Wednesday, 21 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.05.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 21 May 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर, गृहनिर्माण क्षेत्रात सत्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येण्याची अपेक्षा 

·      राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश

·      दहशतवादाविरोधात भारताची भूमिका मांडण्यासाठी श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ चार देशांच्या दौऱ्यासाठी आज रवाना होणार

·      ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर एम. आर. श्रीनिवासन यांचं निधन

आणि

·      कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा, मराठवाड्यात आज आणि उद्या जोरदार पावसाचा अंदाज

****

राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात आलं आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. 'माझं घर-माझा अधिकार' हे या धोरणाचं ब्रीदवाक्य आहे. या धोरणातून झोपडपट्टी पुनर्वसन ते पुनर्विकास, असा सर्वांगीण कार्यक्रम राबवला जाणार आहे. अल्प उत्पन्नधारक, ज्येष्ठ नागरिक, महिला, औद्योगिक कामगार आणि विद्यार्थी यांच्या विशिष्ट गरजांचा या धोरणात प्राधान्यानं विचार केला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. राज्य शासनानं २०३० पर्यंत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी ३५ लाख घरं उभारण्याचं उद्दिष्ट ठेवलं असून, सर्वसामान्यांच्या गरजा लक्षात घेऊन प्रत्येक घटकासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. या धोरणातून गृहनिर्माण क्षेत्रात सत्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येण्याची अपेक्षा आहे. या धोरणाअंतर्गत सर्व प्रकारच्या योजना महाआवासच्या पोर्टलवर आणण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बायोमिथेनेशन तंत्रज्ञानाचा वापर करून कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी महानगर गॅस लिमिटेड या कंपनीला मुंबईतल्या देवनार इथला भूखंड सवलतीच्या दरात भाडेपट्ट्यानं उपलब्ध करून देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

उद्योग विभागातला धोरण कालावधी संपुष्टात आल्यामुळे प्रलंबित असलेल्या ३२५ प्रस्तावांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे एक लाख ६५५ कोटी रूपयांची गुंतवणूक आणि ९३ हजार ३१७ रोजगार निर्मिती होणं अपेक्षित आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांचा काल राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी भुजबळ यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यावेळी उपस्थित होते.

****

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आणि विज्ञान साहित्यिक जयंत नारळीकर यांचं काल पुण्यात निधन झालं, ते शहाऐंशी वर्षांचे होते. नारळीकर यांचं खगोल भौतिकी शास्त्रातलं कार्य जगभरात नावाजलं गेलेलं आहे. त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा संक्षिप्त वृत्तांत,

जयंत नारळीकर यांनी ब्रिटनमधल्या केंब्रिज इथून डॉक्टरेट आणि रँग्लर या प्रतिष्ठित पदव्या घेतल्यानंतर, १९७२ मध्ये मुंबईत टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्र विभाग प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली. १९८८ साली त्यांची पुण्यातल्या इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी अँड ऍस्ट्रोफिजीक्स, आयुका या संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. नारळीकर यांना खगोलशास्त्रातल्या कार्यासाठी टायसन मेडल तसंच स्मिथ पुरस्कार असे जागतिक पातळीवरचे सन्मान मिळाले आहेत. डॉक्टर नारळीकर यांनी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ सर फ्रेड हॉएल यांच्यासमवेत 'कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी' मांडून जगभरातील शास्त्रज्ञांचं लक्ष वेधून घेतलं. खगोल क्षेत्रातील बहुमूल्य योगदानासाठी त्यांना 'पद्मभूषण' आणि पद्मविभूषण' हे सर्वोच्च सन्मान मिळाले आहेत.  नारळीकर यांनी ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. विज्ञान प्रसारासाठी डॉक्टर नारळीकर यांनी अनेक माध्यमांचा वापर केला, त्यात त्यांच्या विज्ञान विषयक लिखाणाचा मोठा भाग आहे. चार नगरांतले माझे विश्व, या त्यांच्या आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा तर, 'यक्षाची देणगी' या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला असून, याशिवाय देशविदेशातल्या अन्य अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉक्टर नारळीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोक संदेशात, खगोल भौतिकीतलं नारळीकर यांचं महत्वाचं सैध्दांतिक काम येत्या पिढ्यांसाठी मूल्यवान असल्याचं म्हटलं आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही नारळीकर यांना श्रद्धांजली वाहिली.

****

भारताच्या नागरी अणुऊर्जा कार्यक्रमाचे एक आधारस्तंभ आणि भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर एम. आर. श्रीनिवासन यांचं काल तामीळनाडूत निधन झालं, ते पंचाण्णव वर्षांचे होते. डॉक्टर श्रीनिवासन यांना भारताच्या नागरी अणुऊर्जा कार्यक्रमाचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं. भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा च्या निर्मितीत डॉक्टर होमी भाभा यांच्यासोबत श्रीनिवासन यांचा सहभाग होता. श्रीनिवासन यांच्या अणुऊर्जा क्षेत्रातल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

****

पाकिस्तानप्रणीत दहशतवादाच्या विरोधातली भारताची भूमिका जगभरातल्या देशांसमोर मांडण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या शिष्टमंडळांपैकी पहिलं शिष्टमंडळ आज दौऱ्यावर निघणार आहे. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे मंडळ संयुक्त अरब अमिरात, लायबेरिया, कॉंगो आणि सिएरा लेओन इथं जाणार आहे.

****

ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ लातूर जिल्ह्यात काल शिवसेनेतर्फे तिरंगा रॅली काढण्यात आली. औसा शहर आणि निलंगा तालुक्यातल्या गुऱ्हाळ या गावात काढण्यात आलेल्या या रॅलीत नागरीक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

****

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांना अभिवादन करण्यासाठी काँग्रेसतर्फे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेची सुरुवात सकाळी साडेनऊ वाजता शहागंज इथल्या महात्मा गांधी पुतळ्यापासून होणार असल्याची माहिती शहर काँग्रेस कमिटीकडून देण्यात आली.

****

ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय सैन्यांचं शौर्य आणि सरकारचा धाडसी निर्णय याबाबत आपल्याला अभिमान आहे, असं धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथले माजी सैनिक दत्ता नवगिरे यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले -

बाईट - माजी सैनिक दत्ता नवगिरे

****

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी काल नांदेड विमानतळ परिसराची पाहणी करुन औद्योगिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. नांदेड इथलं विमानतळ लवकरच महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्यात येणार आहे. विमानतळावरील विविध सुविधांबाबत औद्योगिक विकास महामंडळाने येत्या तीन महिन्यात सुधारणा करावी, विमानतळावरील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, आदी सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

****

राज्यात विरोधी पक्षच अस्तित्वात नसून, वंचित बहुजन आघाडी पक्ष सोडला तर सर्वच पक्ष हे सत्ताधारी पक्षांसोबत असल्याची टीका या पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. ते काल लातूर इथं पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. ऑपरेशन सिंदूर बद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोदी सरकारचं कौतुक केल्याबद्दल, आंबेडकर यांनी, शरद पवार हे भाजपमय होत असल्याची टीका केली.

****

हवामान खात्यानं पावसाबाबत वर्तवलेल्या अंदाजानुसार प्रत्येक विभागानं मान्सून कालावधीत आपली यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिले आहेत. मान्सूनपूर्व तयारीबाबतच्या विभागस्तरीय आढावा बैठकीत ते काल बोलत होते. आपत्तीच्या काळात नागरिकांना वेळेत मदत पोचवण्याच्या दृष्टीनंही नियोजन करण्याच्या सूचना गावडे यांनी दिल्या.

****

राज्यात काल अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मुंबई आणि पुण्यात काल संध्याकाळी मुसळधार पाऊस पडला. छत्रपती संभाजीनगर शहरात मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी विजेचे खांबही वाकल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

दरम्यान, कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं राज्यभरात पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आज छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट तर जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

No comments: