Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 22 January 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी दावोसमध्ये सहा लाख २५
हजार कोटी रुपयांहून अधिकचे सामंजस्य करार
·
छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन कंपन्यांचा पुढाकार, सुमारे १५
हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
·
छत्तीसगड आणि ओडिशा सीमेवर सुरक्षा दलांच्या कारवाईत १४
नक्षलवादी ठार
आणि
·
१९ वर्षांखालील टी-२० क्रिकेट विश्वचषक
स्पर्धेत भारतीय महिला संघाचा मलेशियावर अवघ्या १७ चेंडूत विजय
****
स्वित्झर्लंडमधल्या
दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्रातर्फे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत सहा लाख २५ हजार ४५७ कोटी रुपयांच्या ३१ सामंजस्य
करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामध्ये जेएसडब्ल्यू समूहासोबत
झालेल्या तीन लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारानुसार, गडचिरोलीत
२५ मिलियन टन क्षमतेचा अत्याधुनिक पर्यावरणस्नेही पोलाद प्रकल्प उभारला जाईल.
कल्याणी उद्योगसमुहासोबत संरक्षण, पोलाद आणि इलेक्ट्रॉनिक
वाहन क्षेत्रात, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरसोबत संरक्षण
क्षेत्रात, तर विराज प्रोफाइल्स प्रायव्हेट लिमिटेड या
कंपनीसोबत पोलाद आणि धातू क्षेत्रात सामंजस्य करार झाले. छत्रपती
संभाजीनगर इथं एबी इनबेव, अवनी पॉवर बॅटरीज आणि जेन्सोल यांची
सुमारे १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे....
‘‘छत्रपती
संभाजीनगरमध्ये ग्रीन मोबिलिटी, विद्युत बस, ट्रक आणि परवडण्याजोग्या इलेक्ट्रिक गाड्यांचं उत्पादन कंपनी करणार आहे.
याअंतर्गत विविध क्षेत्रांमध्ये रोजगार निर्माण होतील. तसंच एबी
इनबेव्ह या जगातल्या सर्वात मोठ्या ब्रुअरीसोबतही महाराष्ट्र सरकारने छत्रपती संभाजीनगरमध्ये
२५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठीचा सामंजस्य करार केला.’’
या सर्वच
करारांच्या माध्यमातून राज्यभरात ९२ हजारांहून अधिक रोजगार निर्मिती होणार असल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल जागतिक
आर्थिक मंचच्या कार्यक्रमांअंतर्गत विविध कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांचीही भेट घेऊन महाराष्ट्रात
गुंतवणूक करण्यासंदर्भात चर्चा केली.
****
जागतिक
स्तरावर भारतानं एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख प्राप्त केली आहे,
राज्यघटनेने भक्कम आधारशिला प्राप्त करून दिल्यानेच हे शक्य झालं असल्याचं, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी म्हटलं आहे. पाटणा इथं
८५ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत ते काल बोलत होते. लोकशाहीत
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन मूल्यांना अत्यंत महत्त्व आहे, सर्वांनी या मूल्यांप्रती कटिबद्ध राहण्याचं आवाहन शिंदे
यांनी केलं.
****
येत्या
२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या शानदार
संचलनात भारताचं सांस्कृतिक वैभव आणि भारतीय सैन्य दलाच्या कौशल्याचं दर्शन घडणार आहे. संरक्षण संशोधन
आणि विकास संस्था-डीआरडीओने विकसित केलेलं 'प्रलय' हे क्षेपणास्त्र प्रथमच कर्तव्यपथावर
प्रदर्शित होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
भारतीय राज्यघटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष दोन चित्ररथही
संचलनात सहभागी होणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो
सुब्रियांतो हे या संचलनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावर्षीच्या संचलनात इंडोनेशियाच्या १६० सैनिकांची एक तुकडी आणि १९०
जणांचं लष्करी बॅंड पथक सहभागी होणार आहे.
दरम्यान, नवी दिल्लीत
प्रजासत्ताक दिन सोहळ्यात आयोजित राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेत महाराष्ट्रातल्या दोन
शाळांची महाअंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. यामध्ये इस्लामपूरच्या
राजारामबापू पाटील मिलिटरी स्कूल आणि स्पोर्ट्स अकॅडमी, तसंच
नाशिकच्या भोसला मिलिटरी गर्ल्स स्कूलच्या पथकांचा समावेश आहे. ही महाअंतिम फेरी परवा २४ आणि २५ जानेवारी रोजी होणार आहे.
****
तेलंगणा
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी काल मुंबई उच्च
न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. काल सायंकाळी मुंबईत झालेल्या
एका छोटेखानी समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्यायमूर्ती आराधे यांना
पदाची शपथ दिली.
****
येत्या
२५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनी काँग्रेस पक्षानं राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
दिला आहे. राज्यात ५० लाख मतं कशी वाढली याची माहिती निवडणूक आयोग देत
नाही, म्हणून आम्ही आंदोलन करणार असल्याचं, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी सांगितलं. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्याच्या
प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आंदोलन करून, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देणार असल्याची
माहिती पटोले यांनी दिली.
****
छत्तीसगढ
आणि ओडिशाच्या सीमेवर सोमवारी रात्री झालेल्या संयुक्त अभियानात १४ नक्षलवादी मारले
गेले. कुल्हाडीघाट आरक्षित वन क्षेत्रात मोठ्या संख्येनं नक्षलवादी असल्याची
माहिती मिळाल्यानंतर छत्तीसगढ आणि ओडिशा पोलिस तसंच केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी
संयुक्तपणे हे अभियान राबवलं. मृतांमध्ये नक्षलवाद्यांच्या केंद्रीय
समितीचा सदस्य जयराम उर्फ चलपती याचाही समावेश आहे. त्याच्यावर
एक कोटी रुपयांचं बक्षीस होतं.
दरम्यान, या कारवाईमुळे
नक्षलमुक्त भारत निर्माण करण्याच्या दिशेनं सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं असल्याचं
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. सामाजिक माध्यमावरच्या
संदेशात शाह यांनी, नक्षलवादावर हा मोठा प्रहार असल्याचं नमूद
केलं.
****
१९
वर्षांखालील टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाने अवघ्या १७ चेंडूत
यजमान मलेशियाचा पराभव करून इतिहास घडवला. मलेशियात क्वालालांपूर इथं काल झालेल्या
या सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर मलेशियाचा संघ अवघ्या ३१ धावांत
गारद झाला, भारताच्या वैष्णवी शर्मा हिने आपल्या पदार्पणाच्या
सामन्यात पाच धावांत पाच बळी घेत, हॅटट्रिक नोंदवली. भारतीय संघानं सलामीवीर जी त्रिशाच्या १२ चेंडूत नाबाद २७ धावांच्या बळावर
अवघी दोन षटकं आणि पाच चेंडूत बिनबाद ३२ धावा करत, विजय मिळवला.
वैष्णवी शर्मा प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराची मानकरी ठरली. या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना येत्या गुरुवारी श्रीलंकेसोबत होणार आहे.
****
लातूर जिल्ह्यात
उदगीर इथं आश्रम शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या दोन दिवसीय विभागीय क्रीडा
स्पर्धेला काल प्रादेशिक उपसंचालक दिलीपकुमार राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत
प्रारंभ झाला. लातूर, धाराशिव, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातल्या
आश्रमशाळेतले विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
****
दुचाकीस्वार
आणि त्याच्या मागे बसणारा सहप्रवासी, या दोघांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणं
आवश्यक आहे. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
विद्यापीठातले भौतिक शास्त्राचे प्राध्यापक डॉ. संजय ढोबळे आणि त्यांची विद्यार्थिनी
आदिती देशमुख यांनी दुचाकीस्वारांसाठी फोल्डिंग हेल्मेट विकसित केलं आहे. या अनोख्या संशोधनाचा संक्षिप्त वेध घेणारा हा वृत्तांत..
‘‘वाहन चालवून झाल्यावर हेल्मेट ठेवायचं कुठे, हा दुचाकी चालकांसमोर मोठा प्रश्न असतो. मात्र येत्या काही दिवसांत हे हेल्मेट
दुचाकीच्या डिक्कीमध्ये फोल्ड करून ठेवता येणार आहे. नागपूरचे डॉ. संजय ढोबळे आणि त्यांची
विद्यार्थिनी आदिती देशमुख यांनी फोल्डिंग हेल्मेट तंत्रज्ञान विकसित केलं आहे. हे
हेल्मेट तयार करताना, त्याची
सर्व कार्यपद्धती आणि मजबुती नियमित हेल्मेटप्रमाणे राहील याची काळजी घेण्यात येत आहे.
नवीन तंत्रज्ञानाच्या वापरातून तयार केलेल्या या फोल्डिंग हेल्मेट साठी डॉ. संजय ढोबळे
आणि आदिती देशमुख या दोघांना आंतरराष्ट्रीय पेटंटही मिळालं आहे.’’
****
ज्येष्ठ
कीर्तनकार डॉक्टर किसन महाराज साखरे यांच्या पार्थिव देहावर काल आळंदी इथं अंत्यसंस्कार
करण्यात आले. साखरे यांचं सोमवारी रात्री पुण्यात निधन झालं, ते ८९
वर्षांचे होते. राज्य सरकारनं २०१८ या वर्षीचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार देऊन
त्यांना सन्मानित केलं होतं. साखरे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी शोक व्यक्त केला आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर इथले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी
यांनी अनेक पदाधिकारी तसंच शिवसैनिकांसोबत काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष
कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासह
अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
राज्यातल्या
सहकारी तसंच खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने
प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचं निश्चित केलं आहे. छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार १६७ दूध उत्पादकांच्या खात्यात १५ कोटी ८ लक्ष रुपये
अनुदान जमा झालं आहे.
****
राष्ट्रीय
पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १३ ते २७ जानेवारी या कालावधीत 'जंत
निर्मुलन पंधरवडा' पाळला जात आहे. त्या अनुषंगाने सर्व
पशुपालकांनी आपल्या गोवर्गीय आणि म्हैसवर्गीय पशूंना जवळच्या पशुवैद्यकीय
दवाखान्यातून जंत निर्मुलन औषधी द्यावीत, असं आवाहन बीडच्या जिल्हा
पशुसंवर्धन उपायुक्तांनी केलं आहे. आपल्या पशूंना लाळ-खुरकूत
लसीकरण करून घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
****
जालना इथं
काल महानगरपालिका आणि राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाद्वारे काल प्लास्टिक विरोधी तपासणी
करण्यात आली. यामध्ये सुमारे
१० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलं.
यापुढे प्लास्टीक आढळून
आल्यास दंड आकारण्यात येईल अशी ताकीद
देण्यात आली.
****
नांदेडमध्ये
काल पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला. या
मेळाव्यात ५० उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment