Thursday, 29 August 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 29.08.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 29 August 2024

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २९ ऑगस्ट २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      महिला अत्याचारांबद्दल सामाजिक आत्ममंथन व्हावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन

·      उदगीर इथल्या बुद्ध विहाराचं येत्या चार सप्टेंबरला राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण

·      औद्योगिक स्मार्ट शहरांमध्ये राज्यातल्या दिघीचा समावेश, २३४ नवीन शहरांमध्ये खासगी एफ एम रेडिओ वाहिन्यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

·      मालवण तालुक्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याप्रकरणी तांत्रिक संयुक्त समितीची स्थापना

·      हिंगोली जिल्ह्यात तलाठ्याचा प्राणघातक हल्ल्यात मृत्यू, एक हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात

आणि

·      शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना कुचराई केल्याप्रकरणी धाराशिव जिल्ह्यातल्या दहा बँकांविरुद्ध गुन्हे दाखल

सविस्तर बातम्या

राज्यघटनेने दिलेली स्त्री पुरुष समानता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करण्याची गरज, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे. काल सामाजिक संपर्क माध्यमांवरच्या संदेशात राष्ट्रपतींनी, महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, आत्ममंथन करण्याची गरज व्यक्त करत, कोणताही सभ्य समाज असे अत्याचार सहन करू शकत नसल्याचं म्हटलं आहे. कोलकात्याची ही एकमेव घटना नसून, अशा अत्याचार श्रृंखलेतली एक कडी असल्याची बाब अत्यंत वेदनादायी असल्याचं त्यांनी नमूद केलं. अशा घटनांबद्दल समाजात रोष निर्माण होणं स्वाभाविक असल्याचं सांगत, अशा घटनांच्या मूळापर्यंत पोहोचण्यावरही त्यांनी भर दिला. एक समाज म्हणून आपण स्वत:लाच कठोर प्रश्न विचारण्याची वेळ आली असल्याचं, राष्ट्रपतींनी आपल्या या संदेशात म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या चार सप्टेंबरला लातूर दौऱ्यावर येत आहेत. उदगीर इथं नगरपरिषदेने उभारलेल्या बुद्ध विहाराचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. राज्य शासनाच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानालाही राष्ट्रपती उपस्थित राहणार असल्याची माहिती, लातूर जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

****

केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमांतर्गत जागतिक दर्जाच्या १२ ग्रीनफील्ड औद्योगिक स्मार्ट शहरांना मान्यता दिली आहे. सुमारे २८ हजार ६०२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या या प्रकल्पात दहा राज्यांमध्ये सहा मुख्य औद्योगिक मार्गिका निर्माण केल्या जाणार आहेत. नव्यानं तयार होणाऱ्या जागतिक दर्जाच्या या ग्रीनफील्ड औद्योगिक स्मार्ट शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या दिघी या शहराचा समावेश आहे. या प्रकल्पातून सुमारे दहा लाख प्रत्यक्ष तर तीस लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.

देशभरातल्या २३४ नवीन शहरांमध्ये खासगी एफ एम रेडिओ वाहिन्या सुरू करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने काल मंजुरी दिली. मातृभाषांमधल्या स्थानिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देणं आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणं, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. याअंतगर्गत मराठवाड्यात लातूर, उदगीर आणि धाराशिव इथं रेडिओ वाहिन्या सुरू करण्यात येणार आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं काल रेल्वे मंत्रालयाच्या सुमारे सहा हजार चारशे छप्पन्न कोटी मूल्याच्या तीन प्रकल्पांना मान्यता दिली. यामुळे देशातली तेराशे गावं आणि अकरा लाख लोकसंख्या रेल्वेनं जोडली जाईल.

****


मालवण तालुक्यातल्या राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणं आणि एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ञ, आयआयटी तसंच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या घटनेसंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याठिकाणी शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातले उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समितीही नेमण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.    

****

दरम्यान, सिंधुदूर्ग जिल्ह्यात राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटना प्रकरणी राजकारण करणं थांबवावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. हा पुतळा नौदलानं उभारला होता, राज्य सरकारनं नाही, तरीसुद्धा या घटनेची चौकशी, दोषींवर कारवाई आणि भव्य पुतळ्याची उभारणी, या तीनही पातळीवर राज्य सरकार काम करत असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले...

नेव्ही यासंदर्भात चौकशी करून उचित कार्यवाही करेल. घटनेकरता कुठली गोष्ट जबाबदार होती. किंवा त्याच्यामध्ये काय चुका राहिल्या, यासंदर्भातला तो रिपोर्ट त्या ठिकाणी असेल. ऑलरेडी पी डब्‍ल्यू डी विभागाने एक एफ आय आर केलेला आहे. त्यामुळे त्यात जे सिव्हिलियन्स असतील त्यांच्यावर नेव्हीच्या रिपोर्ट नंतर पोलीस विभाग देखील कार्यवाही करेल. आणि दुसरं माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे, की आपण नेव्हीला मदत करून त्यांच्या मदतीनं त्याठिकाणी एक भव्य अशा प्रकारचा छत्रपती शिवरायांचा पुतळा हा उभारणार आहोत.

या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी काल या परिसराला भेट दिली. त्यावेळी ठाकरे आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्या समर्थकांनी एकमेकांवर दगडफेक केली. यात एक पोलीस आणि एक महिला असे दोन जण जखमी झाले. महाविकास आघाडीनं काल मालवण बंदची हाक देत, मोर्चाही काढला होता. दरम्यान, या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी येत्या रविवारी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथं निदर्शनं करणार आहे.

****

शेतकऱ्यांना पुढील वर्षात सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून दिवसाही वीजपुरवठा केला जाईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेदरम्यान काल हिंगोली वसमत इथं काल शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. दरम्यान, ही जनसन्मान यात्रा आज बीड इथं दाखल होत आहे.

****

हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात आडगाव-रंजेबुआ इथल्या तलाठ्याचा काल कार्यालयात झालेल्या प्राणघातक हल्ल्यात मृत्यू झाला. संतोष पवार असं या तलाठ्याचं नाव असून, प्रलंबित शेती कामानिमित्त आलेल्या एका इसमाने त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकत धारधार चाकूने वार केले. पवार यांना उपचारासाठी परभणीला नेत असतांना, त्यांचं निधन झालं. दरम्यान, एका हल्लेखोरास ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

****

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना कुचराई केल्याच्या आरोपाखाली धाराशिव जिल्ह्यातल्या दहा बँकांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पालकमंत्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या सूचनेनुसार धाराशिव इथल्या आनंदनगर पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल झाले आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. प्रतीक्षा गवारे हुंडाबळी आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपी डॉ. प्रीतम शंकर गवारे याला पोलिसांनी काल अटक केली. डॉ प्रतीक्षा यांनी गेल्या शनिवारी आत्महत्या केली होती, तेव्हापासून सदर आरोपी फरार होता.

****


प्रत्येक शाळा-महाविद्यालयात मुलींना निर्भय आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षक आणि सखी सावित्री समिती सदस्यांनी वेळोवेळी संवाद साधावा, असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. स्वामी यांनी काल फुलंब्री तालुक्यात पाथ्री इथल्या राजश्री शाहू विद्यालयातल्या विद्यार्थिनींशी संवाद साधला. सगळ्या मुलींनीही आपल्या आई-वडिलांसोबत आणि शाळेतल्या शिक्षकांसोबत संवाद साधावा आणि आपल्याला येणाऱ्या अडचणी त्यांना सांगाव्यात, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

शासनाच्या विविध विकासात्मक योजनांची कामं योग्य समन्वय ठेवून केल्यास विहित कालावधीत प्रगती साधता येईल, असा विश्वास नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी व्यक्त केला आहे. काल हदगाव तालुक्यात शिवपुरी इथल्या कोंडलिंगेश्वर मंदिर सभागृहात करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय सभा घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जलजीवन मिशन अंतर्गत गावस्तरावर ग्रामसेवकांनी सर्वेक्षण करून माहिती संकलित करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

****

हिंगोलीच्या जिल्हाधिकारीपदी धुळ्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश काल जारी करण्यात आले. जितेंद्र पापळकर यांची बदली झाल्यानंतर हिंगोलीचा पदभार अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्याकडे होता.

****

बांगलादेशात हिंदू अत्याचाराच्या निषेधार्थ काल धाराशिव शहरात काल सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदुरौद्र मोर्चा काढण्यात आला. हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारनं प्रयत्न करावेत, तसंच त्यांच्या सुरक्षेसाठी हस्तक्षेप करून, या हिंदूंचं पुनर्वसन करण्यासाठी मदत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

अंबाजोगाई इथंही काल याच संदर्भात मोर्चा काढण्यात आला. शहरातल्या सर्व व्यापारी पेठा आणि दुकानं काल बंद ठेवण्यात आली होती.

****

धाराशिव इथं काल जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव घेण्यात आला. या महोत्सवात करटुले, हादगा, चिघळपाथरी, आघाडा, बांबू, कवठ यासह ८० हून रानभाज्या आणि रानफळं विक्रीसाठी उपलब्ध होती. या महोत्सवाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी ७० टक्क्यावर पोहोचली आहे. धरणात सध्या ५६ हजार ८९६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.

****

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचं काल उद्घाटन झालं. या समारंभात भालाफेकपटू सुमित अंतिल आणि गोळाफेकपटू भाग्यश्री जाधव हे भारताचे ध्वजवाहक होते. या स्पर्धेत २४ भारतीय खेळाडू विविध १२ प्रकारात खेळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रीडापटूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...