Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 21 January 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
छत्तीसगढ आणि ओडिशाच्या सीमेवर काल
रात्री झालेल्या संयुक्त अभियानात १४ नक्षलवादी मारले गेले. कुल्हाडीघाट आरक्षित
वन क्षेत्रात मोठ्या संख्येनं नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर छत्तीसगढ
आणि ओडिशा पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी संयुक्तपणे हे अभियान
राबवलं. घटनास्थळावरुन काल रात्री दोन आणि आज सकाळी १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह
सापडले असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
या कारवाईमुळे नक्षलमुक्त भारत निर्माण
करण्याच्या दिशेनं सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री
अमित शहा यांनी म्हटलं आहे. सामाजिक माध्यमावरच्या संदेशात त्यांनी, नक्षलवादाला
हा आणखी एक मोठा धक्का असल्याचं नमूद केलं.
****
स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं सुरु
असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत भारतीय पॅवेलियनचं उद्घाटन आज झालं. अन्न
प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान, कौशल्य विकास आणि उद्योजकता
राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी संयुक्तपणे या दालनाचं उद्घाटन केलं. त्यानंतर
पासवान यांनी कोका कोला चे मुख्य कार्यकारी अधिकारी हेनरिक ब्रॉन यांची भेट घेऊन, अन्न
प्रक्रिया उद्योगाला अधिक सक्षम करण्यासह यामध्ये उत्कृष्ट पद्धतींचा अवलंब
करण्यावर चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री
रेवंत रेड्डी यावेळी उपस्थित होते.
****
येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक
दिनानिमित्त नवी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या शानदार संचलनाच्या कार्यक्रमात
भारताचं सांस्कृतिक वैभव आणि भारतीय सैन्य दलाचं कौशल्य याचं दर्शन घडणार आहे.
भारतीय राज्यघटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष दोन चित्ररथ सहभागी
होणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुब्रियांतो हे या संचलनाच्या
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावर्षीच्या संचलनात
इंडोनेशियाच्या १६० सैनिकांची एक तुकडी आणि १९० जणांचं लष्करी बॅंड पथक सहभागी
होणार आहे.
****
महसूल विभागात राबवण्यात येत असलेला
शंभर दिवसांसाठीचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवून जनसामान्यांना शासनाच्या सेवा अधिक
जलद गतीनं उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी
दिल्या. महसूल विभागाअंतर्गत शंभर दिवसांत घेण्यात येत असलेले कार्यक्रम, योजनांचा
आढावा बावनकुळे यांनी घेतला. नागरिकांना महसूल विभागाच्या जास्तीत जास्त सेवा
ऑनलाईन देण्यासाठी पोर्टलचा अधिकाधिक वापर करावा, यामध्ये जमीन पोर्टल, महाखनिज
पोर्टल, आपली चावडी,
ई चावडी यासारख्या प्रणालींचा वापर करावा असंही त्यांनी
सांगितलं. महसूल विभागाचे निर्णय तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी व्यापक जनजागृती
करण्याबरोबरच कार्यशाळा आयोजित कराव्यात, नोंदणी आणि मुद्रांक
विभागातल्या कार्यालयांमध्ये सुविधा निर्माण कराव्यात, क्षेत्रीय
स्तरावरील अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात नियमित भेटी देऊन योजना, उपक्रमांचा
आढावा घ्यावा,
अशा सूचनाही बावनकुळे यांनी यावेळी दिल्या.
****
स्वामित्व योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या
मालमत्ता कार्डावर बॅंकांना संबंधित मालकास अर्थसहाय्य देता येते, त्यातून
ग्रामिण भागातले लोक आपल्या व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकतात, याबाबत
बॅंकांनी अंमलबजावणी करावी,
मालमत्ता कार्ड हे वैध दस्ताऐवज आहे, असे
निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. छत्रपती संभाजीनगर इथं काल जिल्हा
सल्लागार आणि समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. पिक कर्ज योजना, मुख्यमंत्री
रोजगार निर्मिती कार्यक्रम,
जीवनोन्नती अभियान, कृषी अर्थसहाय्य, पशुपालन
आणि दुग्ध व्यवसाय अर्थ सहाय्य, प्रधानमंत्री विश्वकर्मा अशा विविध
योजनांतर्गत अर्थसहाय्याबाबत आढावा या बैठकीत घेण्यात आला.
****
जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने
बीड जिल्ह्यातले १३ सरपंच आणि ४१८ ग्रामपंचायत सदस्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात
आलं आहे. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी यासंदर्भातले आदेश जारी केले. २०२० पासून
पुढे झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून
निवडून आलेल्या अनेक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र विहित
मुदतीत सादर न केल्याने ही कारवाई करण्यात आली.
****
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त येत्या २५
जानेवारीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करुन मतदार
जनजागृती करावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. काल
यासंदर्भात दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मतदारांना शपथ, मतदार
ओळख पत्रांचं वाटप,
तसंच शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धांचं आयोजन करावं, असे
निर्देशही स्वामी यांनी दिले.
****
No comments:
Post a Comment