Saturday, 3 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 03.05.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 03 May 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      ज्येष्ठ नागरिकांचा आनंद आणि कल्याणासाठी वचनबद्ध होण्याचं राष्ट्रपतींचं देशवासियांना आवाहन

·      चित्रपट चित्रीकरणासाठी महाराष्ट्रात दोन अत्याधुनिक स्टुडिओ उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा-नवी मुंबईत एज्यु सिटी उभारण्यात येणार

·      नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांना दिल्ली न्यायालयाकडून नोटीस जारी

·      येत्या २१ जूनला देशभरात एक लाख ठिकाणी अकरावा योग दिवस साजरा करण्याचं नियोजन

आणि

·      वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी उद्या रविवारी नीट परीक्षेचं आयोजन

****

ज्येष्ठ नागरिकांचा आनंद आणि कल्याणासाठी वचनबद्ध होण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व नागरिकांना केलं आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीनं काल ज्येष्ठ नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती भवनातून राष्ट्रपती बोलत होत्या. ज्येष्ठ नागरिक हे भूतकाळाशी संपर्काचा दुवा आणि भविष्यकाळासाठी मार्गदर्शक असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. त्या म्हणाल्या...

बाईट - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार, राज्यमंत्री रामदास आठवले आणि बी. एल. वर्मा या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत उपयुक्त साहित्याचं वितरण करण्यात आलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आंध्रप्रदेशात अमरावती इथं ५८ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी केली. सात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन तसंच सहा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आणि एका रेल्वे प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली.

****

चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी महाराष्ट्रात दोन अत्याधुनिक स्टुडिओ उभारले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबईत, वेव्हज् परिषदेत भारत पेव्हेलियनला मुख्यमंत्र्यांनी काल भेट दिली, त्यावेळी वार्ताहरांशी साधलेल्या संवादात त्यांनी ही माहिती दिली. या स्टुडिओमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चित्रीकरण करता येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले....

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राष्ट्रीय शेअर बाजाराच्या Nifty Waves Index चं उद्घाटन केलं. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातल्या ४३ कंपन्याच्या समभागांचा या निर्देशांकात समावेश आहे.

राज्य सरकारनं काल दोन विदेश विद्यापीठांशी सामंजस्य करार केले. या करारानुसार नवी मुंबई इथं एज्यु सिटी उभारली जाणार असून, दोन्ही विद्यापीठं प्रत्येकी पंधराशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

या परिषदेत काल दुसऱ्या दिवशी जागतिक माध्यम संवाद कार्यक्रम झाला. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी बोलतांना, संस्कृती सर्जनशीलतेला प्रेरित करत असल्याचं सांगत, संस्कृतीच्या वैविध्याला पाठिंबा देण्याची गरज व्यक्त केली.

वेव्हज् परिषदेत काल रेडिओ रि-इमॅजिन्ड या विषयावर चर्चासत्र झालं. भारत ही नभोवाणीची सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचं, प्रसारभारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी शशी वेम्पट्टी यांनी नमूद केलं.

वेव्हज् परिषदेत जगभरातले आशय निर्माते, विविध माध्यम समूहांचे प्रमुख कार्यकारी अधिकारी सहभागी होत आहेत. या परिषदेतून निर्माण होणाऱ्या संधीविषयी क्राफ्टन इंडियाचे वरिष्ठ अधिकारी सौरभ शहा यांनी शासनाचे आभार व्यक्त केले...

बाईट - सौरभ शहा

दरम्यान, या परिषदेत काल आठ हजार कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार करण्यात आले.  आज या परिषदेत कम्युनिटी रेडिओवरील राष्ट्रीय संमेलनासह सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

सातबारा उताऱ्यावरील कालबाह्य तसंच निरुपयोगी नोंदी हटवून, त्याऐवजी वास्तवातील नोंदी दाखल करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात जिवंत सात बारा मोहीम सुरू करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या मोहिमेमार्फत वारसांची नोंद, जमिनीचं स्वामित्व, भोगवट्याचे प्रकार, आणि स्मशानभूमीसारख्या सार्वजनिक जागांची नोंद, अधिकार अभिलेखात होणार आहे.

****

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी दिल्लीच्या रोऊज एव्हेन्यू न्यायालयानं काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना काल नोटीस जारी केली. सोनिया गांधी आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिग प्रतिबंधक कायद्याखाली ईडी, अर्थात सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल का घेऊ नये, याची कारणं स्पष्ट करायला न्यायालयानं सांगितलं आहे.

****

११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या ५० दिवसांच्या उलट गणनेनिमित्त काल नाशिक इथं योग महोत्सव घेण्यात आला. पंचवटीत रामकुंड परिसरातल्या गौरी मैदान इथं सामूहिक योग प्रात्यक्षिकांनी योग महोत्सवाची सुरुवात झाली. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक मान्यवर, यावेळी उपस्थित होते. ११ वा योग दिवस देशात एक लाख ठिकाणी साजरा होईल, अशी माहिती जाधव यांनी यावेळी दिली. ते म्हणाले,

बाईट - केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव

****

दळणवळण सुविधा वाढवून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी म्हटलं आहे. काल लातूर इथं नवीन बांधकाम भवन कार्यालयाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्याच्या विकासाला गती देणारी कामं प्राधान्याने हाती घेतली जाणार असल्याचं भोसले यांनी सांगितलं.

****

उद्या रविवारी चार मे रोजी वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठीची चाचणी - नीट परीक्षा होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर इथं ४९ केंद्रांवर नीट चाचणी घेण्यात येणार असून १९ हजार ५०० विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. प्रशासनाने केलेल्या सज्जत्तेचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल आढावा घेतला. प्रत्येक परीक्षा केंद्र सीसीटीव्ही कॅमेऱ्याने जोडलेलं असून प्रत्येक परीक्षार्थीची तपासणी केली जाईल. कोणताही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस कुणीही सोबत बाळगणार नाही याची खातरजमा केली जाणार असून दुपारची वेळ असल्याने विद्यार्थांसाठी उन्हापासून बचाव करण्याची व्यवस्था केली जाईल, तसंच प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक वैद्यकीय पथक तैनात असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिली.

**

लातूर जिल्ह्यात विविध ५१ उपकेंद्रावर नीट परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर आणि परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी उद्या ४ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

****

परभणी जिल्ह्यात कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ करु या अभियानाचा काल शुभारंभ करण्यात आला. जिंतूर तालुक्यातल्या कुंभारी इथं गावकरी महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना या अभियानाबद्दल आणि स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आलं.

दरम्यान, या अभियानाला नांदेड जिल्ह्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळात आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये या अभियानाचा लोकप्रतिनिधींच्‍या हस्‍ते उत्साहात शुभारंभ करण्यात आला.

****

छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेत आडकाठी आणल्यास, कडक कायदेशीर कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्यासोबत या योजनेशी संबंधित यंत्रणेची पवार यांनी संयुक्त बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. प्रशासक जी श्रीकांत यावेळी बोलतांना, थेट पंतप्रधान कार्यालयातून या योजनेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवलं जात असल्याचं सांगितलं.

****

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत बीड जिल्ह्यात ३५ शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रकल्प मंजूर झाले असून २३ शेतकरी उत्पादक कंपन्यांना १९ कोटी ९४ लाख रुपये अनुदान वितरीत करण्यात आलं आहे.

****

हवामान

राज्यात काल सर्वात जास्त ४४ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान अकोला तसंच बुलडाणा इथं नोंदवलं गेलं. परभणीत इथं ४१ पूर्णांक सहा, छत्रपती संभाजीनगर इथं ४२, धाराशिव इथं ४२ पूर्णांक चार तर बीड इथं ४२ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

No comments: