Monday, 19 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.05.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 19 May 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आज संसदीय स्थायी समितीला भारत आणि पाकिस्तानच्या संदर्भात सध्याच्या परराष्ट्र धोरणातील घडामोडींबद्दल माहिती देणार आहेत. परराष्ट्र सचिव ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामाच्या घोषणेबद्दल समितीला माहिती देण्याची अपेक्षा आहे. भारताच्या हिंदी महासागर धोरणासंदर्भात तसंच सागरी सुरक्षेबाबत परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या प्रतिनिधींकडे असलेली माहितीही ते समितीला देणार आहेत.

****

जम्मू आणि काश्मीरमध्ये आज राजौरी आणि पूंछ या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलांनी संयुक्त शोध मोहीम सुरू केली आहे. राजौरी जिल्ह्याच्या सीमावर्ती पट्ट्यात संशयास्पद हालचाली आढळल्याच्या वृत्तानंतर सुरक्षा दलांनी ही शोध मोहीम सुरू केली तसंच पूंछ जिल्ह्यातील वनपट्ट्यात आणखी एक शोध मोहीम सुरू आहे.

****

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी- आयएमएफनं आपल्या अर्थसहाय्य योजनेच्या पुढील टप्प्यासाठी पाकिस्तानवर अकरा नवीन अटी लादल्या आहेत. या नवीन अटींमुळे, आयएमएफ नं पाकिस्तानवर लादलेल्या अटींची एकूण संख्या ५० वर गेली आहे. पाकिस्तानच्या भारताबरोबरच्या तणावपूर्ण संबंधांमुळे योजनेच्या आर्थिक, परराष्ट्र आणि सुधारणा विषयक उद्दिष्टांना धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. नवीन अटींमध्ये १७ हजार ६०० अब्ज रुपयांच्या नवीन अर्थसंकल्पाला संसदीय मान्यता, वीज बिलांवर कर्ज सेवा अधिभारात वाढ आणि तीन वर्षांपेक्षा जास्त वापर झालेल्या जुन्या कारच्या आयातीवरचे निर्बंध उठवणं, यांचा समावेश आहे.

****

श्रीक्षेत्र परळी वैद्यनाथ ज्योर्तिलिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचं उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज सांगितलं. या कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही मात्र कामं दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. उपमुख्यमंत्री पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. पावर यांनी श्रीक्षेत्र परळी वैद्यनाथ ज्योर्तिंलिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार विक्रम काळे, याच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. श्री क्षेत्र परळी इथल्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात २८६ कोटी ६८ लाख रूपयांच्या ९२ विकास कामांना मान्यता दिल्याचं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी यावेळी सांगितलं.

****

मुंबईतील कर्जत नेरळ रोडवरील पाली भुतिवली धरणात दोन तरुण पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. काल संध्याकाळी कर्जतमधील पाली भुतिवली इथं सिंचन प्रकल्प पाहण्यासाठी हे तरुण गेले होते. पाण्याच्या खोलीची माहिती नसल्याने दोघेही आंघोळ करताना बुडाले. स्थानिकांच्या मदतीने नेरुळ पोलिसांनी त्यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले.

****

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींना, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीनं दरवर्षी देण्यात येणाऱ्या परदेशातील शिक्षणाच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यासाठीची मुदत सहा जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही मुदत १७ मे रोजी संपली होती. संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असं आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक शिवानंद मिनगिरे यांनी केलं आहे.

****

दरम्यान, बीड जिल्ह्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा, असं आवाहन इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचे सहाय्यक संचालक डी.बी. क्षीरसागर यांनी केलं आहे.

****

लातूर जिल्ह्यात २३ आणि २४ मे रोजी जिल्हास्तरीय आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क मैदानावर होणाऱ्या या महोत्सवात केशर, बदाम, हापूस, पायरी, लंगडा, तोतापुरी यासारख्या दर्जेदार आंब्यांची विक्री केली जाणार आहे. या महोत्सवात नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. टी. जाधव यांनी केलं आहे.

****

लातूर जिल्ह्यात काल विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातील इंदरठाणा इथं वीज पडून एका या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर समसापूर गावातील शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे पावसाचं पाणी घरात शिरल्यानं संसार उपयोगी साहित्यांचं नुकसान झालं आहे.

****

दरम्यान, राज्यात आजपासून २५ मे पर्यंत जोरदार पावसाचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या २१ तारखेपर्यंत सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ- बीसीसीआयनं आशियाई क्रिकेट परिषदेच्या दोन प्रमुख स्पर्धांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुढील महिन्यात श्रीलंकेत होणारी महिला इमर्जिंग टीम आशिया कप आणि यंदाच्या सप्टेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या पुरुषांच्या आशिया कप स्पर्धांचा यात समावेश आहे.

****

No comments: