Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 02 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याची मुदत ४ नोव्हेंबरला संपणार असून त्यानंतर दोनच दिवसांनी विविध पक्षांच्या प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. महाविकास आघाडीच्या प्रचाराला बुधवारी ६ नोव्हेंबर रोजी सुरुवात होणार आहे. मुंबईतील बीकेसी मैदानावर बुधवारी महाविकास आघाडीची सभा होणार आहे. या सभेला लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ ८ तारखेला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ नोव्हेंबरला महाराष्ट्रात येणार आहेत. महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ सभा या विधानसभा निवडणुकीत घेणार आहेत.
****
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असा प्रामुख्याने सामना असला तरी दोन्ही बाजूंनी बंडखोरीच्या फटाक्यांचे बारही उडत आहेत. सत्ताधारी महायुतीमध्ये अद्यापही ३६ जणांची बंडखोरी कायम आहे. भाजपामधील १९, शिवसेनेमधील १७ तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील २ जणांनी आपल्या बंडखोरीची वात पेटती ठेवली आहे. त्यामुळे हे बंडखोरांचे फटाके युतीला किती धक्का देणार हा प्रश्न कायम आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये २६ बंडखोरांची धूसफूस अद्यापही सुरूच आहे.
****
विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या तोफा धडाडण्यास अद्याप प्रारंभ झाला नसला तरी आरोपांच्या फुलबाज्या उडण्यास सुरुवात झाली आहे.
महत्त्वाचे राजकीय प्रश्न हाताळण्यात सत्ताधारी महायुतीला अपयश आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला आहे. बारामतीमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. महाविकास आघाडीकडे विकासाची दिशा आहे आहे. त्यामुळेच आम्ही राज्यात परिवर्तन घडवून आणू शकतो, असा विश्वासही पवारांनी यावेळी व्यक्त केला. सिंचन घोटाळ्याचा आम्ही उल्लेखही केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट करीत आर. आर. पाटील अतिशय निर्मळ मनाचे राजकीय व्यक्तीमत्व होते, असेही ते म्हणाले.
दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने राट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचनाच्या प्रश्नावरून १० वर्षे ब्लॅकमेल केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तर महाराष्ट्रात नवे उद्योग कोणते आले आहेत ते दाखवा असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी महायुती सरकारला केला आहे.
याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेसाठी उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेल्याचे म्हटले आहे. आपण शिवसेना वाचविण्यासाठी भाजपसोबत आल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
मुंबईच्या माहीम मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र माहीमची उमेदवारी जाहीर करताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विश्वासात घेतले नसल्याचे म्हटले आहे. माहीममध्ये विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनीही आपण माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले.
वरळीतील भाजपच्या उमेदवार शायन एन सी यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अरविंत सावंत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अरविंद सावंत यांनी मात्र आपलं विधान चुकीच्या पद्धतीने घेण्यात आल्याचं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
****
अहिल्यानगर-पुणे महामार्गावर आयकर विभागाने मोठी कारवाई करीत एका वाहनामधून २३ कोटी ७१ लाखांचे दागिने जप्त केले आहेत. राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरची आयकर विभागाची ही सर्वात मोठी कारवाई आहे.
****
दिवाळीच्या सुटीमध्ये देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी, आपल्या मूळ गावी जाण्याकडे नागरिकांचा कल असतो. त्यामुळेच रेल्वेने नागरिकांच्या सुविधेसाठी यंदाच्या दिवाळीत ७५०० जादा रेल्वे सोडल्या आहेत, असं रेल्वेकडून कळविण्यात आलं आहे. आज पाडव्याच्या दिवशीच रेल्वेने प्रवाशांसाठी १६८ जादा रेल्वे सोडल्या आहेत.
****
न्यूझिलंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यामध्ये अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा भारताने न्यूझिलंडविरुद्ध पहिल्या डावात आठ गडीबाद २२७ धावा केल्या आहेत. सलामीचा फलंदाज शुभमन गिल याने एक बाजू लावून धरत ९० धावांची खेळी केली.
मध्यंतरापर्यंत भारताच्या ५ गडी बाद १९५ धावा झाल्या होत्या. मध्यंतराच्या वेळी शुभमन गिल ७० तर रविंद्र जडेजा १० धावांवर खेळत होते. भारताकडून ऋषभ पंतनेही ६० धावांची खेळी करीत अर्धशतक झळकावलं आहे. न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात २३५ धावा काढल्या आहेत.
****
गेल्या दहा वर्षात देशातील रोजगारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केला आहे. राजधानी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
****
No comments:
Post a Comment