोर्टलवर नागरिक तक्रार दाखल करु शकतात. ही एकल खिडकी व्यवस्था करण्यात आली
आहे. सर्व मंत्रालय विभागांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
केली जाणार असून, हे
अधिकारी या तक्रारींचं वर्गीकरण करतील आणि प्रलंबित खटल्यांच्या निपटाऱ्यावर देखरेख
ठेवतील. प्रत्येक मंत्रालयासाठी एक समर्पित तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला
असून, २१ दिवसात प्रत्येक तक्रारींचं
निवारण करणं आणि सर्व विभागांनी तक्रार निवारणाचा वेळोवेळी आढावा घेणं अनिवार्य आहे.
****
छत्तीसगढच्या
बिजापूर जिल्ह्यात २५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यापैकी तिघांवर प्रत्येकी आठ
लाखाचं, एकावर तीन लाखांचं तर दोन नक्षलवाद्यांवर
प्रत्येकी एक लाखांचं बक्षिस होतं. या नक्षलवाद्यांना छत्तीसगढ राज्यसरकारने प्रत्येकी
२५ हजार रुपयांचा पुनर्वसन निधी दिला आहे.
****
राज्यात
आज दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे. गोविंदा पथकं आज सर्वाजनिक मंडळांद्वारे आयोजित
दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज आहेत.
मुंबई
शहर तसंच उपनगरांमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. ठीकठिकाणी मानाच्या
दहीहंड्या बांधण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव
साजरा होत असल्यामुळे मुंबईत राजकीय पक्षही यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत.
त्यांनीही भरघोस बक्षीसं ठेवून दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं आहे. महिलांची गोविंदा
पथकेही या उत्सवात सक्रिय आहेत. मागाठाणे इथं शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सूर्वे
यांची दहिहंडी लक्षवेधी ठरणार असून, मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित राहणार आहेत. मुंबई ठिकाणी
दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटी उत्सव सहभागी होणार आहे.
छत्रपती
संभाजीनगर शहरातल्या कोकणवाडी चौक, गुलमंडी, कॅनॉट प्लेस, टी
व्ही सेंटर, गजानन महाराज मंदीर चौक, निराला बाजार या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे
आज दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत या मर्गावरची वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात
आली आहे.
****
महिला
आणि मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत विधानपरिषदेच्या उपसभापती
नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत विधानभवन इथं काल बैठक घेण्यात आली. शैक्षणिक संस्थांमधून
महिलांच्या सुरक्षिततेबाबत विशेष मोहिमेद्वारे उपाययोजना राबवाव्यात, अशी सूचना गोऱ्हे यांनी यावेळी केली.
****
मुसळधार
पावसामुळे गुजरातच्या अनेक भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगर इथल्या
आप्तकालीन साहाय्य केंद्रात उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्यातल्या पूरस्थितीचा आढावा घेतला.
राज्यातही
अनेक भागात मुसळधार पावसामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे.
कोल्हापूर
जिल्ह्यात राधानगरी, गगनबावडा, आजरा आणि चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस होत आहे. सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने
भरली असल्याने, पाण्याचा विसर्ग वाढल्याने नद्यांच्या
पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर आल्यानं ४२ बंधारे पाण्याखाली
गेले आहेत.
****
नेपाळमध्ये
दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघानं आयोजित केलेल्या वीस वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेच्या
अंतिम सामन्यात काल भारतीय संघाला बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला. हा सामना १-१
असा बरोबरीत सुटल्यानं बांगलादेशानं पेनल्टी शूटआऊटच्या बळावर ४-३ अशी मात करून स्पर्धेचं
विजेतेपद पटकावलं.
****
No comments:
Post a Comment