Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 May 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ मे २०२५ सायंकाळी ६.१०
****
· पाच हजार ५०३ कोटी रुपयांच्या मंदीर विकास आराखड्यांना राज्य मंत्रिमंडळाची मान्यता, महिलांच्या
सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबवण्याचा निर्णय
· देशभरात उद्या युद्ध सज्जता सराव, राज्यात छत्रपती संभाजीनगरसह
१६ ठिकाणांचा समावेश
· येत्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे
सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
आणि
· आजपासून पुढचे पाच दिवस मराठवाड्यात अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता
****
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या
त्रिशताब्दी जयंती वर्षाचं औचित्य साधून त्यांच्या मंदिर पुनर्निमाणाच्या कामाला अभिवादन
म्हणून पाच हजार ५०३ कोटी ६९ लाख रुपयांच्या मंदीर विकास आराखड्यांना राज्य मंत्रिमंडळाने
मान्यता दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्तानं
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातल्या चौंडी इथं
घेण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
बाईट - मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
राज्यातल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती
अभियान राबवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात
आला. याअंतर्गत कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूचं
प्रमाण कमी करणं,
लिंगभेदात्मक बाबी दूर सारत मुलींमध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढवणं, बालविवाहमुक्त
समाजनिर्मिती,
लैंगिक-शारीरिक अत्याचाराला प्रतिबंध करुन हिंसाचारमुक्त कुटुंब
आणि समाजनिर्मिती,
अनिष्ठ रुढींचं निर्मूलन, महिलांना शासकीय योजनांचा
लाभ आणि स्वयंरोजगाराच्या संधी, देण्यात येणार आहे. हे आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे
राबवणाऱ्या ग्रामपंचायतींना आदिशक्ती पुरस्कारही देण्याचा
निर्णय यावेळी घेण्यात आला.
अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई
होळकर वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करणं, मुलींसाठी स्वतंत्र आयटीआय स्थापन
करणं, अहिल्यादेवींच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट तयार करणं, धनगर
समाजातल्या विद्यार्थ्यांना नामांकित शाळांना प्रवेश देण्याबाबत यशवंत विद्यार्थी योजना
राबवणं, धनगर समाजातल्या मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी
वसतिगृह योजना सुरू करणं,
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधीकरण अध्यादेश-२०२५ जारी
करणं, आदी निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
****
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर सहकारी सूतगिरणीच्या कामाचं तसंच चौंडी ते निमगाव डाकू या रस्त्याचं भूमीपूजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलं. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत
निर्माण होत असलेल्या या रस्त्याच्या कामासाठी राज्य शासनानं तीन कोटी ९४ लाख रुपयांच्या
खर्चाला मान्यता दिली आहे.
****
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त
त्यांना आज अभिवादन करण्यात येत आहे. सामाजिक समता प्रस्थापित करणारे, बहुजनांचे
तारणहार असलेले शाहू महाराज यांच्या महान विचार आणि कार्याला शतश: प्रणाम, अशा
शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाहू महाराजांना अभिवादन केलं आहे. तर, सामाजिक
परिवर्तनाला गती देत समाज विकास करण्यात शाहू महाराजाचं योगदान अमूल्य असल्याचं उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी म्हटलं आहे.
****
देशभरात उद्या मॉक ड्रिल म्हणजेच युद्ध सज्जता
सराव होणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर
युद्धसदृश स्थिती उद्भवण्याची शक्यता गृहीत धरून सुसज्ज राहण्याच्या उद्देशानं केंद्रीय
गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत. केंद्रीय गृह सचिव गोविंद
मोहन यांनी आज त्यासंदर्भात सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेतली. देशभरातल्या
२४४ नागरी संरक्षण प्रभागांमध्ये हा सराव होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रात मुंबई, उरण, तारापूर, ठाणे, पुणे, नाशिक, नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ
वायशेत, पिंपरी चिंचवड,
भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणांचा समावेश आहे.
****
प्रदूषण, हवामान बदल आणि बदलती
जीवनशैली यामुळे रुग्णसंख्या वाढत असलेल्या तसंच दीर्घकालीन आजारांपैकी एक मानल्या
जाणाऱ्या अस्थमा म्हणजेच दमा या आजाराबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं आज सर्वत्र
‘जागतिक दमा दिवस’ साजरा केला जात आहे. “श्वासावाटे
घेतली जाणारी दम्याची औषधं सर्वांना सहज उपलब्ध करून देणं” ही यावर्षीची संकल्पना आहे.
****
येत्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था
आणि महापालिकांच्या निवडणुका घ्याव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं
राज्य सरकारला दिले आहेत. यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं, २०२२
च्या आधी अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या स्थितीनुसारच या निवडणुका घेण्याचे
तसंच चार आठवड्यांच्या आत निवडणुकीसंदर्भात अधिसूचना काढण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या
या आदेशामुळे राज्य सरकारला मुंबई, पुण्यासह राज्यातल्या अनेक महानगरपालिका, जिल्हा
परिषदा, पंचायत समित्या आणि नगर पंचायतीच्या निवडणुका आता ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात
किंवा सप्टेंबर महिन्यात घ्याव्या लागणार असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
“टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” याअंतर्गत आज
‘तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर’ या विषयावर कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी
मार्गदर्शन केलं. शासकीय कामात माहितीचं व्यवस्थापन, वेळेचं नियोजन, कामाचं
निरीक्षण आणि अहवाल व्यवस्थापन करण्यामध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी
अनेक टूल्स उपलब्ध असून,
या टूल्सचा वापर केला तर शासकीय कामकाजात नक्कीच गतिमानता येईल, असं
मत त्यांनी व्यक्त केलं.
****
भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल
आणि मनोरंजन अर्थात वेव्हज शिखर परिषदेत गौरवण्यात आलेल्या आसावरी बोधनकर जोशी यांचा
आज लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. त्या या महाविद्यालयाच्या
माजी विद्यार्थिनी आहेत. भारत की गूंज, या राष्ट्रीय स्तरावरच्या रिअॅलिटी
शोमध्ये आसावरी यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत स्टार ऑफ द सिझन हा पुरस्कार पटकावला असून, हा
बहुमान मिळवणाऱ्या त्या भारतातल्या पहिल्या कलाकार ठरल्या आहेत.
****
मराठवाड्यात अनेक भागात आजही अवकाळी पाऊस
झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव
तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. तसंच गंगापूर तालुक्यातल्या मांजरी इथं
गारपीट झाली.
****
दरम्यान, आजपासून पुढचे पाच दिवस
मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान
केंद्रानं वर्तवली आहे. यामध्ये उद्या छत्रपती संभाजीनगर, जालना
आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
****
दरम्यान, राज्यात आज सर्वात जास्त
४१ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान मालेगाव इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी आणि
बीड इथं सरासरी ४१,
धाराशिव इथं ४० पूर्णांक सहा, तर छत्रपती संभाजीनगर
इथं ३८ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून देण्यात
आलेल्या विविध ठिकाणच्या एकूण पंधरा हजार प्रमाणपत्रांमधली ५० टक्के जन्म प्रमाणपत्र
बोगस असल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. बीड इथं पोलिस अधीक्षक
नवनीत काँवत यांची भेट घेतल्यानंतर ते आज माध्यमांशी बोलत होते. सोमय्या यांनी बोगस
प्रमाणपत्र संदर्भात बीड जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या करदात्यांकडून
२०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण दोन हजार सातशे ब्याण्णव कोटी सत्तावन्न लाख रुपये इतका
वस्तू आणि सेवा कर वसूल झाला आहे. ही रक्कम जिल्ह्यासाठी निर्धारित केलेल्या लक्ष्याच्या
अठ्ठ्याण्णव पूर्णांक नऊ टक्के इतकी आहे. प्रलंबित कर भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी
जी एस टी विभागानं राबवलेल्या ॲम्नेस्टी योजनेचा लाभ घेत अनेक करदात्यांनी कर भरला
आहे.
****
जालना शहरातल्या गांधीनगर भागात आज सकाळी
मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. संध्या प्रभूदास
पाटोळे, असं मृत मुलीचं नाव आहे. जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करत महापालिका आयुक्तांशी संवाद साधून मोकाट कुत्र्यांचा तातडीनं
बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले.
****
साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेसमधून, एक
लाख ४ हजार ९०० रुपये किमतीचा २ किलो २०५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. रेल्वे संरक्षण
दलाचं देखभाल पथक आणि गोंदिया पोलिसांनी संयुक्तपणे, ऑपरेशन नार्कोस अंतर्गत
ही कारवाई केली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment