Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 30 August
2024
Time: 7.10
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
· पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
हस्ते आज डहाणू इथं वाढवण बंदराचं भूमीपूजन
· ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवरील
बंदी केंद्र सरकारकडून शिथिल
· आदिवासी भागातल्या पेसा कायद्यांतर्गत
भरतीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन सकारात्मक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन
· मराठा आरक्षण आंदोलमकर्ते
मनोज जरांगे यांचं २९ सप्टेंबरपासून पुन्हा आमरण उपोषण
आणि
· पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत
भारतीय क्रीडापटूंची घोडदौड, आज तीन ऍथलीट पदकासाठी उतरणार मैदानात
सविस्तर बातम्या
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी ११ वाजता मुंबईतल्या जिओ कन्व्हेंशन
सेंटरमध्ये ग्लोबल फिन्टेक फेस्टचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. पेमेंटस कौन्सिल
ऑफ इंडिया, नॅशनल
पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि फिनटेक कन्व्हर्जन्स कौन्सिल यांनी हा महोत्सव आयोजित
केला आहे. त्यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमाराला पालघरच्या सिडको मैदानावर त्यांच्या
हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. पालघर इथं डहाणू गावात ७६
हजार कोटी रूपयांच्या वाढवण बंदराचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
हे
बंदर महाराष्ट्रासोबत देशाची वेगळी ओळख निर्माण करायला मदत करेल, असा विश्वास, केंद्रीय बंदर, नौकानयन आणि जलमार्ग मंत्री
सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केला आहे. ते काल पालघर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते.
आशिया खंडातलं हे सर्वात मोठं बंदर असेल आणि जगातल्या आघाडीच्या १० बंदरामध्ये याचा
समावेश असेल. या बंदरामुळे १२ लाख लोकांना प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्ष रोजगार मिळणार
असल्याचं सोनोवाल यांनी सांगितलं.
****
ऊसाच्या
रसापासून इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी केंद्र सरकारनं उठवली आहे. केंद्रीय ग्राहक
संरक्षण, अन्न
आणि नागरी पुरवठा मंत्रालयाकडून काल याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली.
उसाचा
रस, बी-हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल तयार करण्यास केंद्र सरकारनं
परवानगी दिल्यानं राज्यातल्या साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीची परवानगी द्यावी
यासंदर्भात वेळोवेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता.
****
पेसा
क्षेत्रातल्या भरतीचा प्रश्नासह इतर विषयांबाबत काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. आदिवासी भागातल्या पेसा कायद्यांतर्गत भरतीचा प्रश्न
सोडवण्यासाठी शासन सकारात्मक आहे, सर्वोच्च न्यायालयात याबाबत दाखल याचिकेचा निकालाच्या
अधीन राहून आदिवासी उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत विनंती न्यायालयाला करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
****
दरम्यान, काल मुंबईत एका खासगी वाहिनीला
दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्र हे देशाचं विकास इंजिन असून गेल्या दोन वर्षात
महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पन्नातला वाटा सर्वाधिक असल्याचं नमूद केलं. राज्याची
एक ट्रिलियनची अर्थव्यवस्था असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकार उपाययोजना
करतं असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
सिंधुदुर्ग
जिल्ह्यात राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत जे घडलं ते दुर्दैवी
असून, याप्रकरणी
दोषींवर कारवाई होणारच, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते
काल बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेदरम्यान बोलत होते. कृषीमंत्री
धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलतांना, लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत बीड जिल्हा राज्यात
तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं सांगितलं.
****
राज्यात
कणा नसलेलं सरकार असल्याची टीका, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष
जयंत पाटील यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात तलाठ्याच्या डोळ्यात
मिरची पूड टाकून त्यांची हत्या केल्याची घटना परवा घडली, या पार्श्वभूमीवर त्यांनी
आपल्या ट्वीट संदेशात हे मत व्यक्त केलं.
****
मुख्यमंत्री
माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात मिळालेली रक्कम, पीक विमा, पीककर्ज यासह कोणत्याही
शासकीय योजनेचं अनुदान कपात न करता पूर्णपणे लाभार्थ्यांना देण्याचे निर्देश, राज्याचे पणन मंत्री तसंच
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी बँकांना दिले आहेत. काल छत्रपती
संभाजीनगर इथं सर्व सरकारी योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातल्या कन्नड, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर आणि वैजापूर
या चार तालुक्यात पिकविम्याची रक्कम काही कारणास्तव वितरित झाली नाही, याबाबतच्या तांत्रिक अडचणी
दूर करण्यासाठी पिकविमा कंपनीसाठी कृषी विभागानं पाठपुरावा करावा आणि तात्काळ शेतकऱ्यांना
पीक विम्याची रक्कम उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथल्या
विविध उद्यान विकास आणि इतर कामांचं काल पालकमंत्री सत्तार यांच्या हस्ते भूमिपूजन
करण्यात आलं.
****
मराठा
आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी २९ सप्टेंबरपासून पुन्हा आमरण उपोषण करण्याचा
निर्धार व्यक्त केला आहे. ते काल जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं बोलत होते. ओबीसी
प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या वर्षी २९ ऑगस्ट रोजी पुकारलेल्या
आंदोलनाची वर्षपूर्ती झाल्यानिमित्तानं जरांगे यांनी काल गोदापट्ट्यातील १२३ गावांच्या
आंदोलक समन्वयकांची आंतरवाली इथं बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी उपोषणाचा निर्धार व्यक्त
केला. दरम्यान, जरांगे
यांच्या या निर्णयाला उपस्थित समाजबांधवांनी विरोध करत, हा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या तीन सप्टेंबरला मुंबईत विधान भवनात
'उत्कृष्ट
संसदपटू' आणि
'उत्कृष्ट
भाषण' पुरस्कार
प्रदान केले जाणार आहेत. विधानसभेचे अध्यक्ष विधीज्ञ राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या
उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी ही माहिती दिली. विधान परिषद आणि विधान सभा अशा दोन्ही
सभागृहांतल्या सन २०१९ ते २०२४ या कालावधीतले हे पुरस्कार आहेत. यावेळी "वरिष्ठ
सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व" या ग्रंथाचं प्रकाशनही करण्यात येणार आहे.
****
राज्य
आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्कांची
घरं मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हटलं आहे. नॅशनल
रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्यावतीनं काल मुंबईत झालेल्या ‘द रिअल इस्टेट
फोरम २०२४’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. राज्य शासनानं महिलांना गृहखरेदीमध्ये
एक टक्का मुद्रांक शुल्क सवलत जाहीर केली असून, याचा रिअल इस्टेट उद्योगाला अप्रत्यक्षपणे मोठा फायदा
होणार असल्याचं सावे यांनी सांगितलं.
****
राष्ट्रीय
क्रीडा दिन काल विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. हॉकीचे जादुगार
मेजर ध्यानचंद यांना देशभरातून अभिवादन करण्यात आलं. दिल्लीत मेजर ध्यानचंद राष्ट्रीय
क्रीडा संकुलात युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय तसंच राज्यमंत्री रक्षा
खडसे यांनी ध्यानचंद यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय छात्र सेना-एनसीसीच्या
शहरातल्या विद्यार्थ्यांची यावेळी रन फॉर फिटनेस ही दौड घेण्यात आली. अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी
यात सहभागी झाले होते.
****
नांदेड
इथं जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांचा काल
समारोप झाला. क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडू तसंच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थींचा
मनपाचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
पॅरालम्पिकमध्ये
नांदेड जिल्हयाचा गौरव करणाऱ्या भाग्यश्री जाधव तसंच लता उमरेकर यांनाही यावेळी सन्मानित
करण्यात आलं.
****
महाराष्ट्र
प्रदेश महिला काँग्रेस कमेटी च्या वतीनं काल नागपूर इथं संविधान चौकात नारी न्याय आंदोलन
करण्यात आलं. महिलांना न्याय देण्याकरता देशातल्या अनेक राज्यात हे आंदोलनं करण्यात
येणार असल्याचं महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यांनी सांगितलं.
****
बदलापूर
बाललैंगिक अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ काल छत्रपती संभाजीनगर इथं शिवसेना उद्धव
बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी च्या वतीनं, क्रांती चौक ते गुलमंडी पर्यंत वाहन फेरी काढण्यात
आली.
****
मालवण
मधल्या राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ काल छत्रपती
संभाजीनगर इथं क्रांती चौक परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात
आलं.
****
लातूर
इथं नव्यानं उभारण्यात येत असलेल्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामाची माजी
मंत्री आमदार अमित देशमुख यांनी काल पाहणी केली. बार्शी रस्त्यावर नवीन एमआयडीसी भागात
जवळपास ११२ एकर जागेत बाजार समिती उभारण्यात येत आहे. या ठिकाणी आठ लिलाव कक्ष, सुमारे चौदाशे गाळे, सुसज्ज वाहनतळ आणि इतर आवश्यक
सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. देशमुख यांनी या सर्व कामांची पाहणी करून
आवश्यक त्या सूचना केल्या.
****
धाराशिव
जिल्ह्यातल्या उमरगा इथं आजपासून एक सप्टेंबर पर्यंत आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्ये
या विषयावर डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन सकाळी
१० ते ५ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुलं राहणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
पॅरिस
पॅरालिम्पिक स्पर्धेत तिरंदाजीच्या मिश्र प्रकारात शितल देवी आणि राकेश कुमार यांनी
संयुक्तरित्या १३९९ गुणांसह नवा विक्रम नोंदवला. दोन सप्टेंबर रोजी ही जोडी उपांत्यपूर्व
फेरीत खेळेल.
टोक्यो
पॅरालिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी अवनी लेखरा १० मीटर एअर रायफल स्पर्धेत खेळणार
आहे.
ऍथलेटीक्समध्ये तीन पॅरा
ऍथलीट आज पदकासाठी खेळतील.
****
No comments:
Post a Comment