Friday, 30 August 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 30.08.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 30 August 2024

Time: 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ३० ऑगस्ट २०२ सकाळी.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मुंबईतल्या जिओ कन्व्हेंशन सेंटरमध्ये ग्लोबल फिन्टेक फेस्टचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमाराला पालघरच्या सिडको मैदानावर त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. पालघर इथं डहाणू गावात ७६ हजार कोटी रूपयांच्या वाढवण बंदराचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

****

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयानं नोकरदार महिलांसाठी शी बॉक्स ही ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली सुरु केली आहे. कार्यालयीन ठिकाणी महिलांना लैंगिक शोषणासारख्या घटनांचा सामना करावा लागल्यास, त्याविरुद्ध महिलांना या शी बॉक्समध्ये तक्रार करता येणार आहे. तक्रार निवारणाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असेल. केंद्र सरकारची सर्व मंत्रालयं आणि विभाग तसंच राज्य सरकारचीही सर्व कार्यालयं आणि संबंधित संस्थांच्या महिला कर्मचाऱ्यांना या प्रणालीचा उपयोग करता येणार आहे.

****

भारताची दुसरी अण्वस्त्रधारी पाणबुडी, आय एन एस अरिघात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत काल नौदलाच्या ताफ्यात काल समाविष्ट करण्यात आली. अरिघातमुळे भारताची अण्वस्त्र क्षमता वाढेल, देशाच्या सुरक्षेत सामरिक समतोल आणि शांतता राखण्यात अरिघातची भूमिका महत्वाची ठरेल, असं राजनाथ सिंह यावेळी म्हणाले. 

****

नंदुरबारच्या राजणी गावात उभारण्यात आलेल्या कौशल्य भारत केंद्राचं उद्घाटन केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री दुर्गादास उईके यांच्या हस्ते काल झालं. ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागात उभारण्यात आलेलं हे देशातलं पहिलं कौशल्य भारत केंद्र आहे. शेती आणि वनसंपत्तीवर अवलंबून असलेल्या नंदुरबार सारख्या जिल्ह्यात,  संलग्न उद्योग धंद्यावर प्रशिक्षण देण्याच्या उद्देशानं, हे कौशल्य भारत केंद्र स्थापन करण्यात आलं असून, या माध्यमातून आदिवासींना कृषी प्रक्रीया उद्योगासाठी प्रशिक्षण मिळणार असल्याचं उईके यांनी सांगितलं.

****

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट इथं शिवरायांचा पुतळा कोसळल्याची संपूर्णपणे चौकशी करून पुन्हा इथं महाराजांचं भव्यदिव्य स्मारक उभारलं जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. आज सकाळी राजकोट इथं या दुर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ही घटना अतिशय दुर्देवी आहे, मात्र याविषयी वाद घालणं योग्य नाही, नेते आणि कार्यकर्ते यांनी या विषयात सयंम दाखवावा, असं आवाहन पवार यांनी केलं.

दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल वर्षा या निवासस्थानी विशेष बैठक घेतली. त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी त्यांनी नुकत्याच काही शिल्पकारांच्या भेटीही घेतल्या.

****

महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीनं देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचं वितरण काल मुंबईत, गुजराती साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष स्नेहल मुजुमदार, सहसंचालक सचिन निंबाळकर यांच्या हस्ते झालं. यंदाचा कवी नर्मद मराठी साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांना, तर  कवी नर्मद गुजराती साहित्य पुरस्कार ईश्वरलाल परमार यांना प्रदान करण्यात आला.

****

गडचिरोली इथल्या नक्षलवाद्यांच्या अहेरी दलमचा कमांडर विकास उर्फ सैनू मुंशी जेट्टी याला छत्तीसगड पोलिसांनी काल अटक केली. त्याच्याकडून काही रोकड आणि नक्षली साहित्य जप्त करण्यात आलं. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा अशा तिन्ही राज्यांमध्ये तो सक्रिय होता. त्याच्यावर महाराष्ट्र आणि छत्तीसगड सरकारचं एकंदर २४ लाखांचं बक्षीस होतं.

****


गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकानं काल पुण्यातल्या कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर छापा टाकून संवेदनशील साहित्य जप्त केलं. परदेशातून भारतात येणारे आंतरराष्ट्रीय दूरध्वनी भारतातल्या यंत्रणेला समजू न देण्यासाठी या बनावट टेलिफोन एक्सचेंजचा वापर होत असल्याची प्राथमिक माहिती आहे. या कारवाईत तीन हजार ७८८ सीम कार्ड आणि विविध प्रकारची यंत्रसामुग्री पोलिसांनी ताब्यात घेतली असून, एकाला अटक केली आहे.

****

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून लातूर जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त युवकांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होण्यासाठी, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी काल जिल्ह्यातले साखर कारखाने, महाविद्यालये आणि सहकारी बँकांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. जिल्ह्यातल्या सर्व शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी आस्थापनांनी या योजनेतून युवकांची प्रशिक्षणासाठी निवड करावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केले.

****

रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण शहरातल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाच्या आवारात ७५ फूट उंचीच्या ध्वजस्तंभाचं लोकार्पण काल पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं. तरुणांमध्ये देशभक्ती कायम जागृत असली पाहिजे, या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

****


No comments: