Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 01 May 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ मे २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
पहिल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन - वेव्ह्ज
शिखर परिषदेचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
·
केंद्र सरकारचा जातीनिहाय जनगणनेचा निर्णय - ऊसाला प्रति
क्विंटल ३५५ रुपये रास्त आणि किफायतशीर दर निर्धारित
·
महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन, मुख्यमंत्र्यांच्या
१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर होणार
·
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी राज्यात २६ बालविवाह रोखण्यात
प्रशासनाला यश
आणि
·
जुन्या कपड्यांच्या पुनर्वापरासाठी छत्रपती संभाजीनगर
महापालिकेचा अभिनव उपक्रम
****
भारताच्या
पहिल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन - वेव्ह्ज शिखर परिषदेचं उद्घाटन आज पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं होणार आहे. “कनेक्टिंग
क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रिज" या घोषवाक्याखाली होणाऱ्या या चार दिवसीय
शिखर परिषदेत, भारताला मीडिया, मनोरंजन
आणि डिजिटल नवप्रवर्तनाचं जागतिक केंद्र म्हणून प्रदर्शित करण्यात येईल. या परिषदेत
पंतप्रधान क्रिप्टोस्पियरला भेट देऊन, “क्रिएट इन इंडिया” उपक्रमांतर्गत
निवड झालेल्या सर्जनशील कलाकारांशी संवाद साधतील. आज परिषदेच्या पहिल्या दिवशी ‘भारत
आणि महाराष्ट्र पॅव्हिलियन’ तसंच वेव्ह्ज प्रदर्शनाचं उद्घाटन होणार असून, या दोन्ही पॅव्हेलियनला पंतप्रधान भेट देणार आहेत.
या परिषदेमध्ये
९० हून अधिक देश, दहा हजार प्रतिनिधी, एक हजार कलाकार,
३०० हून अधिक कंपन्या आणि साडे तीनशेहून अधिक स्टार्टअप्स सहभागी होणार
आहेत. शिखर संमेलनात ४२ मुख्य सत्रं, ३९ विशेष सत्रं आणि ३२ मास्टरक्लासेस
आयोजित करण्यात येणार आहेत. या परिषदेच्या माध्यमातून देशातल्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला
मोठ्या प्रमाणात चालना मिळण्यास मदत होणार आहे.
****
केंद्र
सरकारने जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय
माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत याबाबत
माहिती दिली, ते म्हणाले...
बाईट
- केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव
मंत्रिमंडळाने
यंदाच्या ऊस गाळप हंगामासाठी ऊसाचा रास्त आणि किफायतशीर दर - एफ आर पी प्रति क्विंटल
३५५ रुपये निर्धारित केला आहे. देशभरातले पाच कोटी ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखाने,
तसंच साखर उद्योगाशी निगडित कामगारांना याचा लाभ होणार असल्याचं,
वैष्णव यांनी सांगितलं.
****
दरम्यान, जातनिहाय
जनगणनेच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. यामुळे गरजू
नागरिकांच्या प्रगतीसाठी धोरणं आखायला यामुळे मदत होईल, असं ते
म्हणाले.
उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनीही या निर्णयाचं समर्थन करत, हा निर्णय सर्व समाजघटकांना त्यांचा न्याय्य
हक्क मिळवून देण्यास मदत करेल, असं म्हटलं आहे.
वंचित बहुजन
आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या निर्णयावर टीका केली आहे. सरकारने
अद्याप जनगणना कधी करणार, याबाबत कोणताही स्पष्ट खुलासा केलेला नाही, तसंच सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात सरकारने, जातीय जनगणना करणं शक्य नाही, असं सांगितल्याकडे आंबेडकर
यांनी लक्ष वेधलं.
****
भारतीय
शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषद - आय एस सी ई इयत्ता १० वी आणि आय एस सी इयत्ता १२
वी चे निकाल काल जाहीर केले. दहावीत एकूण ९८ पूर्णांक ८४ टक्के, तर बारावीच्या
परीक्षेत ९८ पूर्णांक ६४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
****
राज्य समाईक
प्रवेश परीक्षा कक्षाकडून २७ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी २०२५, पीसीएम गट
सामाईक प्रवेश परीक्षेच्या सकाळच्या सत्रामध्ये इंग्रजी माध्यमातल्या गणित विषयाच्या
प्रश्नपत्रिकेत तांत्रिक त्रुटी आढळून आल्या होत्या. यासंदर्भात अनेक विद्यार्थ्यांनी
दाखल केलेल्या तक्रारींची दखल घेऊन या सत्रातल्या सर्व उमेदवारांसाठी फेर परीक्षा येत्या
पाच मे रोजी होणार असल्याची माहिती, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा
कक्षाने दिली आहे.
****
शिक्षकांची
राज्यव्यापी आयडॉल बँक तयार करणार असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी
म्हटलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात 'आयडॉल शिक्षकांशी' या उपक्रमात ते बोलत होते. हा उपक्रम
आपल्या शाळेपुरता मर्यादित न ठेवता राज्यभर पोहचेल यासाठी काम करण्याचं आवाहनही भुसे
यांनी शिक्षकांना यावेळी केलं.
****
महाराष्ट्र
दिन आज साजरा होत आहे. एक मे १९६० रोजी भाषिक प्रांतरचनेनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना
झाली होती. कामगार दिनही आज साजरा होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र
दिनाच्या संदेशात राज्याच्या स्थापनेसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण
केली. महाराष्ट्राला उद्योग, शिक्षण, आरोग्य,
कृषी, कला, क्रीडा,
साहित्य, सामाजिक न्याय यांसारख्या विविध क्षेत्रांत
साधलेल्या नेत्रदीपक प्रगतचा उल्लेख करत त्यांनी, प्रगत,
संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया, असं म्हटलं आहे.
कामगार
दिनाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या प्रगतीत जनतेच्या आणि कामगार
वर्गाच्या योगदानाचं विशेष कौतुक केलं.
महाराष्ट्र
दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस आयुक्तालयातल्या देवगिरी
मैदानात आज सकाळी आठ वाजता पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार आहे.
लातूर इथं
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते, धाराशिव इथं पालकमंत्री
प्रताप सरनाईक यांच्या हस्ते, तर बीड इथं राज्यमंत्री इंद्रनील
नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र
दिनी आज मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल
जाहीर करण्यात येणार आहे.
****
राष्ट्रसंत
तुकडोजी महाराज आणि आणि महात्मा बसवेश्वर यांची जयंती काल सर्वत्र साजरी करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा बसवेश्वर जिल्हा महोत्सव समितीतर्फे शहरासह जिल्ह्यात
सर्वत्र विविध कार्यक्रम घेण्यात आले.
लातूर इथं
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला पुष्पहार
अर्पण करून अभिवादन केलं. नांदेड इथंही कवठा परिसरात बसवेश्वर यांच्या पुतळ्या जवळ
सामाजिक संस्थांच्या वतीने रक्तदान शिबिर, अन्नदान करण्यात आलं. धाराशिव जिल्ह्याच्या
उमरगा तालुक्यात गुंजोटी इथं महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं काल मान्यवरांच्या
उपस्थितीत अनावरण झालं.
****
अक्षय्य
तृतीयेच्या मुहूर्तावरचे संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी महिला आणि बाल विकास राज्यमंत्री
मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले
होते. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात भोकर शहर आणि मुखेड तालुक्यातल्या मंगनाळी
या गावात होणारे दोन बालविवाह वेळेत हस्तक्षेप करून रोखण्यात आले. राज्यात असे एकूण
२६ बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर महापालिकेनं जुन्या कपड्यांच्या पुनर्वापरासाठी एक अभिनव उपक्रम सुरू केला
आहे. नागरिकांनी आपल्याकडे वापरात नसलेले, सुस्थितीतले कपडे यासाठी देण्याचं आवाहन
मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी केलं आहे. आजपासून दर महिन्याच्या पहिल्या
तारखेला यासाठीची विशेष घंटागाडी प्रत्येक प्रभागातून फिरणार असल्याचं, आयुक्तांनी सांगितलं. ते म्हणाले...
बाईट
- मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत
****
हिंगोली
जिल्ह्यातलं वनक्षेत्र वाढवण्यासाठी प्रत्येकानं आपल्या घरी पाच झाडे लावावीत, असं आवाहन
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केलं आहे. ते काल हिंगोली इथं जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचा
समारोप प्रसंगी बोलत होते. यवाोळी त्यांच्या हस्ते जिल्ह्यातल्या पूर्णा, कयाधू आणि पैनगंगा या तीनही मुख्य नद्यांच्या पाण्याचं पूजन करण्यात आलं.
****
लातूर इथं
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचा
समारोप झाला. सध्याच्या पाणीटंचाईच्या परिस्थितीत
प्रत्येकाने पाण्याच्या वापराबाबत जागरूक होणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त
केलं.
****
तुळजापूर
इथल्या जुने बसस्थानकाच्या नवीन इमारतीचं लोकार्पण काल परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे
अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झालं. अशाच प्रकारची सुसज्ज बसस्थानकं राज्यभरात
उभारण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
****
डॉ बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची उद्या आणि परवा होणारी पदवी प्रथम तसंच अंतिम वर्ष अभ्यासक्रमांची
परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. तर सहा मे रोजी होणारी बी कॉम अंतिम वर्ष ही परीक्षा
देखील पुढे ढकलण्यात आली असल्याचं, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ संचालक डॉ
भारती गवळी यांनी सांगितलं आहे.
****
No comments:
Post a Comment