Sunday, 4 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.05.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 04 May 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे देशात रेल्वे सुविधांच्या कायापालटासह अर्थव्यवस्थेला चालना मिळणार-रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून विश्वास व्यक्त

·      वेव्ज परिषदेत दहावे राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ पुरस्कार प्रदान-नवोन्मेष श्रेणीत सांगलीच्या येरला वाणी रेडिओला पहिला पुरस्कार

·      पाकिस्तानविरोधातल्या धोरणाचा भाग म्हणून भारताकडून आयात आणि टपाल बंदी लागू; पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांमधे प्रवेश बंद

·      वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठीची चाचणी - नीट परीक्षा आज, राज्यात ३५ शहरांमध्ये दोन लाख ७९ हजार विद्यार्थी

आणि

·      छत्रपती संभाजीनगर इथल्या दहा विद्यार्थ्यांची इस्रोला अभ्यास सहलीसाठी निवड

****

बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे देशात रेल्वे सुविधांचा कायापालट होणार असून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत काल वांद्रे कुर्ला संकुलातल्या प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या जागेला वैष्णव यांनी भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी अभियंते आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली तसंच हा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.

दरम्यान, प्रसारमाध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भारत जगाचं नेतृत्व करु शकतो असं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी हा विश्वास व्यक्त केला, ते म्हणाले...

बाईट - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

गुगल, मेटा आणि मायक्रोसॉफ्ट सह सात आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी काल वेव्ह्ज २०२५ परिषदेत Indian Institute of Creative Technology बरोबर सामंजस्य करार केल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.

****

कम्युनिटी रेडिओच्या देशभरात सुरु असलेल्या कार्याची, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी प्रशंसा केली आहे. ते काल वेव्हज् परिषदेत कम्युनिटी रेडिओच्या उद्घाटन सत्रात बोलत होते. सर्व कम्युनिटी रेडिओ काही उद्दिष्टांनी चालवली जात असून, त्यामुळे आपल्या परंपरांना प्रोत्साहन मिळत असल्याचं ते म्हणाले. यापुढील काळात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून जास्तीत जास्त समुदायापर्यंत पोहोचण्यासाठी कम्युनिटी रेडिओ यांनी प्रयत्न करावेत, असं आवाहनही मुरुगन यांनी यावेळी केलं.

दहाव्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ पुरस्कारांचं वितरण मुरुगन यांच्या हस्ते झालं. नवोन्मेष श्रेणीत राज्यातल्या येरला वाणी या कम्युनिटी रेडिओला राष्ट्रीय पातळीवर पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला. जत तालुका परिसरात ऐकू येणाऱ्या या कम्युनिटी रेडिओने बालविवाह आणि इतर कुप्रथांबाबत प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केला होता. या रेडिओनं आतापर्यंत मिळवलेला हा तिसरा राष्ट्रीय पुरस्कार आहे.

माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी या कार्यक्रमात बोलतांना, कम्युनिटी रेडिओच्या कामकाजातून समर्पण आणि वचनबद्धता प्रतीत होत असल्याचं मत व्यक्त केलं.

दरम्यान, काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलताना जाजू यांनी, वेव्ह्ज बाजार २०२५ मधून हजारो कोटी रुपयांची व्यवसाय निर्मिती झाल्याचं सांगितलं. उच्च श्रेणीतल्या कंपन्या वेव्ह्ज बाजारमध्ये सहभागी होत असल्याची माहिती त्यांनी दिली. वेव्ह्ज परिषदेचा आज समारोप होणार आहे.

****

गोव्यात शिरगाव इथल्या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. शिरगाव इथं लईराई देवीच्या जत्रेत चेंगराचेंगरी होऊन सहा जणांचा मृत्यू झाला, तर ८० जण जखमी झाले. काल पहाटे देवळाच्या आवारात निखाऱ्यांवरून अनवाणी चालण्याच्या पारंपरिक कार्यक्रमादरम्यान, भाविकांमध्ये अचानक गोंधळ उडाल्याने ही घटना घडली. जखमींना म्हापसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी या जखमींची विचारपूस केली, तसंच त्यांच्या उपचारांचा पूर्ण खर्च सरकारतर्फे केला जाईल असं जाहीर केलं.

****

पहलगाम हल्ल्यानंतरच्या धोरणाचा भाग म्हणून भारताने पाकिस्तानकडून आयात बंद केली आहे. पाकिस्तानातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या निर्यात झालेल्या किंवा वाटेत असलेल्या सर्व प्रकारच्या वस्तूंवर तात्काळ बंदी घातल्याची अधिसूचना परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने जारी केली आहे. यातून सूट मिळवायची असल्यास सरकारची वेगळी परवानगी घ्यावी लागेल असं अधिसूचनेत म्हटलं आहे.

पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरात प्रवेश नसेल, असं बंदर, नौकानयन आणि जलमार्ग वाहतूक मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. पाकिस्तानातून हवाई, सागरी किंवा खुष्कीच्या मार्गाने टपाल आणि पार्सल आणणं दूरसंचार मंत्रालयाने थांबवलं असून, भारतातूनही पाकिस्तानात टपाल किंवा पार्सलही जाणार नाही असं मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

****

वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठीची चाचणी - नीट परीक्षा आज होणार आहे. राज्यात ३५ शहरांमध्ये दोन लाख ७९ हजार विद्यार्थी ही परिक्षा देणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर इथं ४९ केंद्रांवर, १९ हजार ५०० विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. प्रशासनाने केलेल्या सज्जत्तेचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल आढावा घेतला. प्रत्येक परीक्षा केंद्र सीसीटीव्ही कॅमेऱ्याने जोडलेलं असून, प्रत्येक परीक्षार्थीची तपासणी केली जाईल. कोणताही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस कुणीही सोबत बाळगणार नाही याची खातरजमा केली जाणार असून, दुपारची वेळ असल्याने विद्यार्थांसाठी उन्हापासून बचाव करण्याची व्यवस्था केली जाईल, तसंच प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक वैद्यकीय पथक तैनात असेल, अशी माहिती स्वामी यांनी दिली.

**

लातूर जिल्ह्यात विविध ५१ उपकेंद्रावर नीट परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर आणि परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

नांदेड जिल्ह्यात ५६ उपकेंद्रावर जवळपास २० हजार विद्यार्थी नीट परीक्षा देणार आहेत.

****

जातीनिहाय जनगणना ही अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमातींना निधी देण्यासाठी उपयोगी असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकारांशी बोलत होते. राज्यात पक्षाच्या विस्तारासाठी बैठका घेण्यात येत असून, सर्वांच्या सहमतीनं योग्य निर्णय घेतले जात असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातल्या पाकिस्तान विरोधी कारवाईला पूर्ण पाठिंबा असल्याचंही पाटील यांनी यावेळी सांगितलं.

****

सांगली जिल्ह्यात मिरज विद्यार्थी संघाच्या शतक महोत्सवी वसंत व्याख्यानमालेला काल विद्यावाचस्पती शंकरराव अभ्यंकर यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, मिरज विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद पाठक, यांच्यासह रसिक मोठ्या संख्येनं या उद्वाटन सोहळ्याला उपस्थित होते. १७ मे पर्यंत चालणाऱ्या या व्याख्यानमालेत यंदा १६ व्याख्यानं होणार आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर इथले दहा विद्यार्थी बंगळूरू इथं भारतीय अवकाश संशोधन संस्था-इस्रोला भेट देण्यासाठी जाणार आहेत. या दौऱ्याची निवड चाचणी म्हणून सातवीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांची स्मार्ट स्टुडंट परीक्षा घेण्यात आली. यातून निवड झालेल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये महापालिकेच्या हर्सुल इथल्या शाळेचे कोमल गायकवाड, क्षितिज कांबळे आणि श्रावण लोखंडे या तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शिक्षिका सविता बांबर्डे यांनी या चाचणीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत तसंच उपायुक्त अंकुश पांढरे यांनी या विद्यार्थ्यांचं तसंच शिक्षकांचं अभिनंदन केलं आहे.

****

धुळे पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने बीड जिल्ह्यातल्या चोरट्यांच्या टोळीला अटक केली आहे. खिडकी गँग म्हणून कुप्रसिद्ध असलेली ही टोळी, खिडक्यांना लावलेली लोखंडी जाळी काढून घरात घुसून चोऱ्या करत असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्याकडून ५ मोबाईल, एक चारचाकी आणि इतर साहित्यासह चोरी केलेले ११ लाख ३३ हजार रुपयांचे दागिनेही पोलिसांनी हस्तगत केले असून, पाच जणांच्या या टोळीतल्या प्रत्येकावर राज्यभरात ३० पेक्षाही अधिक गुन्ह्यांची नोंद आहे.

****

नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या रोजगार मेळाव्यात काल दुपारपर्यंत तीन हजार उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली. जिल्हा पोलीस मुख्यालयात झालेल्या या मेळाव्यासाठी ११ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. देशभरातल्या ९६ कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मेळाव्यात मुलाखती घेऊन विद्यार्थ्यांची निवड केली.

****

मुंबईत सुरू असलेल्या वेव्ह्ज परिषदेच्या पार्श्वभूमीवर धाराशिव इथं आज विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा, मीडिया आणि अर्थशास्त्रविषयक चर्चासत्र, तसंच लोककलांचं सादरीकरण होणार आहे.

****

हवामान

राज्यात काल सर्वात जास्त ४४ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ४२ पूर्णांक दोन, धाराशिव इथं ४२ पूर्णांक सहा, बीड इथं ४२ पूर्णांक आठ तर परभणी इथं ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

No comments: