Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 31 August 2024
Time: 01.00 to
01.05 PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३१ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
महिलांवरील अत्याचार आणि मुलांची सुरक्षा ही समाजासाठी
गंभीर चिंतेची बाब असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या भारत मंडपम् इथं आज जिल्हा न्यायपालिकेच्या
दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं उद्घघाटन केल्यानंतर ते बोलत होते.
महिलांच्या सुरक्षेसाठी देशात अनेक कठोर कायदे करण्यात
आले आहेत, मात्र ते अधिक सक्रिय करण्याची गरज
त्यांनी व्यक्त केली. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये जितक्या वेगानं निर्णय
घेतले जातील, तितकी महिलांच्या सुरक्षेची अधिक
खात्री होईल, असंही ते म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी
सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुद्रांक आणि नाण्याचं
अनावरण केलं.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी. वाय.
चंद्रचूड यांनी आपल्या अभिभाषणात कायद्याच्या चौकटीचा आणि समाजाचा विचार भारतीय न्यायव्यवस्थेत
केला गेला असल्याचं म्हटलं. या परिषदेत केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम
मेघवाल, ऍटर्नी जनरल आर. व्यंकटरमणी आदी
उपस्थित होते.
****
भाजपच्या आमदारांच्या शिष्टमंडळानं आज दिल्लीत राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन दिल्लीतलं आदमी पक्षाच्या नेतृत्वातलं सरकार बरखास्त
करण्याची मागणी केली आहे. दिल्ली विधानसभेचे
विरोधी पक्षनेते बिजेन्द्र गुप्ता यांच्या अध्यक्षतेखालील या शिष्टमंडळानं या संदर्भातलं
निवेदन राष्ट्रपती मुर्मू यांना दिलं. भाजपनं
यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल
चिंता व्यक्त केली तसंच या सरकारच्या कार्यपद्धतीमुळं आवश्यक सेवा तसंच दिल्लीच्या
जनतेसाठीच्या कल्याणकारी कार्यक्रमांवर दुष्परिणाम होत असल्याचंही नमूद केलं. या प्रकरणी
राष्ट्रपतींचा तात्काळ हस्तक्षेप अत्यंत महत्वपूर्ण असल्याचं भाजपनं म्हटलं आहे.
****
जगभरातल्या सर्व डिजिटल व्यवहार करणाऱ्या ‘ॲप्स’ना भारताच्या
‘युपीआय ॲप’नं मागे टाकलं आहे. डिजिटल माध्यमातून गेल्या एप्रिल ते जुलै या तीन महिन्यांच्या
कालावधीत व्यवहारांमध्ये ३७ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. यामाध्यमातून ८१ लाख कोटी
रुपयांचे डिजिटल व्यवहार झाले आहेत. ‘ग्लोबल पेमेंट्स हब पे सिक्युअर’ या संस्थेच्या
सर्वेक्षणानुसार, प्रत्येक सेकंदाला ३
हजार ७२९ हून अधिक डिजिटल व्यवहार ‘युपीआय’च्या माध्यमातून झाले आहेत.
****
नाशिक - डहाणू नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पासाठी
अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी एकूण दोन कोटी ५० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यास रेल्वे
मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. त्र्यंबकेश्वर आणि वाणगाव मार्गे नाशिक ते डहाणू हा १००
किलोमीटरचा रेल्वे मार्ग दोन प्रमुख शहरांना जोडेल.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात
दर्शनासाठी आणि नाशिकमधील पंचवटी इथं दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांना रेल्वेसेवा
उपलब्ध करून देत, पर्यटनाला चालना देण्यासाठी
हा नवीन रेल्वे मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळं नाशिक आणि पालघर जिल्ह्यातली अनेक
शहरं जोडली जातील तसंच या प्रदेशातल्या आर्थिक वाढ आणि विकासाला चालना मिळेल.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या गुलमोहर कॉलनी परिसरातील
राजीव गांधी स्टेडियम मधल्या बहु उद्देशीय क्रीडा संकुलाचं आज भूमीपूजन झालं. राज्याचे
गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार डॉक्टर भागवत कराड, महानगर पालिका आयुक्त तथा मुख्य
प्रशासक जी. श्रीकांत यावेळी उपास्थित होते.
****
मोसमी पावसाचा मुक्काम यंदा लांबण्याची शक्यता हवामान
विभागानं व्यक्त केली आहे. मान्सूनचा मुक्काम वाढला तर रब्बी पिकांना त्याचा फायदा
होणार असून, रब्बी लागवडीचं क्षेत्रही त्यामुळं
वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, येत्या चोवीस तासांत मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची
शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तसंच जालना जिल्ह्यात येत्या तीन सप्टेंबरपर्यंत
येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन या जोडीनं अमेरिकन ओपन
टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आता उपांत्यपूर्व
फेरीत या जोडीचा सामना अर्जेंटिनाच्या आंद्रेस मोल्टेनी आणि मॅक्सिमो गोन्झालेझ यांच्याशी
होईल. मिश्र दुहेरीतही रोहन बोपण्णा आणि अल्डिला सुतजियादी यांनी डेमी श्युअर्स आणि
स्पेनच्या टीम पुट्झ या डच जोडीचा पराभव करून उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
****
No comments:
Post a Comment