Thursday, 22 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.05.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 22 May 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ मे २०२ सकाळी .०० वाजता.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानमध्ये बिकानेर दौऱ्यावर पोहचले आहेत. थोड्याच वेळात पंतप्रधानांच्या हस्ते बिकानेर इथून १८ राज्यांमधल्या १०३ अमृत भारत स्थानकांचं उद्घाटन करण्यात येणार आहे. या रेल्वे स्थानकांवर अद्ययावत प्रतीक्षालय, शौचालय आणि निवाऱ्याचा समावेश आहे. याशिवाय विविध सुविधा या रेल्वे स्थानकांवर देण्यात आल्या आहेत. अमृत भारत रेल्वे स्थानकाच्या या टप्प्यात राज्यातल्या आमगाव, चांदा फोर्ट, चिंचपोकळी, देवळाली, धुळे, केडगाव, लासलगाव, लोणंद जंक्शन, माटुंगा, मुर्तिजापूर, इतवारी, परेल, सावदा, शहाड, वडाळा रोड स्थानकांचा समावेश आहे.

****

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, सात सर्वपक्षीय प्रतिनिधिमंडळं वेगवेगळ्या देशांना भेटी देणार आहेत. आज ​​खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ जपानला पोहोचलं आहे. याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे, खासदार बैजयंत पांडा, खासदार रविशंकर प्रसाद, खासदार शशी थरूर, खासदार कनिमोळी करुणानिधी, आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली सहा शिष्टमंडळ विविध देशांना भेटी देण्यासाठी रवाना झाले. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ संयुक्त अरब अमिरात इथं पोहोचलं आहे.

****

जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात सिंगपोरा चतरू इथं आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या भागातील जंगल परिसरात सैन्याकडून शोध मोहीम सुरू आहे. या परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे, त्यानुसार ही कारवाई सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात गावपातळीवर स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण अंतर्गत विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी दिली. याअंतर्गत आजपासून पाच जून पर्यंत प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन मोहीम राबवण्यात येणार आहे. प्लास्टिक संकलन, एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर कमी करणं तसंच कचऱ्याचं वर्गीकरण याविषयी जनजागृती केली जाणार आहे.

****

संवाद मराठवाड्याशी या उपक्रमाअंतर्गत विभागीय आयुक्त दिलीप गावडे आज नागरीकांशी वेबिनारद्वारे संवाद साधणार आहेत. दुपारी चार वाजता होणार्या या वेबिनारमध्ये नागरीक, नगर विकास विभागाशी सबंधित योजना, प्रश्न, असलेल्या अडचणी, योजनेच्या अंमलबजावणीचे धोरण याबाबत संवाद साधू शकतील. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त धाराशिव जिल्ह्यात चोराखळी इथल्या श्री पापनाश मंदिर परिसरात भाजपच्या वतीनं काल स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या उपक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. या अभियानाच्या माध्यमातून संस्कार, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २५ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा १२२ वा भाग असेल. नागरीकांना या कार्यक्रमासाठी आपल्या सूचना आणि विचार १८०० ११ ७८०० या नि:शुल्क क्रमांकावर २३ मे पर्यंत पाठवता येतील.

****

गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे २३ जिल्ह्यांमधील २३ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. लातूर जिल्ह्यात सलग चार दिवस मुसळधार पावसामुळं ज्वारी आणि बाजरीच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. निलंगा तालुक्यातल्या माकणी थोर इथल्या शेतकऱ्याचे काढणीला आलेले टरबुज फेकून देण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र, केरळ, गोवा, आणि कर्नाटक किनारपट्टीवर जोरदार पाऊस सुरु असून, पुढचे पाच ते सहा दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.

****

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त मराठा लाईट इन्फंन्ट्री चौथ्या बटालियनचे लेफ्टनंट कर्नल अनिल अर्स यांना शौर्य पुरस्कार आणि मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक मिलिंद अत्रे यांना विज्ञान पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. सावरकर विचार प्रसारक डॉ. विजय जोग यांना स्मृतिचिन्ह पुरस्कार आणि सावरकर विचार प्रसारक वैद्य चिंतामण साठे यांना स्मृतिचिन्ह पुरस्कार देण्यात येणार आहे.

****

राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स २०२३-२४ स्पर्धेत धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातल्या रोहिणी ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार जाहीर झाला आहे. दहा लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. विशाखापट्टणम इथं नऊ जूनला होणाऱ्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेत या पुरस्काराचं वितरण होणार आहे.

****

मलेशियाची राजधानी क्वालालंपूर इथं आज होणाऱ्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत उप उपांत्य फेरीत आज पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांत, एच.एस. प्रणॉय, सतीश करुणाकरन आणि आयुष यांच्यात सामना होणार आहे. तर महिला दुहेरीत, प्रेरणा अल्वेकर आणि मृण्मयी देशपांडे यांचा सामना तैवानच्या जोडीशी होणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.12.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 25 December 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छ...