Sunday, 24 November 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.11.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 24 November 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      विकसित भारताच्या जडणघडणीत युवा वर्गाची भूमिका मोठी आणि महत्वाची - मन की बात मध्ये पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकार कोणत्याही मुद्यावर चर्चा करण्यासाठी तयार - संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू

·      झारखंडमध्ये झारखंड मुक्ति मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांचा सरकार स्थापनेचा दावा, येत्या २८ तारखेला नवीन सरकारचा शपथविधी

·      महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी अजित पवार यांची निवड

आणि

·      कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचं ऑस्ट्रेलियासमोर ५३४ धावांचं आव्हान

****

विकसित भारताच्या जडणघडणीत युवा वर्गाची भूमिका मोठी आणि महत्वाची असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात ते आज बोलत होते. या कार्यक्रमाचा ११६वा भाग आज प्रसारित झाला.

साथीयों विकसित भारत के निर्माण में युवाओं का रोल बहोत बडा है। युवा मन जब एकजुट होकर देश की आगे की यात्रा के लिये मंथन करते है, चिंतन करते है तो निश्चित रूप से इसके ठोस रास्ते निकलते है।

येत्या १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या १६२व्या जयंतीदिनी साजरा होणाऱ्या असलेल्या युवा दिनाच्या निमित्तानं, दिल्लीत ११ आणि १२ जानेवारी रोजी भारत मंडपम इथं विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग या उपक्रमाअंतर्गत युवा मेळाव्याचं आयोजन केलं असल्याची माहिती त्यांनी दिली. या मेळाव्यात देशाच्या तळागाळातून निवडलेले दोन हजार तरुण-तरुणी सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण लाल किल्ल्यावरून युवा वर्गाला राजकारणात येण्याचं आवाहन केलं होतं, त्याअनुषंगानंच या उपक्रमाचं आयोजन केलं असल्याचं ते म्हणाले. या उपक्रमातून युवा वर्गाला त्यांच्या कल्पना मांडायची संधी मिळेल तसंच त्या प्रत्यक्षात साकारण्यासाठी कृती आराखडाही तयार करता येईल असं म्हणत, आपण सारे मिळून देश घडवू या आणि देशाचा विकास करू या असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.

आज राष्ट्रीय छात्रसेना दिवस असल्याचं स्मरणही त्यांनी केलं. सध्याच्या काळात राष्ट्रीय छात्र सेनेमधल्या मुलींची संख्या २५ टक्क्यावरून वाढून ४० टक्क्यापर्यंत पोहचली असल्याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली.

जो देश आपला इतिहास जपतो, त्यांचं भविष्यही सुरक्षित असतं, याच उद्देशानं देशातल्या गावांचा इतिहास जतन करण्यासाठी एक निर्देशिका तयार करायचा प्रयत्न सुरू आहे, प्राचीन काळातील सागरी प्रवासाबद्दलच्या भारताच्या क्षमतेशी संबंधित पुरावे जतन करण्याची मोहीमही सुरू केली असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. नागरिकांकडे कोणत्याही हस्तलिखिताची वा ऐतिहासिक दस्तऐवजाची प्रत असेल तर ती त्यांनी भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराच्या मदतीनं जतन करावी असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी पंतप्रधानांनी, गयाना, ओमान, स्लोव्हाकिया यांसारख्या देशांसह इतरत्रही स्थलांतरीत झालेल्या भारतीयांनी त्या प्रदेशांशी एकरूप होतानाही आपला भारतीय वारसा आणि संस्कृतीच्या नोंदीकरणीसाठी करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तसंच एक पेड माँ के नाम या मोहीमेच्या यशाबद्दलही श्रोत्यांना सांगितलं.

पुस्तकं माणसाची सर्वात जास्त चांगली मित्र असतात आणि ग्रंथालयं ही मैत्री घट्ट करणारी उत्तम जागा असतात, असं म्हणत देशभरात ग्रंथालयांची सोय उपलब्ध करून देण्यासाठी सामान्य नागिराकंकडून होत असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. पर्यावरण, वन्य जीव संवर्धन तसंच स्वच्छतेचं महत्व आणि त्यादृष्टीनं होत असलेल्या प्रयत्नांचा पंतप्रधानांनी पुन्हा एकदा मन की बात मध्ये उल्लेख केला. स्वच्छता ही एक अविरत किंवा अखंड चालणारी मोहीम असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

साथियो, आपने अक्सर बड़े-बुजुर्गों को कहते सुना होगा, कि जहां स्वच्छता होती है, वहां, लक्ष्मी जी का वास होता है हमारे यहाँ ‘कचरे से कंचन’ का विचार बहुत पुराना है देश के कई हिस्सों में ‘युवा’ बेकार समझी जाने वाली चीजों को लेकर, कचरे से कंचन बना रहे हैं साथियो, ऐसे प्रयासों से भारत के स्वच्छता अभियान को गति मिलती है ये निरंतर चलते रहने वाला अभियान है

****

संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर आज सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी, या अधिवेशनात सरकार कोणत्याही मुद्यावर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं. अधिवेशनादरम्यान लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीत पार पाडायचं आवाहन त्यांनी विरोधी पक्षांना केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही सर्वपक्षीय बैठक झाली. केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल, एल मुरुगन, बीजू जनता दलाचे खासदार सस्मित पात्रा, समाजवादी पक्षाचे खासदार राम गोपाल यादव, एमडीएमकेचे खासदार वायको, काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी, जयराम रमेश संसदेच्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित होते. हिवाळी अधिवेशन २० डिसेंबरपर्यंत चालणार असून, २६ नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त सदनाचं कामकाज होणार नाही.

****

झारखंडमध्ये आज झारखंड मुक्ति मोर्चा - जेएमएमचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी राज्यात सरकार स्थापनेचा दावा केला आहे. राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी सोरेन यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं. झारखंडमध्ये नवीन सरकारचा शपथविधी येत्या २८ तारखेला होणार असल्याचं हेमंत सोरेन यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. जेएमएम, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि मार्क्सवादी लेनिनवादी कम्यूनिस्ट पार्टी मिळून ५६ आमदारांचं समर्थन पत्र राज्यपालांना सादर केल्याचं त्यांनी सांगितलं.

 

झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. ८१ पैकी ३४ जागांवर झारखंड मुक्ती मोर्चाला विजय मिळाला आहे. भाजपला २१, काँग्रेसला १६, तर राष्ट्रीय जनता दलाला चार जागांवर विजय मिळाला आहे. मार्क्सवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षाला दोन जागांवर जनतेनं कौल दिला आहे.

****

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीच्या दणदणीत विजयानंतर महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. नवीन मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित करण्यापूर्वी युतीचे तिन्ही पक्ष आपापल्या विधीमंडळ पक्षांच्या स्वतंत्र बैठका घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाली. अजित पवारांसह खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, आमदार दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांच्यासह इतर नेते या बैठकीला उपस्थित होते.

****

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याविषयी महायुतीचे सर्व घटक पक्ष मिळून चर्चा करू, असं शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप करताना कोणतेही मतभेद नव्हते, त्यामुळे सत्तास्थापन करतानाही मतभेद नाहीत असं शिंदे यांनी सांगितलं.

****

राज्य विधानसभा निवडणुकीत आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज कराड इथं निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर वार्ताहरांशी बोलत होते. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणामुळे मतांचं ध्रुवीकरण झाल्याचा आरोप त्यांनी केला. हा लोकांनी दिलेला निर्णय असल्याने, त्याची कारणमीमांसा करु, यावर अभ्यास करुन पुन्हा नव्या उत्साहाने लोकांसमोर येऊ, असं पवार म्हणाले.

****

विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीची अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होईल. त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेली आचारसंहिता संपेल, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या निवडणुकीत भाजप आणि महायुतीला विक्रमी यश मिळालं, तर काँग्रेस आणि महाविकास आघाडीला कधी नव्हे इतक्या कमी जागा मिळाल्या. पक्षनिहाय टक्केवारी पाहता, सर्वाधिक, म्हणजे २६ पूर्णांक ७७ टक्के मतं भाजपला मिळाली आहेत. त्याखालोखाल १२ पूर्णांक ४२ शतांश टक्के मतं काँग्रेसला, तर १२ पूर्णांक ३८ टक्के मतं शिवसेनेला मिळाली आहेत. ११ पूर्णांक २८ टक्के राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बाजूने आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जवळपास १० टक्के मतदारांनी कौल दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फक्त १ पूर्णांक ५५ टक्के मतदारांचा पाठिंबा मिळाला आहे, तर शून्य पूर्णांक ७२ शतांश, म्हणजे ४ लाख ६१ हजार ८८६ मतदारांनी नोटा हा पर्याय निवडला आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात उद्या पशुगणनेला सुरुवात होत आहे. २१ व्या पंचवार्षिक पशुगणनेअंतर्गत विविध प्रजाती, लिंग -वयनिहाय ही गणना केली जाणार आहे. यासाठी नियुक्त प्रगणकांना नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयातर्फे करण्यात आलं आहे.

****

क्रिकेट

बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ५३४ धावांचं आव्हान दिलं आहे. सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात तीन बाद १२ धावा झाल्या आहेत. त्यामुळे भारताला सामना जिंकण्यासाठी सात गडी बाद करण्याची, तर ऑस्ट्रेलियाला आता ५२२ धावांची आवश्यकता आहे. जसप्रित बुमराहनं दोन, तर मोहम्मद सिराजनं एक गडी बाद केला. तत्पूर्वी भारताने आज दुसरा डाव ४८७ धावांवर घोषित केला. या डावात यशस्वी जयस्वालनं १६१, विराट कोहलीनं नाबाद १००, तर के एल राहुलनं ७७ धावा केल्या. 

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 October 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत...