Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 04 May 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ मे २०२५ दुपारी १.०० वा.
****
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान
खान आणि पाकिस्तानी नेते बिलावल भुत्तो यांच्या एक्स अकाऊंटवर आज भारताने बंदी घातली.
पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची चोहोबाजूंनी
नाकाबंदी करण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गतच ही कारवाई करण्यात आली आहे. राजस्थानच्या
श्रीगंगानगर इथं भारतीय हद्दीत आलेल्या पाकिस्तानी सैनिकाला भारतीय जवानांनी ताब्यात
घेतलं. या पाकिस्तानी सैनिकाची सीमा सुरक्षा दलाकडून चौकशी सुरू आहे. पाकिस्तानी सैनिकाला
पकडल्यानंतर सीमा सुरक्षा दलाने श्रीगंगानगर भागात सुरक्षा व्यवस्था आणखी वाढविली आहे.
दरम्यान, आज
पहाटे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी मोठ्या प्रमाणात गोळीबार केल्याचं
वृत्त आहे. कुपवाडा, बारामुल्ला, राजोरी,
पूंछ भागामध्ये पाकिस्तानी सैन्याकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात
आला. भारतीय जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्यूत्तर दिलं आहे.
****
निवडणुकीशी संबंधित सर्व सेवा एकाच
ठिकाणी मिळू शकतील, असे
एक नवीन अॅप निवडणूक आयोग सुरू करणार आहे. इसीनेट असे या अॅपचे नाव असेल. हे अॅप
निवडणूक आयोगाच्या ४० हून अधिक विद्यमान मोबाइल आणि वेब अॅप्लिकेशन्सना एकत्र आणेल.
मतदार, निवडणूक अधिकारी, राजकीय पक्ष आणि
इतर सर्वांसाठी हे अॅप उपयुक्त असेल. याचा वापर करणाऱ्यांना निवडणूक आयोगाशी संबंधित
इतर अॅप डाऊनलोड करण्याची गरज असणार नाही.
****
योगसाधना आणि दीर्घायुष्यासाठी प्रसिद्ध
असलेले पद्मश्री योगगुरू बाबा शिवानंद यांचं काल काशी इथं निधन झालं. मृत्यूसमयी त्यांचं
वय १२९ वर्षे होतं. बाबा शिवानंद यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. बाबा शिवानंद यांना २०२२ मध्ये
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
होते.
****
मुंबईत गेल्या चार दिवसांपासून सुरू
असलेल्या जागतिक वेव्हज् परिषदेचा आज समारोप होत आहे. आज, चित्रपट निर्मिती या विषयावर सत्रे आणि
सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात ९० हून अधिक देशांतील
दहा हजारांहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
****
भगवान परशुराम यांचे भव्य मंदिर छत्रपती
संभाजीनगर इथं सिडकोतील स्वामी
विवेकानंद नगरात उभारले जाणार आहे. परशुराम मंदिर उभारणीच्या कामाचे भूमिपूजन खासदार
संदीपान भुमरे, आमदार
प्रदिप जैस्वाल यांच्या उपस्थितीत झाले. या मंदिरात प्रभू श्रीराम आणि भगवान परशुराम
यांच्या मूर्ती असणार आहेत. डिसेंबर महिन्याअखेर मंदिराच बांधकाम पूर्ण होणार असल्याचे
मंदिर नियोजन समितीच्या अध्यक्षा अंजली देशपांडे यांनी सांगितले.
****
भारतीय कुटुंब व्यवस्थेची शाश्वत
मूल्य आजही कायम असल्याचं मत निवृत्त प्राध्यापक डॉ. स्मिता अवचार यांनी व्यक्त केलं
आहे. छत्रपती संभाजीनगर इथं साहित्य भारतीच्या कुटुंब व्यवस्थेवर आधारित कथा लेखन स्पर्धेच्या
पारितोषिक वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. अशा स्पर्धेत नव्या पिढीचा सहभाग अपेक्षित
असेल तर स्पर्धेचं माध्यम बदलावं लागेल, असंही डॉ. अवचार यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
साहित्य भारतीचे प्रदेश संघटनमंत्री नितीन केळकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते कथा
स्पर्धेतल्या विजेत्यांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली.
****
नांदेड रेल्वे विभागातून धावणाऱ्या
सहा रेल्वे तात्पुरत्या रद्द करण्यात आल्याचं रेल्वे विभागातर्फे कळवण्यात आलं आहे.
यात अदिलाबाद-नांदेड-अदिलाबाद, पूर्णा-परळी-पूर्णा, नांदेड-निजामाबाद-नांदेड,
अकोट -आकोला-अकोट या रेल्वे उद्यापर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. तर,
नांदेड-मनमाड ही रेल्वे आजपासून सहा तारखेपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
****
सातव्या खेलो इंडिया स्पर्धेला आज
बिहारमध्ये प्रारंभ होत आहे. बिहारमध्ये ही स्पर्धा प्रथमच आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत पाच हजार खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतील नेमबाजी, जिम्नॅस्टिक्स आणि ट्रॅक सायकलिंगच्या
स्पर्धा दिल्लीत होणार असून उर्वरित स्पर्धा बिहार मधल्या पाच शहरांमध्ये होतील.
खेलो इंडिया स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून
४३७ खेळाडू सहभागी होत आहेत. आर्चरी, कबड्डी, ज्युदो,
मल्लखांब, जलतरण, खो-खो या
खेळातील १९० सहभागी खेळाडूंचे पहिले पथक काल पाटणा इथं रवाना झाले. उद्या नेमबाजी स्पर्धेतील
१३ खेळाडूंचा संघ रवाना होणार आहे. गेल्या वर्षी १५८ पदे जिंकत महाराष्ट्र पहिल्या
स्थानावर राहिला.
****
आयपीएल स्पर्धेत आज पहिला सामना
कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार असून दुसरा सामना पंजाब किंग्ज
आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे.
****
देशाच्या उत्तरेकडील राज्यांसह अन्य
काही भागात येत्या २४ तासात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. राज्यात
काल सर्वात जास्त ४४ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात
छत्रपती संभाजीनगर इथं ४२ पूर्णांक दोन, धाराशिव इथं ४२ पूर्णांक
सहा, बीड इथं ४२ पूर्णांक आठ तर परभणी इथं ४४ अंश सेल्सिअस तापमानाची
नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment