Tuesday, 27 August 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.08.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 27 August 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह-गोविंदांचा थरार अनुभवण्यासाठी नागरिकांची गर्दी

·      राजकोट पुतळा दुर्घटनेचा तपास आणि पुतळा पुनर्स्थापनेसाठी नौदलाचं पथक रवाना

·      महिला अत्याचार प्रकरणी नराधमांना भर चौकात शिक्षा द्यावी-आमदार पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया

आणि

·      नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

****

राज्यात आज दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे. राज्यभरात सर्वत्र सार्वजनिक मंडळांद्वारे आयोजित दहिहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकं एकावर एक थर रचत आहेत. मुंबई शहर तसंच उपनगरांमध्ये ठिकठिकाणी मानाच्या दहिहंड्या बांधण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहिहंडी उत्सव साजरा होत असल्यामुळे मुंबईत अनेक राजकीय पक्षांनीही भरघोस बक्षीसं ठेवून दहिहंडी उत्सवाचं आयोजन केलं आहे. महिलांची गोविंदा पथकंही या उत्सवात सक्रीय आहेत. हा थरार पाहण्यासाठी नागरिकही मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत.

 

 

छत्रपती संभाजीनगर इथं कोकणवाडी चौक, गुलमंडी, कॅनॉट प्लेस, टी व्ही सेंटर, गजानन महाराज मंदिर चौक, निराला बाजार या ठिकाणी दहिहंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे आज रात्री दहा वाजेपर्यंत या मार्गावरची वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.

****

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याचं कारण शोधण्यासाठी आणि पुतळा पुनर्स्थापित करण्यासाठी एक पथक रवाना करण्यात आल्याची माहिती भारतीय नौदलानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. या संदर्भात राज्य सरकार आणि तज्ज्ञांच्या सहकार्यानं काम सुरू असल्याचं नौदलानं म्हटलं आहे. राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल कोसळला. त्यापार्श्वभूमीवर नौदलानं आज हे निवेदन जारी केलं आहे.

 

दरम्यान, हा पुतळा कोसळणं हा अपघात असून त्या जागी १०० फूट उंचीचा पुतळा उभारावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. केसरकर यांनी राजकोट इथं संबंधित ठिकाणाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. या ठिकाणी धक्का उभारून सिंधुदुर्गपर्यंत फेरीद्वारे वाहतूक सुरू केली, तर हे स्मारक पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र होऊ शकतं, असंही केसरकर म्हणाले. पुतळा कोसळणं हा एक अपघात आहे आणि त्या दृष्टीनेच सर्वांनी त्याकडे पहावं. या अपघाताची चौकशी शासन करेल, असं आश्वासन केसरकर यांनी दिलं.

****

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी बाब असून पुतळा कोसळल्या प्रकरणी फक्त ठेकेदार आणि अधिकारी नाही तर राज्य आणि केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबई इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. छत्रपतींचा पुतळा उभारणीचे काम तज्ञ आणि अनुभवी व्यक्तीला द्यायला हवं होतं, तसंच समुद्रातील खारे पाणी, वाऱ्याचा वेग या सर्व बाबींचा अभ्यास करायला हवा होता, असं नमूद करत, श्रेय घेण्याच्या नादात सरकारने कामाच्या दर्जाकडे लक्ष दिलं नाही, अशी टीका पटोले यांनी केली आहे.

****

रत्नागिरीत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या दोषी व्यक्तीला लवकरात लवकर शोधून काढून कडक कारवाई करण्याचे निर्देश, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. सामंत यांनी आज पीडितेची आणि तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्याची माहितीही सामंत यांनी पत्रकारांना दिली. प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक अर्थात एसआयटीची स्थापना केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. या पथकात महिला निरीक्षक, दोन महिला उपनिरीक्षक आणि इतर पोलीस कर्मचारी असून, त्यात तांत्रिक-वैज्ञानिक तपासाचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.

****

महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना वेदनादायी असून यातल्या नराधमांना भर चौकात शिक्षा दिली पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी दिली आहे. आज लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील वलांडी इथं आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या जन सन्मान पद यात्रेत त्या माध्यमांशी बोलत होत्या. चुकीच्या नॅरेटिव्हमुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीसह भाजपला फार वाईट परिणाम बघायला मिळाले. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत विजयाच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचं, मुंडे यांनी सांगितलं.

****

नेपाळ बस अपघातातल्या सात जखमींना विमानाने मुंबई इथं आणण्यात आलं असून, त्यांना उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी या जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. या जखमींपैकी तिघांवर उद्या शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. तसंच आणखी चार जखमींना उद्या नेपाळहून मुंबईत आणण्यात येणार असून, त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. या सर्व जखमींना सर्वतोपरी मदत करण्यात येत असून, उपमुख्यमंत्री कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या वैद्यकीय सहायता कक्षामार्फत समन्वय ठेवला जात आहे.

****

 

दिल्ली मद्य धोरणातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या कैदेत असलेल्या भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के कविता यांना सर्वोच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. कविता या गेल्या ५ महिन्यांपासून न्यायालयीन कैदेत असून सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून कविता यांची चौकशी पूर्ण झाल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

****

नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिव देहावर आज नांदेड जिल्ह्यात नायगाव इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज्य सरकारमार्फत पुष्पचक्र अर्पण करत चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड महापालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. पोलीस दलातर्फे हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून दिवंगत खासदार चव्हाण यांना अखेरची सलामी देण्यात आली.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे चव्हाण यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून हैदराबाद इथं उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, काल पहाटे त्यांचं निधन झालं. चव्हाण यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त होत आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी, चव्हाण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत, त्यांचं निधन हे काँग्रेस परिवारासाठी कधीही भरून न येणारं नुकसान असल्याचं म्हटलं आहे.

****

प्रत्येक व्यक्तीने पावसाळ्यात वृक्षारोपण करून त्याचं संगोपन केल्यास भविष्यामध्ये पृथ्वीचा समतोल राखला जाऊ शकतो, असं छत्रपती संभाजीनगर इथल्या देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक तेजनकर यांनी म्हटलं आहे. आज देवगिरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय  सेवा योजना विभागामार्फत एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत पाचशे झाडं लावण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. निसर्गामध्ये होणाऱ्या बदलामुळे अनियमित पाऊस पडत असून, यामुळे तापमानामध्ये दिवसेंदिवस वृद्धी होत असल्याकडे तेजनकर यांनी लक्ष वेधलं.

****

ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे. हा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज असल्याचं, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनवणे यांनी म्हटलं आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या घनशेत या गावी अश्वमेध सामाजिक संस्थेने दिलेल्या ५१ किलो बियाणातून २० हजार सीडबॉल तयार करण्यात आले. हे सिडबॉल आज विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्या श्रमदानाने घनशेत इथल्या जंगलात टाकण्यात आले, त्यावेळी कुलगुरू बोलत होते. जागतिक पातळीवर पर्यावरण संवर्धनाची मोठी गरज निर्माण झाल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

****

महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं येत्या ३ ऑक्टोबरपासून दुबई इथं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूझिलंड आणि पाकिस्तानचा समावेश गट अ मध्ये आहे, तर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलँड यांचा समावेश गट ब मध्ये करण्यात आला आहे. प्रत्येक संघ दोन गट सामने खेळेल, ६ ऑक्टोबरला भारत पाकिस्तान सामना होणार आहे. १७ आणि १८ ऑक्टोबरला विश्वचषकाचे उपांत्य सामने तर २० ऑक्टोबरला अंतिम सामना होणार आहे.

****

पॅरालम्पिक क्रीडा स्पर्धांना उद्यापासून पॅरिस इथं प्रारंभ होत आहे. ८४ खेळाडूंचं भारतीय पथक पॅरिसला दाखल झालं असून, विविध १२ क्रीडा प्रकारांमध्ये हे खेळाडू सहभागी होणार आहेत. टोक्यो पॅरालम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाच सुवर्णांसह १९ पदकं जिंकली होती.

****

अमेरीकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा टेनिसपटू सुमित नागल याचं आव्हान संपुष्टात आलं आहे. या स्पर्धेत भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना, युकी भांब्री आणि एन श्रीराम बालाजी यांचे दुहेरीतले सामने व्हायचे आहेत.

****

 

 

 

हवामान

येत्या दोन दिवसात, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

जालना शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात आज काही वेळ पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या दरम्यान, नाशिक जिल्ह्यातल्या पावसाचा जोर कमी झाल्यानं, जिल्ह्यातल्या धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून ४५ हजार ७६९ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडलं जात आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...