Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 21 May 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ मे २०२५ सायंकाळी ६.१०
****
· पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या देशातल्या १०३ अमृत भारत स्थानकांचं
उद्घाटन,
राज्यातल्या १५ स्थानकांचा समावेश
· यंदाच्या खरीप हंगामात चांगलं उत्पादन होण्याची अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त
· छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत २७ नक्षलवादी
ठार
· ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात
अंत्यसंस्कार
आणि
· छत्रपती संभाजीनगर शहरातली ड्रेनेज स्वच्छता अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी
रोबोटिक यंत्रणा कार्यान्वित
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या बिकानेर इथून १८ राज्यांमधल्या
१०३ अमृत भारत स्थानकांचं उद्घाटन करणार आहेत. या रेल्वेस्थानकांवर अद्ययावत प्रतीक्षालय, शौचालय आणि निवाऱ्याचा समावेश आहे. याशिवाय विविध सुविधा या रेल्वे स्थानकांवर
देण्यात आल्या आहेत. यामध्ये राज्यातल्या आमगाव, चांदा
फोर्ट,
चिंचपोकळी, देवळाली, धुळे,
केडगाव, लासलगाव, लोणंद जंक्शन, माटुंगा, मुर्तिजापूर, इतवारी,
परेल, सावदा, शहाड,
वडाळा रोड स्थानकांचा समावेश आहे.
उद्या, २२ मे हा भारताच्या रेल्वे पायाभूत
सुविधांसाठी एक महत्त्वाचा दिवस असल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात
म्हटलं आहे. अमृत स्थानके आराम, कनेक्टिव्हिटी वाढवतील आणि आपली
गौरवशाली संस्कृती साजरी करतील, असं त्यांनी नमूद केलं.
दरम्यान, रेल्वे स्थानकांच्या या आधुनिकीकरणाबाबत
धुळे इथल्या प्रवाशांनी आनंद व्यक्त केला.
****
यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा
अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला असून, त्यामुळे खरीप हंगामात
चांगलं उत्पादन होण्याची अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईत आज पार पडलेल्या खरीप हंगामाच्या तयारीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत
होते. राज्यात बियाणं आणि खतांचा पुरेसा साठा असून, कोणत्याही
प्रकारचा तुटवडा जाणवू दिला जाणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले –
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बोगस बियाण्यांवर आळा घालण्यासाठी राज्य सरकारनं पहिल्यांदाच
‘साथी’ पोर्टलवर
बियाणांची नोंदणी सक्तीची केली असून, आतापर्यंत ७० हजार ट्रूथफुल
बियाणं नोंदवली गेली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यंदाच्या खरीप हंगामात २०४
मेट्रिक टन अन्नधान्य उत्पादनाचं लक्ष्य ठेवण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
****
छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातल्या अबुजमाड भागात सुरक्षादलांशी
५० तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या चकमकीत २७ नक्षलवादी ठार झाले. यामध्ये कुख्यात
नक्षलवादी बसवा राजू याचा समावेश आहे. यात एक सैनिक हुतात्मा झाल्याची तर आणखी एक सैनिक
जखमी झाल्याची माहिती छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी दिली. ही कारवाई संपली
असून,
या भागात मोठी शोधमोहीम सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. या
परिसरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं जप्त करण्यात आली.
दरम्यान, नक्षलविरोधी या अभियानाबद्दल
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा दल आणि पोलिसांची प्रशंसा केली आहे. ऑपरेशन
ब्लॅक फॉरेस्ट अंतर्गत छत्तीसगढ, तेलंगणा आणि महाराष्ट्रात आतापर्यंत
५४ नक्षलींना पकडण्यात आलं, तर ८४ जणांनी आत्मसमर्पण केल्याचं शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात सांगितलं.
मार्च २०२६ पूर्वी नक्षलवाद पूर्णपणे संपवण्याचं मोदी सरकारचं उद्दीष्ट असल्याचं ते
म्हणाले.
****
कन्नड लेखिका, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या
बानू मुश्ताक यांनी लिहिलेल्या आणि दीपा भस्थी यांनी इंग्लिशमध्ये भाषांतरित केलेल्या
‘हार्ट लॅम्प’ या लघुकथासंग्रहाला प्रतिष्ठेचा बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारावर
नाव कोरणारा हा पहिलाच लघुकथासंग्रह आणि पहिलीच मूळ कन्नड साहित्यकृती आहे. तसंच दीपा
भस्थी या बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्याच भारतीय भाषांतरकार आहेत. दक्षिण भारतातल्या
पुरुषसत्ताक व्यवस्थेचा सामना करणाऱ्या महिला आणि मुलींची व्यथा मांडणाऱ्या १२ कथा
या संग्रहात आहेत.
****
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवावर
आज पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आज सकाळी
त्यांचं पार्थिव आयुका इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस,
उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ
शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासह इतर मान्यवरांनी डॉ. नारळीकर यांचं अंत्यदर्शन
घेतलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २५ तारखेला आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा १२२
वा भाग असेल. नागरीकांना या कार्यक्रमासाठी आपल्या सूचना आणि विचार १८०० ११ ७८०० या
नि:शुल्क क्रमांकावर २३ मे पर्यंत पाठवता येतील.
****
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी आज दहशतवाद विरोधी
दिन म्हणून पाळण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतल्या
वीरभूमी इथं राजीव गांधी यांना अभिवादन केलं.
****
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवनातल्या अधिकारी आणि
कर्मचाऱ्यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा
दिली. अहिंसा आणि सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा
तसंच हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
राज्याचे क्रीडा, युवक कल्याण आणि अल्पसंख्याक
मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांना
दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिनाची शपथ दिली.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं राजीव गांधी यांना
अभिवादन करण्यात आलं. नेहरू बाल उद्यानातल्या राजीव गांधी यांच्या पुतळ्याला उपायुक्त
लखीचंद चव्हाण आणि वैद्यकीय अधिकारी डॉ.पारस मंडलेचा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण
करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिनानिमित्त उपस्थितांना
शपथ देण्यात आली.
****
दरम्यान, शहरात आज जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे
“तिरंगा यात्रा” काढण्यात आली. यावेळी राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आलं. माजी मंत्री अनिल
पटेल,
शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांच्यासह मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे
पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातली ड्रेनेज स्वच्छता अधिक प्रभावी आणि
सुरक्षित करण्यासाठी महानगरपालिकेने रोबोटिक यंत्रणा कार्यान्वित केली आहे. आयुक्त
तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरु
करण्यात आला. या अत्याधुनिक रोबोटिक यंत्राच्या सहाय्याने ड्रेनेज साफ करण्याचं काम
आता अधिक वेगाने आणि काटेकोरपणे होणार आहे. यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना थेट नाल्यात
उतरावं लागणार नसल्यानं, त्यांच्या सुरक्षिततेचा मोठा
प्रश्न मिटणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं पर्यावरण स्वच्छतेच्या अनुषंगाने
विविध उपक्रम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात गावपातळीवर
स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण अंतर्गत विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची
माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी दिली.
या अंतर्गत उद्या २२ मे ते पाच जून या कालावधीत प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन मोहीम राबवण्यात
येणार आहे. प्लास्टिक संकलन, एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर
कमी करणं तसंच कचऱ्याचं वर्गीकरण याविषयी जनजागृती केली जाणार आहे.
****
आमदार छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे छत्रपती
संभाजीनगर शहरात आज समता परिषदेच्या वतीनं जल्लोष करण्यात आला. शहरातल्या क्रांती चौक
परिसरात पेढे वाटून तसंच फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी
राष्ट्रवादी काँग्रेस तसंच समता परिषदेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
****
लातूर जिल्ह्यात आज सलग चौथ्या दिवशी अवकाळी पाऊस होत आहे. या
पावसामुळे रेणापूर तालुक्यात कोरडी पडलेली रेणा नदी प्रवाहित झाली आहे. जिल्ह्यातल्या
शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं, सरकारने नुकसान भरपाई देऊन या
अवकाळीच्या संकटातून बाहेर काढण्याची मागणी शेतकरी करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
धाराशिव जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात आज दुपारी मेघगर्जनेसह
विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. तुळजापूर तसंच धाराशिव परिसरात सकाळपासूनच ढगाळ
वातावरण होतं.
****
कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं राज्यभरात
पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आज छत्रपती संभाजीनगर, बीड,
धाराशिव जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर जालना, परभणी,
हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला
आहे.
****
No comments:
Post a Comment