Thursday, 1 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 01 May 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ मे २०२५ दुपारी १.०० वा.

****

वेव्हज परिषद ही प्रत्येक कलाकार आणि सर्जनशीलतेसाठी प्रमुख व्यासपीठ आहे. वेव्हज परिषदेत ऐतिहासिक जागतिक मंडळी जमली आहेत, या परिषदेला मी शुभेच्छा देतो, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मुंबई इथं आज पहिल्यांदाच होत असलेल्या वेव्हज परिषदेचा उद्घाटन सोहळापार पडला, त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. या सोहळ्याला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थित होती. क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर वर्ल्ड म्हणजेच देशातील प्रतिभेला जागतिक व्यासपीठ उपलब्ध असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

भारत माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्यास तयार आहे. मनोरंजन अर्थव्यवस्था ही भारत आणि महाराष्ट्रासाठी विकासाचे नवीन इंजिन आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रसंगी म्हणाले.

वेव्हज परिषदेमुळे देशातल्या कंटेंट क्रियेटर्सला जगभरातल्या गुंतवणूकदारांशी संपर्क निर्माण करण्याची संधी मिळेल, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं. ७५ पेक्षा जास्त देशातले मोठे नेते आणि उद्योजक या परिषदेत सहभागी होत असल्याची माहिती वैष्णव यांनी यावेळी दिली. वेव्हज आणि आयआयसीटीमुळे मनोरंजन आणि नवनिर्मिती क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर मुंबईचं स्थान बळकट व्हायला मदत होईल, असंही वैष्णव म्हणाले. वेव्हज ही केवळ एक परिषद नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली एक चळवळ असल्याचं अभिनेते शाहरुख खान यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटलं आहे.

****

महाराष्ट्र दिन आज साजरा होत आहे. एक मे १९६० रोजी भाषिक प्रांतरचनेनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. कामगार दिनही आज साजरा होत आहे. मुंबई इथं दादर परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. राज्य स्थापना दिनानिमित्त तसंच आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त राज्यपालांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.

****

विधान भवनात विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन सोहळा साजरा झाला. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह विधिमंडळाचे अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते.

****

छत्रपती संभाजीनगर इथं महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते पार पडलं. महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. छत्रपती संभाजीनगरच्या विकासात औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचं मोठं योगदान असल्याचं पालकमंत्री शिरसाट यांनी प्रतिपादन केलं.

****

बीड इथं पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर राज्याचे उद्योग आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला शासनाने प्राधान्य दिल्याचं प्रतिपादन यावेळी नाईक यांनी केलं. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.

****

जालना इथं जिल्हा पोलीस मुख्यालय मैदानावर पर्यावरण, पशुसवंर्धन मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. विकासाच्या प्रक्रियेत राज्य शासन शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी सदैव उभं असल्याचं प्रतिपादन मुंडे यांनी यावेळी केलं. खासदार कल्याण काळे, आमदार अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह अधिकारी आणि नागरिकांची याप्रसंगी उपस्थिती होती.

****

हिंगोली इथं संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. हिंगोली जिल्हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करत असून, जिल्ह्याची चौफेर प्रगती व्हावी यासाठी जागरुक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करु, असं प्रतिपादन झिरवाळ यांनी केलं.

****

नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज कवायत मैदानावर झालेल्या या ध्वजारोहण समारंभास माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, नांदेड पोलीस परिक्षेत्राचे उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्यासह अधिकारी आणि नागरिकांची उपस्थिती होती. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री सावे यांना पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.

****

धाराशिव इथं राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यानिमित्ताने पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील हुतात्मा स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस, शिक्षण, कृषी तसच विविध नैपुण्य प्राप्त व्यक्ती, संस्थांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

****

सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. गेल्या शंभर दिवसात सर्व विभागांनी निश्चित केलेल्या ९०२ धोरणात्मक उद्दिष्टांपैकी ७०६ उद्दिष्टे साध्य केल्याची माहिती त्यांनी दिली. सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या राज्यातल्या शासकीय कार्यालयात सर्वोत्तम जिल्हाधिकारी या श्रेणीत नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयानं पाचवा क्रमांक पटकावला. तर, सर्वोत्कृष्ट पोलीस महानिरीक्षक गटात नांदेडचे पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने दुसरा क्रमांक पटकावला.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 October 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत...