Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 12 May 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ मे २०२५ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
नवी दिल्लीतल्या निवासस्थानी त्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक सुरु आहे. केंद्रीय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय
सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्कराचे प्रमुख संरक्षण अधिकारी
जनरल अनिल चौहान, सशस्त्र दलांचे प्रमुख आणि अन्य वरिष्ठ अधिकारी
या बैठकीत उपस्थित आहेत.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या
पार्श्वभुमीवर आज नवी दिल्लीत भारतीय लष्कराची दुपारी अडीच वाजता पत्रकार परिषद होणार
आहे. भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलाचे लष्करी कारवाई महासंचालक दर्जाचे अधिकारी ऑपरेशन
सिंदूरबद्दलची माहिती या पत्रकार परिषद देणार आहेत.
****
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या
पार्श्वभुमीवर देशातील ३२ विमानतळावरील थांबवण्यात आलेली विमानसेवा आता पुन्हा सुरु
करण्यात आली आहे. या विमानतळावरील विमान उड्डाणं १५ मेपर्यंत थांबवण्याचा निर्णय घेण्यात
आला होता, मात्र
आता ही सेवा सुरु झाली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
आज राष्ट्रीय शेअर बाजारात सेन्सेक्स
आणि निफ्टीची सुरुवात चांगली झाली. सेन्सेक्स एक हजार तीनशे एकोणपन्नास अंकांच्या वाढीसह
८० हजार आठशे तीन वर उघडला. निफ्टीमध्येही सहाशे शहाण्णव अंकांची वाढ होऊन २४ हजार
सातशे सात अंकावर पोहचला. सोने-चांदीच्या दरातही स्थैर्य पाहायला मिळत आहे. २२ कॅरेट
सोन्याचा दहा ग्रॅमसाठीचा दर ८८ हजार चारशे तेहतीस रुपये एवढा आहे. तर, एक किलो चांदीचा दर शहाण्णव हजार तीनशे
साठ रुपये आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड
तालुका आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात आज पोलिस आणि नक्षल्यांमध्ये चकमक
झाली. पोलिसांनी नक्षल्यांचे शिबिर उदध्वस्त करत त्यांच्याकडील बंदुका आणि अन्य साहित्य
ताब्यात घेतलं आहे. या चकमकीत काही नक्षली जखमी किंवा ठार झाल्याचा अंदाज पोलिसांनी
वर्तविला आहे.
कवंडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत भामरागड
दलमच्या नक्षल्याचे शिबिर असल्याची माहिती काल दुपारी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर
सी-६० पथकाच्या दोनशे जवानांनी शोध मोहीम राबविली. आज सकाळी पोलिसांवर नक्षल्यांनी
गोळीबार केला, त्यानंतर
पोलिसांनीही नक्षल्यांना जोरदार प्रत्युत्तर देत कारवाई केली.
****
बलुचिस्तानमधील ५१ हून अधिक ठिकाणी
७१ हल्ल्यांसह इतर मोठ्या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मी - बीएलए नं स्वीकारली
आहे. पाकिस्तान जागतिक दहशतवाद्यांचं उगमस्थान असून लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि आयसिस सारख्या घातक
दहशतवादी गटांच्या राज्य-पुरस्कृत विकासाचही केंद्र असल्याचं या गटानं म्हटलं आहे.
हिंसाचाराची सध्याची लाट ही या प्रदेशातील सर्वात प्रदीर्घ काळ चालणाऱ्या मुक्ती चळवळींपैकी
एक असल्याचंही या गटानं म्हटलं आहे.
****
उत्तराखंडमधील केदारनाथ मार्गावर
गौरीकुंड इथून घोडा आणि खेचर सेवा पुन्हा सुरू झाली आहे. घोड्यांना विषाणू जन्य आजाराची
लागण झाल्याच्या भीतीमुळे या सेवा तात्पुरत्या थांबवण्यात आल्या होत्या. तपासणीनंतर, डॉक्टरांनी केवळ एक हजार सातशे नऊ जनावरांना
सेवेसाठी योग्य असल्याचं घोषित केलं आहे.
****
आज जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात
येत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी, आरोग्य क्षेत्रात महत्वपूण भूमिका निभावणाऱ्या
देशभरातल्या परिचारिकांना शुभेच्छा देत परिचारिकांची शक्ती, कटीबद्धता
आणि करुणेला प्रणाम करत असल्याचं म्हटलं आहे. परिचारिकांच्या सेवा आणि समर्पणामुळे
देशाची अर्थव्यवस्था सक्षम बनत असल्याचंही त्यांनी आपल्या सामाजिक प्रसार माध्यमावरील
संदेशात म्हटलं आहे.
****
हवामान - मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज आणि उद्या तुरळक
ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. येत्या सात
दिवसांत मध्य भारतात कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यताही
वेधशाळेनं वर्तवली आहे.
****
विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून
निवृत्तीची घोषणा केली आहे, १४
वर्षांच्या आपल्या दैदीप्यमान कारकिर्दीत त्यानं १२३ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी
६८ कसोटी सामन्यांमध्ये त्यानं ४६ पुर्णांक ८५ च्या सरासरीनं ९ हजार २३० धावा केल्या
आहेत. कसोटी क्रिकेटनं आपली परीक्षा घेतली आणि खेळाला आकार दिला तसंच काही महत्वाचे
बारकावेही शिकवले असं कोहलीनं त्याच्या सोशल मीडियावर सामाईक केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं
आहे. २०११ च्या मध्यात वेस्ट इंडिज दौऱ्यात त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं
होतं.
****
No comments:
Post a Comment