Friday, 2 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.05.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 02 May 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ०२ मे २०२ सकाळी .०० वाजता.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज केरळमधल्या तिरुवअनंतपुरम विळींझम इथं खोल पाण्यातील आंतरराष्ट्रीय बहुउपयोगी बंदराचं उद्घाटन आणि लोकार्पण होणार आहे. विळींझम इथलं हे बंदर देशातलं पहिलं अर्धस्वयंचलित तसंच खोल पाण्यातील कंटेनर वाहतूक करणारं बंदर ठरणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान आज आंध्र प्रदेशच्या दौर्यावरही जाणार असून, अमरावती इथं ५८ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात जागतिक दर्जाची संरचना आणि संपर्क जाळे उभारण्याची वचनपूर्तीचा भाग म्हणून आंध्र प्रदेशातल्या सात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन, तसंच सहा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आणि एका रेल्वे प्रकल्पाची पायाभरणीही ते करतील. चौदाशे कोटी रुपये खर्चाच्या क्षेपणास्त्र चाचणी क्षेत्राची पायाभरणीही यावेळी होणार आहे.

****

आगामी योग दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये आज योगसाधना करण्यात आली. केंद्रीय आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यावेळी उपस्थित होते. यंदाचा अकरावा योग दिवस देशात एक लाख ठिकाणी साजरा होईल या दृष्टीने नियोजन करण्यात आलं आहे, त्यासाठी योगसंगम ॲप तयार करण्यात आलं असून, त्यात नोंदणी करून योगसाधना करता येईल अशी माहिती जाधव यांनी यावेळी दिली. योगामधून एकात्मिकता साधली जाते, ही साधना एका दिवसासाठी नसून निरंतर चालणारी चळवळ असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

****

उत्तराखंडमधल्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे आज उघडण्यात आले. मंदिर १०८ क्विंटल फुलांनी सजवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सपत्नीक केदारनाथाचं दर्शन घेतलं.

****

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतानं पाकिस्तानविरोधात आणखी एक कठोर पाऊल उचललं आहे. पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई क्षेत्र वापरण्यास २३ मे पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानात नोंदणी झालेली विमानं, पाकिस्तानी विमान कंपन्या किंवा संचालकांची मालकी असलेली किंवा भाडेतत्वावर असलेल्या विमानांसह लष्करी विमानांना, भारतीय हवाई क्षेत्र वापरण्यास बंदी असेल, असं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

दहशतवादाला देशातून समूळ नष्ट करण्याचा आमचा संकल्प असून, तो आम्ही निश्चित पूर्ण करु, असं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. हल्लेखोरांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या दहा वर्षात सरकारनं नक्षलवाद आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये असलेला तणाव दूर करण्यासाठी प्रयत्न केले, अनेक ठिकाणी यशस्वी शांतता करार झाल्याचंही शहा यांनी सांगितलं.

****

भारतीय चित्रपट छोट्या शहरातल्या प्रेक्षकांसाठीही परवडणारा व्हावा, अशी अपेक्षा, अभिनेता शाहरुख खान यांनी व्हेव्ज परिषदेत व्यक्त केली. ते या परिषदेत आयोजित केलेल्या फ्रॉम आउटसायडर टू रुलर या विशेष सत्रात काल बोलत होते. भारतीय चित्रपट आणि करमणूक क्षेत्र अधिक सशक्त होण्यासाठी विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट संस्था आणि उद्योगांबरोबर करार करण्यावर त्यांनी भर दिला. व्हेव्ज परिषदेनं चित्रपट, एनिमेशन, ओटीटी, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि इतर अत्याधूनिक तंत्रांना एकत्र आणलं असल्याचं अभिनेत्री दिपीका पदूकोण यावेळी म्हणाल्या.

****

राष्ट्रीय शिकावू उमेदवारी प्रोत्साहन - अप्रेंटिस योजनेत महाराष्ट्र देशात अव्वल राहिल्याबद्दल केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांनी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं अभिनंदन केलं आहे. चौधरी यांनी काल मंत्रालयात कौशल्य विकास विभागाला भेट दिली. यावेळी त्यांनी राज्यातल्या कौशल्य विकासाच्या उपक्रमांचा आढावा घेऊन विभागाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केलं. राष्ट्रीय शिकावू उमेदवारी प्रोत्साहन योजनेचा सध्या राज्यातल्या दोन लाख ७८ हजार प्रशिक्षणार्थी उमेदवार लाभ घेत असून, आयटीआय मधल्या तब्बल ५२ हजार विद्यार्थ्यांचा या योजनेत समावेश आहे.

****

देशाच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं महाराष्ट्रासह ११ राज्यांना या लाटेच्या प्रभावाखाली येणाऱ्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सांगितलं आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, बाहेर काम करणारे कामगार, वृद्ध, मुले आणि बेघर यांना अधिक धोका असेल असं आयोगानं या राज्यांच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. आयोगाने या पत्रात, उष्णतेशी संबंधित आजारांवर उपचार करण्यासाठी निवारा व्यवस्था, मदत साहित्याचा पुरवठा, कामाच्या वेळेत सुधारणा आणि मानक प्रक्रियांची उपलब्धता करण्याचं आवाहन केलं आहे.

****

जॉर्डनमधल्या अम्मान इथं झालेल्या पहिल्या आशियाई १५ आणि १७ वर्षाखालील मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताने १५ सुवर्ण, सहा रौप्य आणि २२ कांस्य पदकांची कमाई करत दुसरं स्थान मिळवलं.

****

चीनमध्ये सुरू असलेल्या सुदीरमन करंडक बँडमिंटन स्पर्धेत भारतानं इंग्लंडवर ३-२ अशी मात केली. मात्र डेन्मार्क आणि इंडोनेशिया विरूद्धचे सामने हरल्यानं भारतीय संघाला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यात अपयश आलं.

****

No comments: