Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 28 August 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– २८ ऑगस्ट २०२४
सायंकाळी ६.१०
****
· राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या चार सप्टेंबरला लातूर दौऱ्यावर-उदगीर इथं नगरपरिषदेने
उभारलेल्या बुद्ध विहाराचं राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण
· केंद्रीय मंत्रिमंडळाची देशात १२ ग्रीनफील्ड औद्योगिक स्मार्ट शहरांना मान्यता-राज्यातल्या
दिघीचा समावेश
· हिंगोली जिल्ह्यात आडगावच्या तलाठ्याचा प्राणघातक हल्ल्यात मृत्यू
आणि
· १७ व्या आंतरराष्ट्रीय खगोलभौतिकी ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना १ सुवर्णासह
४ रौप्य पदकं
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या चार सप्टेंबरला लातूर दौऱ्यावर
येत आहेत. उदगीर इथं नगरपरिषदेने उभारलेल्या बुद्ध विहाराचं लोकार्पण राष्ट्रपतींच्या
हस्ते होणार आहे. राज्य शासनाच्यावतीने आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानालाही
राष्ट्रपती उपस्थित राहणार असल्याची माहिती लातूर जिल्हा प्रशासनाने दिली आहे. राज्य
शासनाने उदगीर नगरपरिषदेला दिलेल्या निधीतून तळवेस इथं बुध्द विहाराची उभारणी करण्यात
आली आहे.
****
केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमांतर्गत
जागतिक दर्जाच्या १२ ग्रीनफील्ड औद्योगिक स्मार्ट शहरांना मान्यता दिली आहे. आज झालेल्या
मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सुमारे २८ हजार ६०२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा
हा प्रकल्प असून, त्यातून दहा राज्यांमध्ये सहा मुख्य औद्योगिक
मार्गिका निर्माण केल्या जाणार आहेत. नव्यानं तयार होणाऱ्या जागतिक दर्जाच्या ग्रीनफील्ड
औद्योगिक स्मार्ट शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या दिघी या शहराचा समावेश आहे. २०३० पर्यंत
भारताची निर्यात दोन ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहचण्यासाठी या औद्योगिक मार्गिकांचा मोठा
उपयोग होणार आहे. राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमातल्या या प्रकल्पातून
सुमारे दहा लाख प्रत्यक्ष तर तीस लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत.
****
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं आज रेल्वे
मंत्रालयाचे सुमारे सहा हजार चारशे छप्पन्न कोटी मूल्याचे तीन प्रकल्पही मंजूर केले.
या प्रकल्पांमुळे देशातले आतापर्यंत रेल्वेनं जोडले न गेलेले भाग जोडले जाऊन पुरवठा
साखळीची आणि वाहतुकीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल आणि आर्थिक वृद्धीला गती मिळेल.
ओडिशा,
झारखंड, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगढ या
चार राज्यातल्या सात जिल्ह्यांतून जाणाऱ्या या तीन प्रकल्पांमुळे देशातंर्गत रेल्वेच्या
जाळ्यामध्ये तीनशे किलोमीटर्स लांबीच्या रेल्वेमार्गाची भर पडणार आहे. या प्रकल्पांमुळे
देशातली तेराशे गावं आणि अकरा लाख लोकसंख्या रेल्वेनं जोडली जाईल. हे प्रकल्प पीएम
गती शक्ती,
या महत्त्वाकांक्षी योजनेचा भाग आहेत.
****
केंद्रीय मंत्रिमंडळानं आज २३४ नवीन शहरांमध्ये खासगी एफ एम
रेडिओ वाहिन्या सुरू करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली. मातृभाषांमधल्या स्थानिक
कार्यक्रमांना प्रोत्साहन देणं आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणं, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
****
सिंधुदूर्ग जिल्ह्यात राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या
पुतळा दुर्घटना प्रकरणी राजकारण करणं थांबवावं, असं
आवाहन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज नागपूरमध्ये
पत्रकार परिषदेत बोलत होते. हा पुतळा नौदलानं उभारला होता, राज्य
सरकारनं नाही,
तरीसुद्धा या घटनेची चौकशी, दोषींवर
कारवाई आणि भव्य पुतळ्याची उभारणी, या तीनही पातळीवर राज्य सरकार
काम करत असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले –
नेव्ही यासंदर्भात चौकशी
करून उचित कार्यवाही करेल. घटनेकरता कुठली गोष्ट जबाबदार होती. किंवा त्याच्यामध्ये
काय चुका राहिल्या, यासंदर्भातला तो रिपोर्ट त्या ठिकाणी असेल. ऑलरेडी पी डब्ल्यू
डी विभागाने एक एफ आय आर केलेला आहे. त्यामुळे त्यात जे सिव्हिलियन्स असतील त्यांच्यावर
नेव्हीच्या रिपोर्ट नंतर पोलीस विभाग देखील कार्यवाही करेल. आणि दुसरं माननीय मुख्यमंत्र्यांनी
देखील सांगितलेलं आहे, की आपण नेव्हीला मदत करून त्यांच्या मदतीनं त्याठिकाणी एक भव्य
अशा प्रकारचा छत्रपती शिवरायांचा पुतळा हा उभारणार आहोत.
या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ.
चेतन पाटील यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी
करण्यासाठी आज तिथं गेलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे
आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्या समर्थकांनी एकमेकांवर दगडफेक केली. यात एक पोलीस
आणि एक महिला असे दोन जण जखमी झाले.
महाविकास आघाडीनं आज मालवण बंदची हाक देत, मोर्चा काढला. या मोर्चात विधान सभा तसंच विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते विजय
वडेट्टीवार आणि अंबादास दानवे, माजी मंत्री आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह
अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. दरम्यान, या
घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी येत्या रविवारी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथं
निदर्शनं करणार आहे.
****
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज दुपारी नांदेड आणि हिंगोली
जिल्ह्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी नांदेड इथं आगमन झालं. ते लातूर मार्गे हिंगोलीला
रवाना झाले. नांदेड विमानतळावर विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश
कुमार,
यांनी तर लातूर इथं क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्यांचं स्वागत केलं.
दरम्यान, पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात
सुरू असलेली जनसन्मान यात्रा उद्या सकाळी बीड शहरात दाखल होत आहे.
****
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात आडगाव-रंजेबुआ इथल्या तलाठ्याचा
आज कार्यालयात झालेल्या प्राणघातक हल्ल्यात मृत्यू झाला. संतोष पवार असं या तलाठ्याचं
नाव असून,
प्रलंबित शेती कामानिमित्त आलेल्या एका इसमाने त्यांच्या डोळ्यात
मिरचीपूड टाकत धारदार चाकूने
वार केले. पवार यांना उपचारासाठी परभणीला नेत असतांना, त्यांचा
मृत्यू झाला. दरम्यान, एका हल्लेखोरास ताब्यात घेतल्याची माहिती
पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. प्रतीक्षा गवारे हुंडाबळी आत्महत्या
प्रकरणातील फरार आरोपी डॉ. प्रीतम शंकर गवारे याला पोलिसांनी आज अटक केली. डॉ प्रतीक्षा
यांनी गेल्या शनिवारी आत्महत्या केली होती, तेव्हापासून
सदर आरोपी फरार होता.
****
ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांच्या पार्थिव
देहावर आज पुण्याच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुहासिनी देशपांडे
यांचं काल पुण्यात निधन झालं. त्या ८१ वर्षांच्या होत्या. विविध चित्रपट, नाटकं तसंच दूरचित्रवाणी मालिकांमधून असंख्य भूमिका साकारलेल्या देशपांडे यांना
कला क्षेत्रातल्या योगदानासाठी राज्य शासनाच्या ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
****
ब्राझीलच्या रिओ दि जानेरिओ इथं झालेल्या १७ व्या आंतरराष्ट्रीय
खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी १ सुवर्ण
आणि ४ रौप्य पदकं पटकावली आहेत. यंदा १७ ते २६ ऑगस्ट या काळात या स्पर्धा झाल्या. बेंगळुरूच्या
दक्ष तयालियानं सुवर्ण पदक जिंकलं, तर पुण्याच्या आयुष कुठारी आणि
सानिध्य सराफ,
हैदराबादच्या बनिब्रता माजी आणि बिहारच्या पाणिनी, या विद्यार्थ्यांनी रौप्यपदकं जिंकली.
****
प्रत्येक शाळा-महाविद्यालयात मुलींना निर्भय आणि सुरक्षित वातावरण
उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षक आणि सखी सावित्री समिती सदस्यांनी वेळोवेळी संवाद साधावा, असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. स्वामी
यांनी आज फुलंब्री तालुक्यात पाथ्री इथल्या राजश्री शाहू विद्यालयातील विद्यार्थिनींशी
संवाद साधला. सगळ्या मुलींनीही आपल्या आई-वडिलांसोबत आणि शाळेतल्या शिक्षकांसोबत संवाद
साधावा आणि आपल्याला येणाऱ्या अडचणी त्यांना सांगाव्यात, असं
आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी विद्यार्थिनींना यावेळी केलं.
****
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ संभाजीनगर महाविकास आघाडी महिला
पदाधिकाऱ्यांच्या वतीने उद्या २९ रोजी सकाळी १० वाजता दुचाकी फेरी काढण्यात येणार आहे.
क्रांती चौक परिसरातल्या झाशी राणी पुतळ्यास अभिवादन करून या दुचाकी फेरीला सुरुवात
होणार असून औरंगपुरा भागात सावित्रीबाई फुले पुतळ्याजवळ या फेरीचा समारोप होणार आहे.
****
No comments:
Post a Comment