Tuesday, 21 January 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.01.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 21 January 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २१ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.

****

येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या शानदार संचलनाच्या कार्यक्रमात भारताचं सांस्कृतिक वैभव आणि भारतीय सैन्य दलाचं कौशल्य याचं दर्शन घडणार आहे. भारतीय राज्यघटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष दोन चित्ररथ सहभागी होणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुब्रियांतो हे या संचलनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावर्षीच्या संचलनात इंडोनेशियाच्या १६० सैनिकांची एक तुकडी आणि १९० जणांचं लष्करी बॅंड पथक सहभागी होणार आहे. तसंच भारतीय राज्यघटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्या निमित्तानं देशाच्या विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे ३१ चित्ररथ सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी देशभरातून ३४ विविध क्षेत्रातल्या दहा हजार मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं आहे. 

****

केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून देशातल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पंतप्रधान जनमन परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम आणि राज्यमंत्री दुर्गादास उईके हे या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान जनमन अभियानाचा उद्देश शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणं हा असून, एकंदर सहा क्षेत्रांवर भर देण्यात आला आहे. या परिषदेत देशातल्या १८ राज्यातले ८८ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी चर्चेत भाग घेणार असून, अजूनही विकासापासून वंचित राहिलेल्या मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी एक कृती आराखडा तयार केला जाणार आहे. 

****

भारताचा विकासदर पुन्हा ७-८ टक्क्यांवर जाईल, असा विश्वास जागतिक आर्थिक मंचाचे अध्यक्ष आणि कार्यकारी अधिकारी बोर्ग ब्रेन्डे यांनी वर्तवला आहे. भारतात गुंतवणूक, पायाभूत सुविधा, शिक्षण, संशोधन यासारख्या क्षेत्रात आर्थिक सुधारणांमुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. त्यामुळे जीडीपी अर्थात राष्ट्रीय स्थूल उत्पादन वाढीचा दर गाठता येईल, असं त्यांनी सांगितलं. स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं काल या मंचाची ५५ वी बैठक सुरू झाली. त्यावेळी ते बोलत होते. 

****

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी एकूण ६९९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली, त्यानंतर हे चित्र स्पष्ट झालं. दिल्ली विधानसभेसाठी पाच फेब्रुवारीला मतदान तर आठ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. 

****

आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत तयार केलेल्या उत्पादनांच्या स्वदेशी प्रणालींच्या चाचणीसाठी नवी मुंबईत बेलापूर इथं एक अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येत आहे. या प्रयोगशाळेचं भूमीपूजन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांच्या हस्ते काल झालं. आरोग्य, संरक्षण, अवकाश तंत्रज्ञान, आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या स्वदेशी बनावटीची उपकरणं वापरण्याआधी त्यातील सर्व प्रणालीची चाचणी या प्रयोगशाळेत होणार आहे.

****

राज्य सरकारनं रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. मात्र प्रजासत्ताक दिनी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण होईल, असा शासन निर्णय सरकारनं जारी केला आहे. आदिती तटकरे यांची रायगडच्या आणि गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली होती. 

दरम्यान, पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिल्यावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तर पालकमंत्री पदावरुन महायुतीमध्ये कुठलेही वाद नसल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला.

****

पुढच्या शंभर दिवसांत ५० हजार युवांना प्रशिक्षण देणार असल्याचं कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं. मुंबईसह नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, पुणे इथं महाराष्ट्र इंटरनॅशनल केंद्र सुरू करण्यात येईल, असंही लोढा म्हणाले. कौशल्य विकास विभाग आणि उच्च तंत्रशिक्षण विभाग नोकरी देणाऱ्या संस्थांबाबत सर्वसमावेशक कायदा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

मुंबईत अभिनेता सैफ आली खान याच्यावर प्राणघातक हल्ला करणारा आरोपी बांग्लादेशी घुसखोर असल्याचं निष्पन्न झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी अवैधपणे रहात असलेल्या बांग्लादेशींविरुद्धची कारवाई अधिक तीव्र केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच विभागातून २५ घुसखोरांवर कारवाई करून त्यांना अटक केली आहे. मुख्यतः बांधकामाच्या ठिकाणी आणि कामगार वसाहतींमध्ये ही कारवाई अधिक कडक करण्यात येणार असल्याचं ठाण्याचे उपआयुक्त अमरसिंग जाधव यांनी सांगितलं.

****

अहिल्यानगर इथल्या लष्कराच्या मेकनाइज्ड इन्फंट्री सेंटर अँड स्कूल या संस्थेच्या वतीनं काल युद्ध प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. के. के. रेंजवर झालेल्या प्रात्यक्षिकात हेलिकॉप्टर, क्षेपणास्त्रं तसंच टी 90 भीष्म, टी 72 अजेय आणि एमबीटी अर्जुन अशा विविध रणगाड्यांचाही समावेश होता. यावेळी नेपाळचे लष्करी अधिकारी आणि भारतीय लष्करातले वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

****

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त येत्या २५ जानेवारीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करुन मतदार जनजागृती करावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. काल यासंदर्भात दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 21 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...