Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 29 August 2024
Time: 01.00 to
01.05 PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २९ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
सरकारने केंद्रीय लोकसेवा आयोग - युपीएससीला उमेदवारांची
ओळख पडताळण्यासाठी आधार आधारित प्रमाणीकरण करण्याची परवानगी दिली आहे. परिक्षेसाठी
नोंदणी करताना तसंच परिक्षेच्या विविध टप्प्यावर आयोगाला हे प्रमाणीकरण करता येईल.
बडतर्फ प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांनी खोटी माहिती दाखवून अनेक वेळा युपीएससीची
परिक्षा दिल्याच्या प्रकरणानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात
राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत आहे. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री डॉ. मनसुख
मांडवीय यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदानावर असलेल्या
ध्यानचंद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सर्व नागरीकांनी त्यांच्या
व्यग्र वेळापत्रकातून एक तास काढून, आपल्या आवडीचा एक खेळ खेळावा, असं आवाहन मांडवीय यांनी केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिडा दिनानिमित्त समाजमाध्यमांवर
दिलेल्या संदेशात, मेजर ध्यानचंद यांना
अभिवादन केलं आहे. खेळाबद्दल आत्मियता असलेल्या आणि खेळात देशाचं नाव उंचावलेल्या सर्वांचं
कौतुक करण्याचा हा दिवस असल्याचं ते म्हणाले. खेळाला समर्थन देऊन अधिकाधिक युवकांना
खेळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
****
जम्मू काश्मीरमध्ये दोन वेगवगेळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत
तीन दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त आहे. कुपवाडा मधल्या माछिल इथं दोन, तर तंगधार इथं एक दहशतवादी मारला गेला असून, अद्याप चकमक सुरु असल्याचं सुरक्षा दलानं म्हटलं आहे.
****
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्याची
अधिसूचना आज जारी झाली. सहा जिल्ह्यातल्या २६ विधानसभा मतदारसंघाचा या टप्प्यात समावेश
असून, आजपासून येत्या पाच सप्टेंबर पर्यंत
उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. दुसर्या टप्प्यात २५ सप्टेंबरला मतदान होणार आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार
यांची जनसन्मान यात्रा आज बीड इथं दाखल झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ. योगेश
क्षीरसागर यांनी पवार यांचं स्वागत केलं. यानंतर दुचाकी रॅलीला सुरुवात झाली असून, छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर पवार यांची जाहीर
सभा होणार आहे.
दरम्यान, या यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काही अनुचित प्रकार घडू
नये म्हणून पोलिसांनी उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांना स्थानबद्ध केलं असून, शरद पवार गटाच्याही पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावल्या आहेत.
तत्पूर्वी अजित पवार यांनी नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव
इथं काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं
सांत्वन केलं.
****
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या
जीवन आणि कार्याचं एकविसाव्या शतकातील महत्त्व आणि समयोचितता’ या विषयावर उद्यापासून
दोन दिवस राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवानिमित्त
आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडे तीनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या
निमित्तानं या आंतरविद्याशाखीय आणि बहुभाषिक राष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं आहे. या
परिषदेसाठी देशभरातून आणि राज्यातून ७५ शोधनिबंधांची नोंदणी झाली असून, त्यांच्या सादरीकरणासाठी नऊ समांतर सत्रं होणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांची अष्टक्रांती, राज्यनीती, शिवकालीन कागदपत्रांच्या अभ्यासाची पद्धत या विषयांवर तज्ञांची
व्याख्यानं होणार आहेत. अमृतमहोत्सवानिमित्त विशेष टपालतिकिटाचंही प्रकाशन केलं जाणार
आहे.
****
नांदेड जिल्ह्याने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाअंतर्गत
उत्कृष्ट कामगिरी करून राज्यात अव्वल स्थान पटकावलं आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या
आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्ह्यात ग्रामीण भागातल्या गरोदर
मातांना आणि बालकांना विशेष आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी दरमहा नऊ तारखेला जिल्ह्यातल्या
सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गरोदर मातांच्या तपासणीसाठी शिबिर आयोजित करण्यात
येतं. जिल्ह्यातल्या सर्व गर्भवतींनी प्राथमिक
आरोग्य केंद्रात जाऊन या सेवांचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी
अधिकारी मीनल करनवाल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी केलं आहे.
****
राज्यात मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना लागू करण्यात
आली असून, या अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातल्या
कृषि पंप ग्राहकांचं अंदाजे ४६ कोटी रुपयांचं वीज बील माफ करण्यात येणार आहे. हिंगोली
मंडळांतर्गत येणाऱ्या हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव या पाच तालुक्याचा यात समावेश आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं येत्या नऊ सप्टेंबरला विभागीय स्तरावरील
लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या दिवशी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात
हे कामकाज सुरू होणार असून, नियमित विभागीय लोकशाही दिन संपल्यानंतर विभागीय महिला लोकशाही
दिनाचं कामकाज होणार आहे.
****
No comments:
Post a Comment