Wednesday, 28 August 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 28.08.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 28 August 2024

Time: 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २८ ऑगस्ट २०२ सकाळी.०० वा.

****

प्रधानमंत्री जनधन योजनेला आज एक दशक पूर्ण झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ ऑगस्ट २०१४ रोजी ही योजना सुरु केली होती. हा जगातला सर्वात मोठा वित्तीय समावेशन उपक्रम असून, अर्थ मंत्रालय यामाध्यमातून उपेक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आधार देण्याचा प्रयत्न सातत्याने करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ५३ कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत.

****

देशात खरीप पिकांच्या पेरणीमध्ये या वर्षी लक्षणीय प्रगती झाली आहे. एकूण लागवडीखालील क्षेत्र एक हजार ६५ लाख हेक्टरपेक्षा जास्त असून, तुलनेनं गेल्या वर्षी याच कालावधीत अंदाजे एक हजार ४४ लाख हेक्टर क्षेत्रात पिकांची पेरणी झाली होती. कृषी विभागानं प्रसिद्ध केलेल्या खरीप पिकांच्या पेरणीच्या अहवालात ही माहिती देण्यात आली.

****

भारत लवकरच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे. ते काल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जारी केलेल्या जागतिक अहवालात नमूद करण्यात आलेल्या, भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा सात टक्के दराच्या आधारे बोलत होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं गेल्या महिन्यात जारी केलेल्या अहवालात २०२४-२५ साठी भारताचा सकल देशांतर्गत उत्पन्नवाढीचा अंदाज सहा पूर्णांक आठ टक्क्यांवरून सात टक्क्यांपर्यंत जाईल असं म्हटलं आहे.

****


वस्त्रोद्योग मंत्रालयानं प्रत्येकी पन्नास लाख रुपयांच्या अनुदानासह चार स्टार्ट-अपना मंजुरी दिली आहे. नवी दिल्लीत काल राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियानाच्या कार्यक्रम समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या पाच शिक्षण संस्थांना शैक्षणिक संस्था सक्षम करण्यासाठी सुमारे वीस कोटी रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलं आहे.

****

राज्याचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्यासह सहा जणांविरुद्ध जबरदस्ती आणि बेकायदेशीर कृत्यांच्या आरोपांवरून काल ठाणे इथल्या ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. व्यावसायिक संजय पुनामिया यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. मे २०२१ ते ३० जून २०२४ या कालावधित पांडे यांनी खोट्या गुन्ह्याच्या धमक्या देणं, पैसे वसुल करणं आणि खोटे दस्तऐवज तयार करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पुनामिया यांनी केला आहे.

****

केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिले जाणारे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार काल जाहीर झाले. यामध्ये राज्यातल्या दोन शिक्षकांचा समावेश आहे. कोल्हापूर इथल्या सौ. स. म. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधले कलाशिक्षक सागर बगाडे आणि गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातल्या आदिवासीबहुल जाजावंडी इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतय्या बेडके यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

****

ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं काल पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं; त्या ८१ वर्षांच्या होत्या. गेली अनेक दशकं मराठी आणि हिंदी कलाविश्वात त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. माहेरचा आहेर, मानाचं कुंकू, आज झाले मुक्त मी; अशा मराठी चित्रपटात, तसंच ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘लग्नाची बेडी’ या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या.

****

पेरूमधील लीमा इथं सुरु असलेल्या २० वर्षांखालील जागतिक अथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे जय कुमार, नीरु पाठक, रिहान चौधरी आणि संद्रामोल साबू यांनी काल ४ बाय 400 मीटर मिश्र रिले प्रकारांत पात्रता फेरी पार केली आहे. यासह भारतीय संघ २० प्रतिस्पर्धी संघांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.

****

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मानद सचिव जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद - आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. एक डिसेंबरपासून ते पदभार स्वीकारतील. ३५ वर्षीय जय शाह, हे पद भूषवणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरले आहेत.

****

राज्याच्या विविध भागात कालही जोरदार पाऊस झाला. नाशिक शहरासह उपगरात रात्रभर पावसाचा जोर कायम होता, तर पहाटे मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गोदावरीची पाण्याची पातळी आणखी वाढली आहे. जिल्ह्यातल्या सर्वच धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी साडे ६४ टक्क्यांवर पोहोचली आहे. धरणात सध्या ६६ हजार ६६६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.

****

धाराशिव जिल्ह्यातलं तेरणा धरण पूर्ण भरलं आहे. यामुळे परिसरातल्या विहिरी आणि कुपनलिकेच्या पाणी पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांना बागायती शेती करण्यास मदत होणार आहे.

****

गुजरात मध्ये देखील मुसळधार पाऊस होत असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. वडोदरा भागात होत असलेल्या पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबई हून गुजरात कडे जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...