Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 May 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ मे २०२५ सायंकाळी ६.१०
****
• माणसाच्या प्रगतीत संगीत, कला, नृत्य यांना सुद्धा महत्त्व द्यावं लागेल - पंतप्रधानांचं प्रतिपादन, पहिल्या वेव्ह्ज परिषदेचं मुंबईत उद्घाटन
• महाराष्ट्र दिन सर्वत्र उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा, भारताच्या विकासात महाराष्ट्र सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचं, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
• सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर, नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय, तसंच पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाचा गौरव
आणि
• जातनिहाय जनगणनेची निश्चित कालमर्यादा जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी
****
माणसाची प्रगती केवळ माहिती, तंत्रज्ञान किंवा वेगाच्या जोरावर मोजता येणार नाही तर त्यासाठी संगीत, कला, नृत्य यांना सुद्धा महत्त्व द्यावं लागेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट - २०२५ अर्थात ‘वेव्ह्ज’ परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
क्रिएटिव्ह व्यक्ती त्यांच्यातली ऊर्जा आणि कार्यक्षमतेद्वारे सर्जनशीलतेच्या क्रांतीला नव्याने आकार देऊ शकतात, असा विश्वास व्यक्त करून, जागतिक पातळीवरील क्रिएटिव्ह लोकांनी भारताला सर्जनशीलतेचं केंद्र बनवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
भारताची ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे कंटेंट, क्रिएटिविटी आणि कल्चर हे तीन स्तंभ आहेत. भारताची क्रिएटिव्ह इकॉनॉमी काही वर्षांत सकल घरेलु उत्पन्नाचा वाटा असेल, भारताच्या अॅनिमेशन आणि ग्राफिक्स उद्योगासाठी व्हेव्ह्ज परिषदेमुळे यशाचं दार उघडलं जात असल्याचं पंतप्रधान म्हणाले,
बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी
परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मनोरंजन क्षेत्रातले मान्यवर यावेळी उपस्थित होते.
वेव्ह्ज परिषदेमुळे देशातल्या आशय निर्मात्यांना जगभरातल्या गुंतवणूकदारांशी संपर्क निर्माण करण्याची संधी मिळत असल्याचं, मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी - आय आय सी टी मुंबईत स्थापन होणार असून, त्यासाठी केंद्र सरकारने ४०० कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली.
सुमारे ५०० एकर क्षेत्रफळ असलेली मुंबईतली चित्रपट नगरी आता पुढील पिढीच्या स्टुडिओ इकोसिस्टमसाठी जागतिक केंद्र म्हणून विकसित केली जात असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. यातल्या १२० एकरमध्ये माध्यम आणि करमणूक शहर उभारण्यात येऊन यात अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि गेमिंगवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं ते म्हणाले.
वेव्ह्ज ही केवळ एक परिषद नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली एक चळवळ असल्याची प्रतिक्रिया अभिनेता शाहरुख यांनी दिली आहे.
****
महाराष्ट्र राज्याचा ६६वा स्थापना दिन आज सर्वत्र उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले.
मुंबईत दादर परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. राज्य स्थापना दिनानिमित्त तसंच आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त राज्यपालांनी जनतेला शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राला आधुनिक, बलशाली आणि प्रगत राज्य बनवण्यासाठी आपण सर्वांनी काम करूया, असं आवाहन त्यांनी केलं.
****
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत हुतात्मा चौक इथल्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारा महाराष्ट्र, निरंतर भारताच्या विकासामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचं, ते यावेळी म्हणाले.
****
मराठवाड्यात सर्वत्र महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा झाला.
छत्रपती संभाजीनगर इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झालं. महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. छत्रपती संभाजीनगरच्या विकासात, औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचं मोठं योगदान असल्याचं शिरसाट यावेळी म्हणाले.
बाईट - पालकमंत्री संजय शिरसाट
****
हिंगोली इथं संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. हिंगोली जिल्हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करत असून, जिल्ह्याची चौफेर प्रगती व्हावी यासाठी जागरुक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करु, असं झिरवाळ यावेळी म्हणाले,
बाईट - पालकमंत्री नरहरी झिरवाळ
****
धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. यानिमित्ताने पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील हुतात्मा स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस, शिक्षण, कृषी तसंच विविध नैपुण्य प्राप्त व्यक्ती, संस्थांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
****
परभणी इथं पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आपण कटीबद्ध असून, कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग, ऊर्जा या सर्व बाबींवर प्राधान्याने लक्ष देऊन जिल्ह्याचा विकास केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
****
बीड इथं राज्याचे उद्योग आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते, जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते, नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते, तर लातूर इथं पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते, तर परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरु इन्द्र मणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
****
सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. गेल्या शंभर दिवसात सर्व विभागांनी निश्चित केलेल्या ९०२ धोरणात्मक उद्दिष्टांपैकी ७०६ उद्दिष्टे साध्य केल्याची माहिती त्यांनी दिली. सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या राज्यातल्या शासकीय कार्यालयात सर्वोत्तम जिल्हाधिकारी या श्रेणीत नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयानं पाचवा क्रमांक पटकावला. तर, सर्वोत्कृष्ट पोलीस महानिरीक्षक गटात नांदेडचे पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने दुसरा क्रमांक मिळवला आहे.
****
केंद्र सरकारने घेतलेल्या जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचं काँग्रेस पक्ष स्वागत करतो, मात्र या जनगणनेची निश्चित कालमर्यादा सरकारने जाहीर करावी आणि आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केली. मुंबईत टिळक भवनात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या कार्यक्रमात ते आज बोलत होते.
****
आयुष प्रणाली आकर्षणाचं केंद्र बनत असून, त्यामुळे जन औषधी केंद्राच्या धर्तीवर आयुष औषध केंद्र सुरु करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहीती केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव दिली. पुणे जिल्ह्यातल्या लोणावळा इथल्या कैवल्यधाम योग संस्थेमध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय आयुष मिशन परिषदेचं उद्घाटन आज जाधव यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. आयुष औषध केंद्रे मंडळ, तहसील स्तरावर उघडण्यात येणार असून, यामुळे आयुर्वेदासह आयुषच्या सर्व यंत्रणांची सर्व औषधं एकाच ठिकाणी स्वस्त दरात उपलब्ध होतील, अशी माहीती जाधव यांनी दिली.
****
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ करू, या मोहिमेचा शुभारंभ आज पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झाला. ३० सप्टेंबर पर्यंत ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
****
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रँकीरेड्डी यांना २०२३ चे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार दोन्ही खेळाडूंच्या समर्पणाचं आणि अनन्यसाधारण कामगिरीचं प्रतीक आहे, असं मांडवीय यांनी आपल्या सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
पीक पावसाचा भाकित वर्तवणारी बुलडाणा जिलह्यातली प्रसिद्ध भेंडवळची घट मांडणी आज जाहीर करण्यात आली. यंदाच्या अंदाजात शेती पिकांचं साधारण उत्पादन होण्याचा मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं काही प्रमाणात नुकसान होण्याचा अंदाज या मांडणीत व्यक्त करण्यात आला असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हवामान
राज्यात आज सर्वात जास्त ४५ अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. धाराशिव इथं ४२, छत्रपती संभाजीनगर इथं ४२ पूर्णांक चार, तर परभणीत ४३ पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment