Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 21 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
· छत्तीसगढ आणि ओडिशा सीमेवर नक्षलविरोधी अभियानात २३ नक्षलवादी ठार
· अन्नप्रक्रिया उद्योगात विकासाच्या अनेक संधी-केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांचं
प्रतिपादन
· येत्या २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनी काँग्रेस पक्षाचा राज्यव्यापी आंदोलनाचा
इशारा
· १९ वर्षाखालील टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाचा मलेशियावर अवघ्या १७
चेंडूत विजय
आणि
· नागपूर इथल्या प्राध्यापकांनी तयार केलेल्या फोल्डिंग हेल्मेटला आंतरराष्ट्रीय
पेटंट
****
छत्तीसगढ आणि ओडिशाच्या सीमेवर काल रात्री
झालेल्या संयुक्त अभियानात २३ नक्षलवादी मारले गेले. कुल्हाडीघाट आरक्षित वन क्षेत्रात
मोठ्या संख्येनं नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर छत्तीसगढ आणि ओडिशा पोलिस
तसंच केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी संयुक्तपणे हे अभियान राबवलं. दरम्यान, या
कारवाईमुळे नक्षलमुक्त भारत निर्माण करण्याच्या दिशेनं सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं
असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. सामाजिक माध्यमावरच्या संदेशात
त्यांनी, नक्षलवादाला हा आणखी एक मोठा प्रहार असल्याचं नमूद केलं.
****
अन्नप्रक्रिया उद्योगात विकासाच्या अनेक
संधी असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी
केलं आहे. स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं सुरु असलेल्या जागतिक आर्थिक मंच परिषदेत ते
पत्रकारांशी बोलत होते. आंतरराष्ट्रीय पातळीवरही या क्षेत्रात मोठ्या संधी असल्याचं, पासवान
यांनी म्हटलं आहे –
आंतरराष्ट्रीय
स्तर पर भी मै मानता हूं, की इस सेक्टर मे अनंत संभावनायें है आगे बढाने को लेकर। प्रोसेस
फूड की डिमांड ग्लोबली काफी बढती जा रही है। पिछले एक दशक मे भी अगर आप देखें तो जहां
प्रोसेस फूड का एक्सपोर्ट 13.7 प्रतिशत 13-14 मे था, तो वही अगर आप 23-24 मे देखे तो
23.4 प्रतिशत के आसपास ये वृद्धी हुई है। ये अपने मे दर्शाता है की इस मार्केट की,
इस सेक्टर की संभावनायें काफी है।
दरम्यान, या परिषदेत भारतीय पॅवेलियनचं
उद्घाटन आज झालं. चिराग पासवान आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी
यांनी संयुक्तपणे या दालनाचं उद्घाटन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेलंगणाचे
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, राज्य सरकारने या परिषदेत
आज दोन सामंजस्य करार केले,
या दोन्ही करारातून सुमारे २१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणं
अपेक्षित आहे.
****
जागतिक स्तरावर भारतानं एक शक्तिशाली राष्ट्र
म्हणून ओळख प्राप्त केली आहे, राज्यघटनेने भक्कम आधारशिला प्राप्त करून
दिल्यानेच हे शक्य झालं असल्याचं, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे
यांनी म्हटलं आहे. पाटणा इथं ८५ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत शिंदे बोलत
होते. लोकशाहीत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन मूल्यांना अत्यंत
महत्त्व आहे,
सर्वांनी या मूल्यांप्रती कटिबद्ध राहण्याचं आवाहन शिंदे यांनी
केलं आहे.
****
येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त
नवी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या शानदार संचलनाच्या कार्यक्रमात भारताचं सांस्कृतिक
वैभव आणि भारतीय सैन्य दलाचं कौशल्य याचं दर्शन घडणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास
संस्था-डीआरडीओने विकसित केलेलं ‘प्रलय’ हे
क्षेपणास्त्र प्रथमच कर्तव्यपथावर प्रदर्शित होणार असल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे. भारतीय राज्यघटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष
दोन चित्ररथही संचलनात सहभागी होणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुब्रियांतो
हे या संचलनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावर्षीच्या
संचलनात इंडोनेशियाच्या १६० सैनिकांची एक तुकडी आणि १९० जणांचं लष्करी बॅंड पथक सहभागी
होणार आहे.
****
सुकन्या समृद्धी योजनेला उद्या दहा वर्षे
पूर्ण होत आहेत. २२ जानेवारी २०१५ रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांतर्गत सुरू झालेल्या
या योजनेत आतापर्यंत देशभरात चार करोडहून अधिक खाती उघडली गेली आहेत. या योजनेत खातेधारकांना
सध्या आठ पूर्णांक दोन दशांश टक्के इतका वार्षिक व्याजदर दिला जात असल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे
****
येत्या २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनी
काँग्रेस पक्षानं राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यात ५० लाख मत कशी वाढली
याची माहिती निवडणूक आयोग देत नाही, म्हणून आम्ही आंदोलन करणार असल्याचं, कॉंग्रेसचे
प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी सांगितलं, ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत
बोलत होते. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आंदोलन करून, जिल्हाधिकारी, तहसीलदार
यांना निवेदन देणार असल्याची माहिती पटोले यांनी दिली.
****
१९ वर्षांखालील टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाने अवघ्या १७ चेंडूत यजमान मलेशियाचा
पराभव करून इतिहास घडवला. क्वालालांपूर इथं झालेल्या या सामन्यात
भारतीय संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, भारतीय
गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर मलेशियाचा संघ अवघ्या ३१ धावांत गारद झाला, भारताच्या
वैष्णवी शर्मा हिने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात पाच धावांत पाच बळी घेत, हॅटट्रिक
नोंदवली. मलेशिया संघानं दिलेलं हे आव्हान भारतीय संघानं सलामीवीर जी त्रिशाच्या १२
चेंडूत नाबाद २७ धावांच्या बळावर अवघी दोन षटकं आणि पाच चेंडूत बिनबाद ३२ धावा करत, विजय
मिळवला. वैष्णवी शर्मा प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराची मानकरी ठरली. या स्पर्धेत भारताचा
पुढचा सामना येत्या गुरुवारी श्रीलंकेसोबत होणार आहे.
****
नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातले
भौतिक शास्त्राचे प्राध्यापक डॉ. संजय ढोबळे आणि त्यांची विद्यार्थिनी आदिती देशमुख
यांनी दुचाकीस्वारांसाठी फोल्डिंग हेल्मेट विकसित केलं आहे. या अनोख्या संशोधनाचा संक्षिप्त
वेध घेणारा हा वृत्तांत –
वाहन चालवून झाल्यावर हेल्मेट ठेवायचं कुठे, हा दुचाकी चालकांसमोर मोठा प्रश्न असतो. मात्र येत्या काही दिवसांत हे हेल्मेट
दुचाकीच्या डिक्कीमध्ये फोल्ड करून ठेवता येणार आहे. नागपूरचे डॉ. संजय ढोबळे आणि त्यांची
विद्यार्थिनी आदिती देशमुख यांनी फोल्डिंग हेल्मेट तंत्रज्ञान विकसित केलं आहे. हे
हेल्मेट तयार करताना, त्याची
सर्व कार्यपद्धती आणि मजबुती नियमित हेल्मेटप्रमाणे राहील याची काळजी घेण्यात येत आहे.
नवीन तंत्रज्ञानाच्या वापरातून तयार केलेल्या या फोल्डिंग हेल्मेट साठी डॉ. संजय ढोबळे
आणि आदिती देशमुख या दोघांना आंतरराष्ट्रीय पेटंटही मिळालं आहे.
****
जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने बीड
जिल्ह्यातले १३ सरपंच आणि ४१८ ग्रामपंचायत सदस्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे.
जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी यासंदर्भातले आदेश जारी केले. राखीव प्रवर्गातून निवडून
आलेल्या अनेक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर
न केल्याने ही कारवाई करण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर इथले शिवसेना उद्धव बाळासाहेब
ठाकरे गटाचे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांनी अनेक पदाधिकारी तसंच शिवसैनिकांसोबत आज
भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या
उपस्थितीत मुंबईत पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. मागास बहुजन कल्याण मंत्री
अतुल सावे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
राज्यातील सहकारी तसंच खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचं निश्चित केले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार १६७ दूध उत्पादकांच्या खात्यात १५ कोटी ८ लक्ष रुपये अनुदान जमा झालं आहे.
****
राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत
१३ जानेवारी ते २७ जानेवारी या कालावधीत ‘जंत निर्मुलन
पंधरवडा’ साजरा केला जात आहे. त्या अनुषंगाने सर्व पशुपालकांनी
आपल्या गोवर्गीय आणि म्हैसवर्गीय पशूंना जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून जंत निर्मुलन
औषधी द्यावीत,
असं आवाहन बीडचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केलं आहे.
आपल्या पशूंना लाळखुरकुत लसीकरण करून घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
****
उत्तर प्रदेशतील प्रयागराज इथल्या महाकुंभ
मेळ्याला जाण्याकरीता नांदेड-पाटणा-नांदेड, औरंगाबाद-पाटणा-औरंगाबाद, काचीगुडा-पाटणा-काचीगुडा आणि सिकंदराबाद-पाटणा-सिकंदराबाद विशेष रेल्वे चालवण्यात येणार
आहेत. २२ जानेवारी ते १४ फेब्रुवारीदरम्यान या गाड्यांच्या फेऱ्या
होणार आहेत.
****
No comments:
Post a Comment