Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 31
August 2024
Time: 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३१ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
नवी
दिल्ली इथं जिल्हास्तरीय न्यायिक अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन
करण्यात आलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज या संमेलनाना सुरुवात
झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधत पंतप्रधानांच्या
हस्ते या परिषदेत एका नाण्याचं तसंच टपाल तिकीटाचं अनावरण करण्यात येणार आहे. सर्वोच्च
न्यायालयाच्या वतीनं नवी दिल्लीतल्या भारत मंडपम् इथं आयोजित या दोन दिवसीय संमेलनात
प्रारुप आराखडा, समाविष्ट न्यायालयीन कक्ष, न्यायिक सुरक्षा, खटल्यांचं व्यवस्थापन आणि प्रशिक्षणासह जिल्हा न्यायपालिकेच्या मुद्द्यांवर पाच
सत्र होणार आहेत. उद्घघाटन कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती
डी. वाय. चंद्रचूड, केंद्रीय
कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल तसंच अटॉर्नी जनरल आर. व्यंकटरमणी उपस्थित
आहेत.
****
राज्यातील
आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोगाकडून राज्यांमधल्या मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या दुसऱ्या
टप्प्याचा “विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम ’२५ जून ते ३० ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात
आला. या कार्यक्रमानुसार, राज्यातील सर्व मतदार नोंदणी
अधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये, तसंच
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या तसंच जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर
अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रारुप मतदार यादीपेक्षा अंतिम मतदार
यादीमध्ये राज्यात १६ लाख ९८ हजार ३६८ मतदारांची संख्या वाढली आहे.
****
राज्यभरातल्या
शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आठवडाभरात दुध अनुदान जमा होईल, अशी माहिती पुणे दुग्धविकास आयुक्त प्रशांत मोहोड यांनी दिली
आहे. राज्यातल्या सर्व दूध संघांनी शेतकऱ्यांची माहिती संकेतस्थळावर तत्काळ भरावी.
राज्य सरकारकडून २५६ कोटी रुपये दुग्धविकास विभागाकडे वर्ग झाले आहेत. कागदोपत्री तयारी
पूर्ण होताच दुध अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं मोहोड यांनी सांगितलं.
****
राष्ट्रवादी
काँग्रेसचे सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणूक अतिशय गांभीर्यानं घ्यावी, असं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित पक्षाच्या राज्यस्तरीय महिला आणि युवा पदाधिकारी अधिवेशनात
काल ते बोलत होते.
आपण
धर्मनिरपेक्ष विचार सोडलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिव - शाहू - फुले - आंबेडकरांच्या
विचारधारेनं पुढं चालला आहे, हेही पवार यांनी स्पष्ट केलं.
****
लातूर
शहर महानगरपालिकेमार्फत वर्षाच्या सुरुवातीला नियमितपणे कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांसाठी
देण्यात आलेल्या विविध सवलतींची आज ३१ ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे . चालू वर्षात जवळपास
२१ हजारांहून अधिक मालमत्ता धारकांनी कर सवलतींच्या लाभ घेतला असून या माध्यमातून लातूर
महापालिकेनं २५ कोटी रुपयांची विक्रमी वसुली केली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी आजही
सर्व क्षेत्रीय कार्यालयं सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे
****
१९६५
आणि १९७१ च्या युध्दात सहभागी झालेले आणि समर सेवा स्टार मेडल तसंच पूर्वी स्टार किंवा
पश्चिमी स्टार मेडल मिळालं आहे, अशा
माजी सैनिकांसाठी युद्ध सन्मान योजना सुरु करण्याचं प्रस्तावित आहे. या युद्धात भाग
घेतलेल्या आणि मेडल मिळालेल्या सैनिक, शहीदांच्या पत्नींना केंद्रिय सैनिक बोर्डाकडून एकरकमी १५ लाख रुपये देण्यासंदर्भात
युद्ध सन्मान योजना तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या युद्धांमध्ये सहभागी
परभणी जिल्ह्यातल्या माजी सैनिकांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज येत्या ५ सप्टेंबरपर्यंत
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
नाशिक
जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या दमणगंगा-अप्पर वैतरणा-कडवा-देवलिंग
या नदीजोड प्रकल्पाला जलसंपदा विभागाच्या तांत्रिक सल्लागार समितीनं नुकतीच मान्यता
दिली. पुढच्या कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडं
पाठवला असून त्यानंतर अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव लवकरच शासनाकडं पाठवला जाईल, अशी माहिती नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी काल दिली.
****
येत्या
चोवीस तासात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं
व्यक्त केली आहे.
****
No comments:
Post a Comment