Thursday, 8 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.05.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 08 May 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ०८ मे २०२ सकाळी .०० वाजता.

****

उत्तर काशीमध्ये आज सकाळी भाविकांचं हेलीकॉप्टर कोसळून पायलटसह सहा जणांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. चारधाम यात्रेदरम्यान हे हेलिकॉप्टर गंगोत्रीहून यमुनोत्रीकडे जात असताना हा अपघात झाला. मृत भाविकांपैकी चार मुंबईचे तर दोन जण आंध्र प्रदेशातले असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. अपघाताच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून बचावकार्य सुरु आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

****

ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीदरम्यान, सरकार विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना या कारवाईची माहिती देईल. पक्षीय नेत्यांनी ऑपरेशन सिंदूरचं कौतुक केलं आहे आणि दहशतवादाविरुद्ध सशस्त्र दलांच्या कारवाईबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने केलेल्या कोणत्याही कारवाईला विरोधकांनी यापूर्वी पाठिंबा दर्शविला होता.

****

जम्मू काश्मीरमध्ये सीमावर्ती भागात पाकिस्तानी सैन्यानं काल पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. भारतीय सैन्यानं या हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर दिलं. कुपवाडा, बारामुला, उरी, अखनूर या भागात पाकिस्तानी सैन्याकडून गेल्या अनेक दिवसांपासून गोळीबार करण्यात येत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

भारताने आपला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार वापरुन ऑपरेशन सिंदूर राबवलं, ही कारवाई अतिशय विचारपूर्वक करण्यात आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत सीमा रस्ते संघटना - बीआरओ च्या ६६ व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. देशाच्या सशस्त्र दलांनी दहशतवाद्यांच्या छावण्या नष्ट करून योग्य उत्तर दिलं आहे. सध्याची भू-राजकीय परिस्थिती लक्षात घेता सशस्त्र दलांसाठी नवीन पिढीची पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज सिंह यांनी व्यक्त केली.

****

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. विरेंद्र कुमार आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. यांत्रिकीकृत स्वच्छतेसाठी राष्ट्रीय कृती योजना - नमस्ते योजनेच्या लाभार्त्यांना आयुष्यमान कार्ड आणि पीपीई किट वाटप त्यांच्या हस्ते होणार असून, ते लाभार्थ्यांशी संवाद देखील साधणार आहेत.

****

राज्यातल्या तूर उत्पादक शेतकरी आणि लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेता नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीची मुदत पंधरा दिवसांनी वाढवून मिळावी, अशी मागणी पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे केली आहे. तसा प्रस्ताव पणन विभागाच्या माध्यमातून केंद्राला पाठवण्यात आला आहे. राज्यात एक लाख ३७  हजार ४५८ शेतकऱ्यांची तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी झालेली असून, त्यापैकी ५२ हजार ९७१  शेतकऱ्यांकडून ७७  हजार ५३  मेट्रिक टन तूर खरेदी करण्यात आलेली आहे. तूर खरेदीची मुदत १३ मे रोजी संपत आहे.

****

खरीप हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, खते आणि कीटकनाशके योग्य दराने उपलब्ध व्हावीत, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी लातूर जिल्ह्यात कृषी निविष्ठा केंद्रांची नियमित तपासणी केली जात आहे. यासोबतच, शेतकऱ्यांच्या तक्रारींचं त्वरित निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर एक आणि तालुकास्तरावर दहा असे एकूण ११ तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. शेतकर्यांनी तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समितीच्या कृषी अधिकारी कार्यालयात या तक्रारी नोंदवण्याचं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर.टी.जाधव यांनी केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीजवळच्या परिसरात विनापरवानगी झाडं तोडल्याप्रकरणी महानगरपालिकेच्या उद्यान विभागानं बाजार समितीला चार लाख २५ हजार रुपयांचा दंड आकारला आहे. त्याचबरोबर १८५ नवीन रोपांची लागवड करण्याचे निर्देश देखील दिले आहेत. असं न केल्यास दंडाची रक्कम मालमत्ताकरात समाविष्ट करण्यात येईल आणि पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही या विभागानं बाजार समितीला दिला आहे.

****

शांघाय इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष संघानं उपांत्य फेरीत डेन्मार्कचा २३२-२३१ असा तर महिलांनी ग्रेट ब्रिटनचा २३२-२३० असा पराभव केला. अंतिम फेरीत भारतीय पुरुष संघाचा सामना परवा दहा तारखेला मेक्सिकोशी होणार आहे.

****

बिहारमध्ये सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र ४४ पदकांसह पहिल्या स्थानावर आहे. यामध्ये १६ सुवर्ण, १४ रौप्य आणि १४ कांस्य पदकांचा समावेश आहे. राजस्थान नऊ सुवर्णांसह १६ पदकं जिंकून दुसर्या स्थानावर, तर कर्नाटक आठ सुवर्णांसह २३ पदकं जिंकून तिसर्या स्थानावर आहे.

काल या स्पर्धेत नेमबाजीत महाराष्ट्राच्या वेदांत नितीन याने ५० मीटर थ्री पोजीशन्स राइफल प्रकारात, तिरंदाजीत उज्ज्वल ओळेकर आणि श्रावणी शेंडे यांनी सुवर्ण पदक पटकावलं तर वैष्णवी पवारनं रौप्य पदक जिंकलं.

****

No comments: