Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 18 May 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ मे २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात भारताची भूमिका मांडण्यासाठी
केंद्र सरकार विविध देशांमध्ये प्रतिनिधी मंडळं पाठवणार, खासदार श्रीकांत
शिंदे आणि सुप्रिया सुळे यांचा समावेश
·
राज्यातल्या उद्योगधंद्यांना प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ
उपलब्ध करून देण्यासाठी विविध भागांमध्ये कौशल्यवर्धन केंद्रे उभारण्यात येतील - उपमुख्यमंत्री
अजित पवार यांची माहिती
·
आयपीएल क्रिकेट स्पर्धा पुन्हा सुरू, कालचा रॉयल
चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातला सामना पावसामुळे रद्द
·
बीड जिल्ह्यात एका तरुणास जमावाकडून मारहाण प्रकरणी सात
जण ताब्यात
आणि
·
मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस, वीज पडून
तीन जणांचा मृत्यू
****
ऑपरेशन
सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात भारताची भूमिका मांडण्यासाठी
केंद्र सरकार विविध देशांमध्ये बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळं पाठवणार आहे. या महिन्याच्या
अखेरीला सात सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांसह
प्रमुख भागीदार देशांना भेट देतील. भाजपचे रवी शंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, काँग्रेसचे
शशी थरूर, जदयूचे संजय कुमार झा, डीएमके
च्या कनिमोळी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या
सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे श्रीकांत शिंदे हे सात नेते आपापल्या प्रतिनिधिमंडळांचं
नेतृत्व करतील. ही सर्वपक्षीय प्रतिनिधिमंडळं दहशतवादाविरोधातला भारताचा शून्य सहिष्णुता
दृष्टिकोन जगासमोर मांडतील, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री
किरेन रिजिजू यांनी दिली.
भारत दहशतवादाविरुद्ध
संघर्ष करत असून, सहन न करण्याचं भारताचं धोरण असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी नमूद
केलं. ते म्हणाले,
बाईट
– श्रीकांत शिंदे
या प्रतिनिधीमंडळात
आपला समावेश केल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी सरकारचे आभार मानले. भारत दहशतवादाविरुद्ध
एकजुटीनं, मजबुतीनं आणि पूर्ण समर्पणाने लढा देईल, असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, नागपुरात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं. ते म्हणाले,
बाईट
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
भारतीय
सेनादलांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशात ठिकठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात
येत आहेत.
हिंगोली
इथं काल गांधी चौकातून काढलेल्या तिरंगा यात्रेत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार तानाजी
मुटकुळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नागरिक सहभागी झाले होते.
धाराशिव
जिल्ह्यात तुळजापूर इथंही काल तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेत तुळजापूरचे आमदार
राणाजगजीतसिंह पाटील यांच्यासह तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, भाजपचे जिल्हा
अध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी
झाले होते. सोलापूर इथल्या डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीचे संचालक महेंद्र कावरे यांनी
या तिरंगा यात्रेत सहभागी होत, भारतीय सैन्यदलांचं अभिनंदन केलं.
बाईट
– महेंद्र कावरे
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर
इथं आज तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे
शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी दिली.
****
भारतीय
अंतराळ संशोधन संस्था - इसरोने आज ईओएस - झिरो नाईन या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं प्रक्षेपण
केलं, मात्र ही मोहिम अयशस्वी झाल्याचं, इसरोचे
अध्यक्ष व्ही नारायणन यांनी सांगितलं. इसरोची ही एकशे एकावी मोहिम होती. आंध्र प्रदेशात
श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही - सी 61 या यानाद्वारे आज पहाटे हा उपग्रह अवकाशात झेपावला. या यानाची दुसऱ्या टप्प्यापर्यंत
कामगिरी सामान्य होती, अशी माहिती नारायणन यांनी दिली. इसरो या
मोहिमेचं विश्लेषण करेल, असंही त्यांनी सांगितलं.
****
केंद्रीय
कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आज नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते ‘विकसित
कृषी’ या विषयावरच्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील आणि नागपूर जिल्ह्याच्या
प्रमुख कृषी विषयक आणि ग्राम विकास योजनांचा आढावा घेतील. आपल्या दौऱ्यात ते ‘नॅशनल
सॉईल स्पेक्ट्रल लायब्ररीचं’ उदघाटन करतील. या कार्यक्रमात कृषी क्षेत्रासाठी नवोन्मेषी
योगदान देणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव केला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
****
भारतीय
रिझर्व्ह बँक लवकरच २० रुपये मूल्य असलेल्या नवीन नोटा चलनात आणणार आहे. गव्हर्नर संजय
मल्होत्रा यांची स्वाक्षरी या नोटांवर असेल, अशी माहिती बँकेनं काल जारी केलेल्या
प्रसिद्धीपत्रकात दिली. महात्मा गांधी मालिकेतल्या या नोटा आधीच्या नोटांसारख्याच आहेत
तसंच याआधीच्या नोटाही चलनात लागू राहणार असून त्यांच्या वापरावर कोणताही परिणाम होणार
नाही, असं बँकेनं स्पष्ट केलं आहे.
****
राज्यातल्या
उद्योगधंद्यांना प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी विविध भागांमध्ये
कौशल्यवर्धन केंद्रे उभारण्यात येतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं
आहे. पुणे महानगरपालिका आणि टाटा समूहाच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात बाणेर इथं उभारण्यात
येणाऱ्या कौशल्यवर्धन केंद्राच्या भूमिपूजन समारंभात ते काल बोलत होते. टाटा समूहाच्या
सहभागातून राज्यात चंद्रपूर, गडचिरोली इथं कौशल्यवर्धन केंद्राची
उभारणी करण्यात येत आहे. तसंच कल्याण डोंबिवली, रत्नागिरी,
पुणे, शिर्डी, बीड,
नांदेड, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीही काम सुरु
आहे. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने त्यांना सर्व प्रकारचं सहकार्य करण्यात येत असल्याचं,
पवार यांनी सांगितलं.
****
एका आठवड्याच्या
अवकाशानंतर काल पुन्हा आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू झाली. मात्र, रॉयल चॅलेंजर्स
बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातला बंगळुरू इथला नियोजित सामना काल पावसामुळे
रद्द झाला. आज या स्पर्धेत दुपारी साडेतीन वाजता राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज
सामना जयपुर इथं, तर संध्याकाळी साडेसात वाजता दिल्ली कॅपिटल्स
विरुद्ध् गुजरात टायटन्स सामना दिल्ली इथं होणार आहे.
****
बीड जिल्ह्यात
परळी तालुक्यातल्या जलालपूर इथं किरकोळ भांडणाच्या कारणावरुन एका तरुणास जमावाकडून
बेदम मारहाण झाली होती, याप्रकरणी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. काल पोलिसांनी
संशयितांचा शोध घेत सात जणांना ताब्यात घेतलं. या घटनेनंतर कोणत्याही अफवा पसरवू नये,
असं आवाहन पोलिस अधिक्षक नवनीत काँवत यांनी केलं, ते म्हणाले...
बाईट
– नवनीत काँवत, बीड जिल्हा पोलीस अधीक्षक
दरम्यान, या घटनेच्या
निषेधार्थ उद्या सोमवारी नागरिकांच्या वतीनं परळीत बंद पाळण्यात येणार आहे.
****
छत्रपती
संभाजीनगरच्या मंगलमूर्ती नागरी सहकारी पतसंस्थेत ६५ लाखांची आर्थिक फसवणूक झाल्याचा
प्रकार उघडकीस आला आहे. शंकर पंडित दुसाने यांच्या तक्रारीवरुन दोघांच्या विरोधात सिडको
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विशाल रामसिंग परदेशी आणि रत्नाकर सुधाकरराव
जोशी यांनी बनावट स्वाक्षऱ्या करून ५० लाख रुपयांची मुदत ठेव पतसंस्थेत ठेवून आर्थिक
फसवणूक केल्याचं या तक्रारीत नमूद आहे.
****
लातूर जिल्ह्याच्या
निलंगा तालुक्यात लातूर - हुमनाबाद महामार्गावर हलगरा शिवारात काल एक मोटरसायकल आणि
जीपची धडक होवून तीन जण ठार झाले. भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालणा-या जीपनं धडक
दिल्यानं मोटारसायकलवर जणा-या वृद्ध पती-पत्नीसह त्यांच्या प्रौढ मुलाचा जागीच मृत्यू
झाला.
****
मराठवाड्यात
अनेक ठिकाणी काल जोरदार पाऊस झाला. यामध्ये वीज पडून तीन जणांचा मृत्यू झाला.
हिंगोली
जिल्ह्यात सेनगाव तालुक्याच्या पार्डी पोहकर शिवारात काल दुपारच्या सुमारास अंगावर
वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. तसंच, गुगुळ पिंपरी शिवारातही सात शेळ्या दगावल्या.
जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी काल जोरदार पाऊस झाला.
परभणी जिल्ह्यात
जिंतूर तालुक्याच्या रोहिल पिंपरी शिवारातही अंगावर वीज पडून शेतात काम करणार्या युवकाचा
मृत्यू झाला.
नांदेड
जिल्ह्याच्या हिमायतनगर परिसरात एका वृद्धाचा अंगावर वीज कोसळून जागीच मृत्यू झाला.
जालना शहरासह
जिल्ह्यात काल हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला. नांदेड जिल्ह्यात २१ मे पर्यंत पावसाचा
येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यात येत्या
आठवडाभरात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे
वेधशाळेनं व्यक्त केली.
****
भारतीय
बौध्द महासभेच्या धाराशिव शाखेच्या वतीनं आज शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात
भव्य बौद्ध धम्म परिषद होत आहे. या परिषदेत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष
तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर हे मार्गदर्शन
करणार आहेत.
****
No comments:
Post a Comment