Tuesday, 12 November 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.11.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 11 November 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ११ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      स्वीप या मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत राज्यात ठिकठिकाणी चित्ररथ रवाना, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध उपक्रम

·      शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात प्रचारसभा

·      देशाचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी पदभार स्वीकारला

आणि

·      नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीसाठी गृहमतदानाला सुरुवात

****

स्वीप या मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत राज्यात ठिकठिकाणी केंद्रीय संचार ब्युरोचे चित्ररथ रवाना करण्यात आले. प्रत्येक गावात फिरुन या चित्ररथाच्या माध्यमातून मतदान करण्याचं आवाहन करण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून हा चित्ररथ रवाना करण्यात आला. मतदानाची टक्केवारी ७५ ते ८० टक्क्यापर्यंत वाढवण्यासाठी या चित्ररथाचा उपयोग होईल, असं जिल्हाधिकारी म्हणाले.

आपल्या जिल्हाभरामध्ये मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी या रथाचं आजपासून आपण प्रारंभ करत आहोत. आणि एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी आपल्याला हा कार्यक्रम राबवायचा आहे. आपल्या जिल्ह्यातल्या विशेषतः शहरातल्या मतदानाची टक्केवारी अतिशय चिंताजनक आहे. आणि भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाला ही चिंता वाटली पाहिजे की या पद्धतीने जर मतदानाची टक्केवारी कमी होत गेली तर लोकशाहीला धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.

 

केंद्रीय संचार ब्युरोचे सहायक संचालक माधव जायभाये यांच्यासह जिल्ह्याचे मतदान जनजागृती विषयी आयकॉन असलेले प्रेषित रुद्रवार, अर्चना गायकवाड, श्रेयस यांची याप्रसंगी उपस्थिती होती. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शिक्षकांनी मतदान जनजागृती विषयीचे फलक हाती घेऊन घोषणा दिल्या.

****

नांदेड विधानसभा मतदार संघातल्या गावामध्येही एलईडी व्हॅनद्वारे मतदार जनजागृती करण्यात येणार असून, या व्हॅनचं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, केंद्रीय संचार ब्युरोचे सुमीत डोडल उपस्थित होते. जिल्ह्यात मागील निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी कमी मतदान झालं आहे, त्याठिकाणी या व्हॅनद्वारे मतदार जनजागृती करण्यात येईल, यामुळे मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल, असं जिल्हाधिकारी म्हणाले.

****

अहिल्यानगर इथं देखील मतदार जनजागृती चित्ररथाला रथाला जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. ग्रामीण विकास महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यावेळी मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा होया पथनाट्याचं सादरीकरण केलं. शाहीर हमीद सय्यद यांच्या चमूने यावेळी मतदानावर आधारित गीतांचं सादरीकरण केलं.

सोलापूर इथं स्वीप मल्टीमीडिया व्हॅनचा शुभारंभ जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्या हस्ते झाला. राज्यात १५ जिल्ह्यांमध्ये आज हे चित्ररथ रवाना करण्यात आले.

****

 धाराशिव इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं मतदार जनजागृती यात्रेचा आज प्रारंभ झाला. मतदारांना मतदानाचं महत्त्व सांगून मतदान करण्याचं आवाहन या यात्रेतून करण्यात येणार आहे. मतदानाचा टक्का वाढावा, नवमतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावं हा यात्रेचा उद्देश असून, धाराशिव जिल्ह्यातल्या पाच तालुक्यातल्या ५० गावांमधून जवळपास एक लाख मतदारांपर्यंत ही यात्रा पोहोचणार आहे.

****

येत्या २० तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन तृतीयपंथी मतदार श्रीगौरी सावंत यांनी केलं आहे.

बाईट - श्रीगौरी सावंत

****

निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या कन्नड मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार संजना जाधव, तर वैजापूर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रमेश बोरनारे यांच्या प्रचारार्थ सभा झाल्या. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा महायुतीला निवडून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. महाविकास आघाडीनं अनेक योजना बंद केल्या. मात्र महायुतीचं सरकार सत्तेत आल्यावर या योजनांना नव संजीवनी दिली, असं ते म्हणाले.

****

निवडणुकीच्या अनुषंगाने आज छत्रपती संभाजीनगर इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. खासदार डॉ भागवत कराड, औरंगाबाद पूर्व मतदार संघाचे उमेदवार अतुल सावे यांनी महायुतीच्या काळात शहरात झालेल्या विकासात्मक कार्याची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या १४ तारखेला चिकलठाणा इथं सभा होणार असल्याची माहिती कराड यांनी यावेळी दिली.

औरंगाबाद मध्यचे महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारार्थ आज संध्याकाळी काढण्यात येणाऱ्या रॅलीत अभिनेते गोविंदा सहभागी होणार आहेत.

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी आज वेंदात नगर, कबीर नगर, एकनाथ नगर, हमाल वाडी, राहूल नगर, बाला नगर परिसरात परिवर्तन पदयात्रा काढली.

दरम्यान, जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे येत्या १४ नोंव्हेंबरला मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेणार असून, आज याठिकाणी उमेदवारांच्या हस्ते स्तंभ पूजा पार पडली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्या राज्यात पुणे, चिमूर आणि सोलापूर इथं सभा होणार आहेत. पुण्यात रोड शो आणि सभेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणात ही सभा होणार असून, या भागातले रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज पुणे जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.

****

देशाचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आज पदभार स्वीकारला. राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खन्ना यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या सोहळ्याला उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थित होते. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी १९८३ मध्ये वकिलीची सुरुवात केली. त्यांनी जानेवारी २०१९ पासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केलं आहे.

****

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी गृहमतदानाला आज सुरुवात झाली. दिव्यांग आणि ८५ वर्षावरील नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

****

२० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानानिमित्त जिल्ह्यातले आठवडी बाजार बंद ठेवावेत, असे आदेश बीडचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अविनाश पाठक यांनी दिले आहेत. बीड, आष्टी, माजलगाव, वडवणी, केज, परळी आदी तालुक्यात मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार अन्य दिवशी भरवावेत, असं त्यांनी या आदेशात नमूद केलं आहे.

****

राज्यातले शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य आणि शिक्षकेत्तर कर्मचारी राजकीय पक्षांच्या प्रचारात सहभागी झाल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांचा आदेश मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या वतीने करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शिक्षक सेलचे मराठवाडा अध्यक्ष किरण सोनटक्के यांनी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे या मागणीचं निवेदन सादर केलं.

****

धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यात भोईटी इथं अंमली पदार्थवरोधी विभागाच्या पथकानं २ हजार ८१६ किलो वजनाचा आणि ५ कोटी ६३ लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. या कारवाई वेळी आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून पुढील तपास सुरु आहे.

****

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी शिवकुमार याला उत्तर प्रदेशातल्या बहराईच इथून अटक करण्यात आली आहे. लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंध असल्याचं शिवकुमारनं पोलिसांनी केलेल्या चौकशीत कबूल केलं. शिवकुमारला मदत करणारे अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव, अखिलेशेंद्र प्रताप सिंह यांनाही अटक करण्यात आली आहे.

****

महिला आशियाई हॉकी अजिंक्यपद चषक २०२४ स्पर्धेला आजपासून बिहारमधे नालंदा इथल्या राजगीर इथं सुरुवात झाली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते या क्रीडा स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन झालं. या स्पर्धेत भारतासह चीन, जपान, मलेशिया, कोरिया आणि थायलंड देशांचे संघ सहभागी झाले आहेत. सलामीचा दक्षिण कोरिया आणि जपानमधला सामना दोन - दोन असा बरोबरीत सुटला.

****

भारताच्या अनाहत सिंगनं सिडनी इथं सुरू असलेल्या स्क्वॉश एनएसडब्ल्यू ओपन २०२४ स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलं आहे. तीचं हे वर्षातलं सातवं पीएसए चॅलेंजर विजेतेपद आहे. अंतिम फेरीत अनाहतनं हाँगकाँगच्या १५ वर्षीय हेलन तांगचा ३-१ असा पराभव केला.

****

दक्षिण मध्य रेल्वेनं गुरुनानक जयंती निमित्त हुजूर साहिब नांदेड ते बिदर दरम्यान पूर्णपणे अनारक्षित विशेष रेल्वे चालवण्याचं नियोजन केलं आहे. नांदेड ते बिदर ही गाडी १४ नोव्हेंबर रोजी नांदेडहून सकाळी साडे आठ वाजता सुटेल आणि परभणी, परळी, लातूर रोड, उदगीर, भालकी मार्गे बिदरला दुपारी चार वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी बिदरहून १६ नोव्हेंबरला दुपारी अडीच वाजता सुटेल आणि नांदेडला रात्री साडे अकरा वाजता पोहोचेल.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...