Saturday, 10 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 10.05.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 10 May 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      नागरी विमानांच्या आडून भारतात घुसखोरीचे पाकिस्तानचे प्रयत्न सुरक्षा यंत्रणेने उधळले

·      भारत पाकिस्तान तणावादरम्यान घटनाक्रमांची दृश्यं थेट प्रसारित करु नयेत-संरक्षण मंत्रालयाचे सर्व प्रसारमाध्यमांना निर्देश

·      उत्तर आणि मध्य भारतातले महत्त्वाचे ३२ विमानतळ पुढच्या आदेशापर्यंत तात्पुरते बंद

·      राज्यात जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश-शासकीय अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द

·      आयपीएल क्रिकेट स्पर्धेतले पुढचे सर्व सामने आठवडाभरासाठी स्थगित

आणि

·      खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत ६५ पदकं पटकावत महाराष्ट्र पहिल्या स्थानी कायम

****

पाकिस्ताननं नागरी विमानांचा ढालीसारखा वापर करत सुमारे ४०० ड्रोनच्या सहाय्यानं भारतात लडाख मधल्या लेहपासून गुजरातमध्ये कच्छ जवळ सरक्रीक खाडीपर्यंत ३६ ठिकाणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय सुरक्षा यंत्रणेनं तो हाणून पाडला. परराष्ट्र मंत्रालयानं काल नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या...

बाईट - कर्नल सोफिया कुरैशी

पाकिस्तानच्या या ड्रोनची फॉरेन्सिक चाचणी केली असता हे ड्रोन तुर्की बनावटीचे असल्याचं निदर्शनास आलं, असं विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितलं. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी यावेळी बोलतांना या हल्ल्याची माहिती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बैठकीत देणार असून, जे काही घडलं त्याला भारतानं जबाबदारी सांभाळत चोख उत्तर दिल्याचं सांगितलं..

बाईट - परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री

दरम्यान, पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतानं सडेतोड उत्तर दिल्याचं वृत्त आहे. यासंदर्भात संरक्षण दलाकडून आज सकाळी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाणार आहे.

****

दरम्यान, पाकिस्तानने काश्मीरमध्ये राजौरी, पूंछ आणि उरी इथे केलेल्या हल्ल्यात काल २ नागरिकांचा मृत्यू झाला तर काही घरं उध्वस्त झाली, उरी इथल्या संघर्षात सैन्यदलातला मुंबईतला २३ वर्षीय सैनिक मुरली श्रीराम नाईक यांना काल वीरमरण आलं.

****

भारत पाकिस्तान तणावादरम्यान सुरु असलेल्या घटनाक्रमांची दृश्य थेट प्रसारित करु नयेत, असे निर्देश संरक्षण मंत्रालयाने सर्व प्रसार माध्यमं, डिजीटल प्लॅटफॉर्म आणि सामाजिक माध्यमांना दिले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, त्यांचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश संरक्षण मंत्रालयानं दिले आहेत.

****

नियमित सैन्याच्या सहाय्यासाठी प्रादेशिक दलातले सैनिक आणि अधिकाऱ्यांना बोलावण्याचे अधिकार केंद्र सरकारने सैन्यप्रमुखांना दिले आहेत. प्रादेशिक सैन्याच्या ३२ पैकी १४ बटालियन संदर्भातली अधिसूचना संरक्षण मंत्रालयानं जारी केली. ९ फेब्रुवारी २०२८ पर्यंत हा आदेश लागू असेल.

****

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला नव्याने कर्ज देण्यासंदर्भात काल बैठक घेतली. भारताने या बैठकीनंतरच्या मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. या कर्जातून दहशतवाद पोसला जाण्याची शक्यता भारताने व्यक्त केली.

****

भारत-पाकिस्तानमधल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर आणि पश्चिम भारतातले महत्त्वाचे ३२ विमानतळ तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत. पुढील आदेशापर्यंत या विमानतळांवरून कोणतीही उड्डाणे होणार नाहीत. बंद करण्यात आलेल्या विमानतळांमध्ये श्रीनगर, चंदिगड, अमृतसर, जोधपूर, जम्मू, लेह, भुज, जैसलमेर, पठाणकोट आणि अन्य १५ विमानतळांचा समावेश आहे. दिल्ली विमानतळावरचीही १३८ उड्डाणं काल रद्द करण्यात होती, आज सर्व उड्डाणं नियमित सुरू आहेत.

****

देशातले एटीएम पुढील दोन - तीन दिवस बंद राहणार असल्याचं वृत्त निराधार आहे, असं पत्र सूचना कार्यालय-पीआयबीने स्पष्ट केलं आहे. सामाजिक संपर्क माध्यमांवरून याबाबतचे संदेश पसरवले जात आहेत, ते चुकीचे असल्याचं, पीआयबीने म्हटलं आहे. नागरिकांनी पडताळणी न केलेले मेसेज शेअर करू नये, असं आवाहन सरकारी यंत्रणांनी केलं आहे.

दरम्यान, देशभरात भरपूर इंधन साठा असून, त्याचा पुरवठा सुरळीतपणे सुरू असल्याचा खुलासा भारतीय तेल महामंडळानं केला आहे. इंधन आणि एलपीजी सगळीकडे उपल्बध असून, टंचाईच्या भीतीने गर्दी करुन खरेदी करण्याची गरज नाही, सर्वांना अखंड इंधन उपलब्ध होईल याची खात्री देत असल्याचं महामंडळानं म्हटलं आहे.

****

देशाच्या सीमाभागात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंन्टट्स ऑफ इंडिया या संस्थेने आपल्या काही परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. येत्या १४ मे पर्यंत नियोजित असलेल्या या परीक्षांचं नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असं संस्थेने एका पत्रकाद्वारे कळवलं आहे.

****

महाराष्ट्र सरकारने सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या, विशेषतः आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्याची सुरक्षा आणि इतर बाबींचा एका बैठकीत आढावा घेतला, त्यावेळी हे निर्देश दिले.

राज्याची आपत्कालीन प्रतिसाद क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विविध सूचना केल्या. जिल्हाधिकाऱ्यांना आपत्कालीन निधी तत्काळ मिळणार असून तातडीच्या साहित्याची खरेदी आवश्यकतेनुसार तत्काळ करुन घ्यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधे मॉक ड्रील करण्याचे तसंच जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. 

दरम्यान, या सूचनेनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही आरोग्य यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांना सुट्या रद्द करून कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. आपत्कालीन स्थितीमध्ये नागरिकांना तात्काळ आरोग्य सेवा-सुविधा देण्यासाठी जिल्हास्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आलेले असून, आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी दिली.

****

पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्यायचं काम भारत करत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. बीडच्या तारकेश्वर गड इथं संत नारायण बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त झालेल्या कार्यक्रमात शिंदे काल बोलत होते. पाकिस्तानच्या हल्ल्यात राज्यातील दोन सैनिकांना वीरमरण आल्याबद्दल शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं. केंद्राच्या मार्गदर्शक सूचने प्रमाणे राज्यात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी बैठक झाल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

****

जालना जिल्ह्यात काल रात्री आकाशात चमकणाऱ्या दिव्यांची रांग दिसून आली. मात्र ही एका आंतरराष्ट्रीय कंपनीने पाठवलेल्या स्टारलिंक उपग्रहाची रांग असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

भारत आणि पाकिस्तान दरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आयपीएलचे सामने आठवडाभरासाठी स्थगित केले आहेत. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधितांशी चर्चा करून स्पर्धेचं पुढचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल, असं बीसीसीआयनं याबाबतच्या पत्रकात स्पष्ट केलं आहे.

****

बिहारमध्ये सुरू असलेल्या सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत तब्बल ६५ पदकं पटकावत महाराष्ट्र पदकतालिकेत पहिल्या स्थानी आहे. यात २४ सुवर्ण, २१ रौप्य आणि २० कांस्यपदकांचा समावेश आहे. काल महाराष्ट्रानं तीन सुवर्ण आणि एका कांस्य पदकाची कमाई केली. मुलांच्या गटानं आत्तापर्यंत ७ सुवर्ण पदकांसह १७ पदकं जिंकली आहेत, तर मुलींच्या गटानं ९ सुवर्ण पदकांसह ३० पदकं पटकावली आहेत. मिश्र सामन्यात महाराष्ट्राच्या संघानं ३ सुवर्ण पदकं जिंकली आहेत.

****

अहिल्यानगर इथल्या एक हजार ३८० कोटी रुपयांच्या विविध रस्ते कामांचं काल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालं, राज्यातल्या पाच जिल्ह्यातून जाणाऱ्या सुरत ते चेन्नई या महामार्गाच्या बाजूला औद्योगिक क्लस्टर, लॉजिस्टिक पार्क उभे केल्यास पाचही जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी महानगरपालिकेच्या विविध लोकोपयोगी योजनांसाठी सोळाव्या वित्त आयोगाकडे एक हजार ८८० कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. वित्त आयोगाने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधी सोबत मुंबईत नुकतीच बैठक घेतली, या बैठकीत घोडेले यांनी नागरी विकास कामांसाठी हा प्रस्ताव सादर केला.

****

मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यात काल सस्ती अदालत उपक्रम राबवण्यात आला. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी ऑनलाइन वेबिनारद्वारे या उपक्रमात थेट संवाद साधला. शेतरस्ते, शीव रस्ते, पाणंद रस्ते याबाबत विभागीय आयुक्त गावडे यांच्यासमक्ष काही प्रकरणं परस्पर सहमतीने निकाली काढण्यात आली.

****

धाराशिव जिल्ह्यातील चार गावात सात टँकरने सध्या पाणीपुरवठा होत असून ४२ गावात ४२ विंधन विहिरी आणि ५९ खाजगी विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील १० प्रकल्प कोरडे पडले असून जिल्ह्यात एकूण ३५ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

****

लातूर शहरातील उत्तर परिसराचा वीजपुरवठा उद्या सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. वीजग्राहकांनी या वेळेची दखल घ्यावी असं आवाहन महावितरणनं केलं आहे.

****

हवामान

राज्यात काल सर्वाधिक ३९ अंश सेल्सिअस तापमान नागपूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ३२ पूर्णांक दोन, तर धाराशिव, परभणी आणि बीड इथं सुमारे ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

No comments: