Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 06 May 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ मे २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
सर्व राज्यांनी उद्या संरक्षण मॉक ड्रील राबवण्याचे केंद्रीय
गृह मंत्रालयाचे निर्देश
·
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चिनाब नदीवरल्या बागलिहार
धरणातून पाकिस्तानला जाणारं पाणी अडवण्याचा भारताचा निर्णय
·
राजकीय कार्यसंस्कृती सक्षम करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचं
मोठं योगदान - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं प्रतिपादन, शासनाच्या
टेकवारी उपक्रमाला प्रारंभ
·
राज्याचा बारावीचा निकाल सुमारे ९२ टक्के - छत्रपती संभाजीनगर
विभागातून बीड, तर लातूर विभागातून धाराशिव अव्वल
आणि
·
मराठवाड्यात अनेक भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस, अंबाजोगाई
तालुक्यात वीज पडून एका युवकाचा मृत्यू
****
केंद्रीय
गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना उद्या सात मे रोजी संरक्षण मॉक ड्रील राबवण्याचे निर्देश
दिले आहेत. या दरम्यान हवाई हल्ल्याच्या धोक्याची सूचना देणारे सायरन वाजवण्यात येणार
असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. नागरिकांना सुरक्षेबाबत सर्व आवश्यक
सूचना देण्याचे तसंच सुरक्षित स्थळी पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे निर्देशही मंत्रालयाने
दिले आहेत. आपत्कालीन स्थितीचा सर्वसामान्यांना सराव होण्याच्या दृष्टीनं ही मॉक ड्रील
केली जाते.
दरम्यान, पहलगाम दहशतवादी
हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत संरक्षण सचिव राजेश कुमार यांच्याशी महत्त्वपूर्ण
चर्चा केली. या संदर्भात पाकिस्तानची कोंडी करण्याचा भाग म्हणून, काश्मीरातून वाहणाऱ्या चिनाब नदीवरल्या बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारं
पाणी अडवण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे. झेलम नदीवरल्या किशनगंगा धरणाचं पाणी रोखण्याचा
विचारही भारत करत असल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
वक्फ सुधारणा
कायदा २०२५ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आता येत्या १५ मे रोजी
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्यासह
न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या पीठासमोर काल सुनावणी
होणार होती, मात्र आपण लवकरच सेवानिवृत्त होणार असल्यानं, या प्रकरणाची सुनावणी भावी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या पीठासमोर होईल,
असं सांगून सरन्यायाधीशांनी पुढची तारीख दिली आहे.
****
राजकीय
कार्यसंस्कृती सक्षम करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचं मोठं योगदान असून, टेकवारी उपक्रमामुळे
राज्यातलं मनुष्यबळ अधिक तंत्रकुशल, गतिमान, पारदर्शक आणि जबाबदार होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी व्यक्त केला. टेक वारी - महाराष्ट्र टेक लर्निंग वीकचं उद्घाटन केल्यानंतर
ते काल बोलत होते. आपण बदलांचा केवळ स्वीकार करत नसून, बदलाचं
नेतृत्व करत असल्याचा संदेश ‘टेक वारी’ उपक्रमाच्या माध्यमातून जाईल, असं मत पवार
यांनी व्यक्त केलं. प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी,
प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी टेक वारी हा प्रशिक्षण आठवडा
साजरा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नऊ मे रोजी
दुपारी ३ वाजता, संत परंपरा आणि भक्तिभावाला उजाळा देणाऱ्या
“ज्ञानाची वारी” या सांस्कृतिक कार्यक्रमाने 'टेक वारीचा'
समारोप होणार आहे.
****
अहिल्यानगर
जिल्ह्यातल्या चौंडी इथं आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई
होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीचं औचित्य साधून ही बैठक आयोजित केल्याचं जलसंपदा मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र
काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन
सपकाळ यांचा नेतृत्वाखाली काल परभणी शहरात संविधान बचाओ पदयात्रा काढण्यात आली. राज्यात
कायदा आणि सुव्यवस्था राहिली नसल्याचं सांगत त्यांनी सरकारवर टीका केली. विधीमंडळ पक्षनेते
विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस पक्षाचे इतर नेते, पदाधिकारी
आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
****
कांदा निर्यात
धोरणाविरोधात २०२० मध्ये लासलगाव इथं लॉकडाऊनमध्ये केलेल्या आंदोलनप्रकरणी रयत क्रांती
सेनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची निफाड न्यायालयाने निर्दोष मुक्तता
केली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यासह आठ जणांवर लासलगाव पेालीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला होता.
****
महाराष्ट्र
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या
इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. परीक्षेचा एकूण निकाल ९१ पूर्णांक
८८ शतांश टक्के इतका लागला. यंदा विज्ञान शाखेचा निकाल ९७ पूर्णांक ३५ शतांश टक्के, कला शाखेचा
८० पूर्णांक ५२ शतांश टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल ९२ पूर्णांक ६८ शतांश टक्के इतका
लागला आहे. निकालाबाबत अधिक माहिती देणारा हा वृत्तांत..
‘‘राज्यात कोकण
विभागाचा निकाल सर्वाधिक ९६ पूर्णांक ७४ शतांश टक्के लागला असून त्याखालोखाल मुंबई
विभागाचा निकाल ९२ पूर्णांक ९३ शतांश टक्के इतका लागला आहे, पुणे विभाग
९१ पूर्णांक ३२ शतांश टक्के, नागपूर ९० पूर्णांक ५२, छत्रपती संभाजीनगर ९२ पूर्णांक २४, कोल्हापूर ९३
पूर्णांक ६४, अमरावती ९१ पूर्णांक ४३, नाशिक
९१ पूर्णांक ३१, तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे
८९ पूर्णांक ४६ शतांश टक्के इतका लागला आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागात
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ९२ पूर्णांक ९० टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले, बीड ९३ पूर्णांक
७३, जालना ९० पूर्णांक १०, परभणी ८४ पूर्णांक
५३, तर हिंगोली जिल्ह्याचा ८६ पूर्णांक शून्य सहा टक्के निकाल
लागला आहे.
लातूर विभागातून लातूर जिल्ह्याचा
निकाल ८६ पूर्णांक ३८ टक्के लागला असून, नांदेड जिल्ह्याचा
निकाल ९० पूर्णांक ८२ टक्के तर धाराशिव जिल्ह्याचा निकाल ९२ पूर्णांक ३२ टक्के लागला
आहे.
सर्व विद्यार्थ्यांना आजपासून
आपापल्या महाविद्यालयातून गुणपत्रिका मिळणार आहेत.’’
आकाशवाणी
बातम्यांसाठी, हर्षवर्धन दीक्षित, छत्रपती संभाजीनगर
****
शिक्षण
मंत्री दादा भुसे यांनी परीक्षेत यश मिळविलेले विद्यार्थी, त्यांचे पालक
आणि शिक्षकांचं अभिनंदन केलं आहे. विद्यार्थ्यांनी आवड आणि कल पाहून पुढील मार्ग निश्चित
करावेत, ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही,
त्यांनी नव्या उमेदीनं अभ्यासाला लागावं आणि यश संपादित करावं,
असं ते म्हणाले.
****
दरम्यान, बारावी परीक्षेत
राज्यात गैरप्रकार आढळलेल्या तीन हजार ३७३ केंद्रांपैकी १२४ केंद्राची चौकशी होणार
असल्याची माहिती, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर विभागात २१४, तर लातूर विभागात ३७ कॉपी प्रकार
उघडकीस आले आहेत.
****
मराठवाड्यात
काल अनेक भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी
गारपीट झाली. बीड जिल्ह्यात आष्टी तसंच अंबाजोगाई परिसरात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस
झाला, या पावसामुळे आंब्यासह भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची
भीती वर्तवण्यात येत आहे. अंबाजोगाई तालुक्यातल्या मगरवाडी इथं वीज पडून एका युवकाचा
मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.
जालना शहरासह
जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. काही भागात बोरांच्या आकाराच्या
गाराही पडल्या. या अवकाळी पावसामुळे आंबा फळपिकासाह कांदा बियाणे, उन्हाळी बाजरी,
मका आणि इतर पिकांचे नुकसान झाल्याचं आमच्या वारताहरानं कळवलं आहे. शहागड
परिसरात जाहिरातीचं मोठं फलक अंगावर कोसळल्याने कृष्णा मस्के हा तरुण गंभीर जखमी झाला.
लातूर शहर
आणि परिसरातही काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह, अवकाळी पावसाने
हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, तसंच लातूर शहराच्या अनेक भागातला वीज पुरवठा खंडित झाला होता.
परभणी तसंच
हिंगोली जिल्ह्यातही काल गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. शेतातील हळद काढणाऱ्या तसंच हळद
वाळत घातलेल्या शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
पुढच्या दोन दिवसांतही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, राज्यात काल
सर्वाधिक ४२ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान वाशिम इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात
छत्रपती संभाजीनगर इथं ३९ अंश तर परभणी इथं ४१ पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची
नोंद झाली.
****
केंद्र
सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने अंबाजोगाई इथल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेत सैनिकी शाळा
सुरू करण्यास मान्यता दिली आहे. मुला-मुलींना नियमित अभ्यासासोबतच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या
सक्षम करणं, हा या शाळांचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत मराठवाड्यातून
निवड झालेली योगेश्वरी ही एकमेव शिक्षण संस्था आहे.
****
परभणी जिल्ह्यात
महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रातल्या खुल्या जागा आणि प्रस्तावित कामांचा आढावा
पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी घेतला. नागरिकांना चांगल्या मुलभूत सोयीसुविधा
उपलब्ध करुन देण्याबरोबरच, परभणी मनपा आणि जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिकांनी आपलं शहर स्वच्छ
आणि सुंदर करण्यावर भर द्यावा, अशी सूचना त्यांनी सर्व विभाग
प्रमुखांना यावेळी दिल्या.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं स्मार्ट सिटी कार्यालयात काल इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे
यांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा आणि महावितरण आढावा बैठक झाली. पाणी आणि वीज या मूलभूत
गरजा असून, नागरिकांना पुरेसं स्वच्छ पाणी आणि सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी
संबंधित पदाधिकाऱ्यांना सावे यांनी आवश्यक सूचना केल्या.
****
बीड शहराला
माजलगाव धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. तसंच पाणी
पुरवठ्यासंदर्भात वीज पुरवठ्याची तांत्रिक अडचणही निकाली काढण्यात आली आहे. त्यामुळे
आता बीड शहराला किमान सहा दिवसाआड पाणी मिळण्याची शक्यता आहे. आमदार संदीप क्षीरसागर
तसंच माजी आमदार सय्यद सलीम यांच्या पाठपुराव्यातून हे काम झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
बिहारमध्ये
सुरु असलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत आदिती हेगडे हिनं महाराष्ट्राच्या सुवर्णवेध
अभियानाला प्रारंभ केला. आदितीनं २०० मीटर फ्रीस्टाईल जलतरण प्रकारात राज्याला पहिलं
सुवर्णपदक मिळवून दिलं.
****
No comments:
Post a Comment