Friday, 23 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.05.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 May 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ मे २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

·      १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात महसूली विभागांचे निकाल जाहीर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कार्यालयांना चार पुरस्कार

·      राज्यातले पारंपरिक अरुंद शेतरस्ते १२ फूट करण्याचा निर्णय

·      गडचिरोली जिल्ह्यात पोलिस चकमकीत चार नक्षलवादी ठार

आणि

·      राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम, नांदेड तसंच लातूर जिल्ह्याला उद्या ऑरेंज अलर्ट

****

राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते आज कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलीस योग्य ती कारवाई करतील, असंही त्यांनी आश्वस्त केलं.

इचलकरंजी इथं ७१३ कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचं उद्घाटन, शुभारंभ आणि लोकार्पणासह शहापूर पोलीस ठाण्याच्या कोनशिलेचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. शहरांच्या विकासाच्या योजनांसाठी राज्य शासन कटिबद्ध असून, लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सर्व प्रस्तावांना न्याय देण्याचं धोरण असल्याचं, त्यांनी यावेळी सांगितलं.

****

सांगली इथं जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालर्याचं उद्घाटनही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. राज्यात गेल्या दहा वर्षात सातत्याने पोलीस गृह निर्माणाचं काम केल्याचं ते यावेळी म्हणाले

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

सांगली इथली नवीन प्रशासकीय इमारत आणि विविध पोलिस उपक्रमांचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं.

****

१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात महसूली विभागांमधल्या ४० विभागस्तरीय कार्यालयांच्या आणि सर्व जिल्ह्यांमधल्या ४२ जिल्हास्तरीय कार्यालयांच्या स्पर्धेचा निकाल मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज जाहीर केला. माहिती उपसंचालक कार्यालय आणि प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कार्यालय श्रेणीत छत्रपती संभाजीनगर कार्यालयानं प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर, वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण विभागात छत्रपती संभाजीनगरला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. याशिवाय अप्पर राज्यकर आयुक्त, राज्य वस्तू आणि सेवा कर कार्यालय तसंच विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय वर्गवारीत छत्रपती संभाजीनगरचा द्वितीय क्रमांक आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयात लातूर कार्यालयाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे.

****

राज्याच्या आणि देशाच्या विकासात सहकार क्षेत्राचा मोठा वाटा असून, सहकार चळवळ टिकण्यासाठी आणि वाढण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचं आश्वासन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल इथं विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात ते आज बोलत होते. राज्यातल्या शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योगांसाठी दरवर्षी अनुदान देण्यात येत असून, शेतकऱ्यांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरु राहील, असा पुनरुच्चारही पवार यांनी केला.

****

राज्याचा आधुनिक शेती आणि वाढत्या यांत्रिकीकारणाचा वेग लक्षात घेऊन महसूल विभागानं पारंपरिक अरुंद शेतरस्ते १२ फूट करण्याचा निर्णय घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. कृषी अवजारांची ये-जा सुलभ व्हावी, तसंच शेतीमाल योग्य वेळेत बाजारपेठेत पोहचावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. ते म्हणाले

बाईट - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

****

गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुका आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत आज चार जहाल नक्षलवादी ठार झाले. हे नक्षलवादी उपकमांडर दर्जाचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. आज सकाळी नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला, त्यानंतर पोलिसांनीही जोरदार प्रत्यूत्तर दिलं. जवळपास दोन तास झालेल्या चकमकीनंतर घटनास्थळावर चार नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. यावेळी पोलिसांनी एक स्वयंचलित रायफल, एक ३०३ रायफल, वॉकीटॉकी आणि अन्य साहित्य जप्त केलं.

****

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. २१ मे रोजी सुरु झालेलं हे अभियान ३१ तारखेपर्यंत चालणार आहे. अहिल्यादेवींनी तीनशे वर्षांपूर्वी दिलेलं योगदान, जनहितार्थ केलेली कामं या अभियानातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न भाजप करणार असल्याची माहिती, प्रदेश सरचिटणीस आणि या अभियानाचे संयोजक विजय चौधरी यांनी दिली.

दरम्यान, जालना शहरात अंबड चौफुली परिसरात उभारण्यात येत असलेल्या पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाची आज वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी पाहणी केली. या स्मारकामुळे जालना शहर पर्यटन आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखलं जाईल, या स्मारकासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

****

ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनात धाराशिव शहरात आज तिरंगा रॅली काढण्यात आली. नागरिक, महिला, विद्यार्थी आणि माजी सैनिक या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. काळा मारुती चौकात मारुतीच्या आरतीने ही रॅली सुरु झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रगीताने या रॅलीची सांगता झाली. यावेळी सहभागी झालेले भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी म्हणाले

बाईट - दत्ता कुलकर्णी

 

परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातही आज अधिकारी कर्मचाऱ्यांनी तिरंगा रॅली काढून भारतीय संरक्षण दलांचं अभिनंदन केलं.

****

नाशिक इथल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या ४३ व्या लढाऊ वैमानिकांच्या तुकडीसह एव्हिएशन प्रशिक्षकांच्या ४२ व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा आज पार पडला. या वैमानिक, प्रशिक्षकांच्या तुकडीने दिमाखदार संचलन करत वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना मानवंदना दिली. आर्मी एव्हिएशन कॉर्प्सचे डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट सेना मेडल लेफ्टनंट जनरल विनोद नांबियार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

****

नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यात अनधिकृत खत विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौजे शिवनी इथं एक व्यक्ती विनापरवाना गावोगावी जाऊन सेंद्रिय आणि इतर खते विक्री करत असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानंतर कृषी विभागाच्या भरारी पथकाने सापळा रचून सदर व्यक्तीस अटक केली. या कारवाईत एकूण १४ लाख ६४ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

****

बीड जिल्ह्यातल्या लिंबागणेश इथं असलेल्या पवनचक्की परिसरात चोरी करण्यास आलेल्या चोरट्यांवर सुरक्षा रक्षकाने केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाला. २० पेक्षा अधिक जण रात्रीच्या वेळी आले होते, सुरवातीला या चोरट्यांनी मारण्यास सुरूवात केल्यानंतर सुरक्षा रक्षकाला स्व-रक्षणासाठी गोळीबार करावा लागला, असं प्राथमिक चौकशीत स्पष्ट झालं आहे.

****

 

 

जर्मनीमध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी कनिष्ठ गट विश्वचषक स्पर्धेत भारताच्या रायझा ढिल्लननं रौप्य पदक जिंकलं. ६० गुणांच्या अंतिम सामन्यात ढिल्लनने ५१ गुण मिळवले. या स्पर्धेत भारत एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांसह पहिल्या स्थानावर आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरून महाविस्तार एआय हे ॲप डाऊनलोड करावं आणि त्यामधल्या विविध सुविधांचा लाभ घ्यावा, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. या ॲपमध्ये शेतकऱ्यांसाठी पीकनिहाय सल्ला, सर्व पिकांची मानक कार्यपद्धती, हवामानानुसार शेती सल्ला, यासह अन्य माहिती घेता येईल.

****

राज्यभरात सध्या पडत असलेल्या वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर महावितरणने यंत्रणेसाठी हाय अलर्ट जाहीर केला आहे. महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी आज राज्यातल्या वीजपुरवठ्याचा आढावा घेतला. नैसर्गिक आपत्तीमुळे खंडित झालेला वीजपुरवठा तातडीने सुरू करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावं, एखाद्या ठिकाणी दुरुस्ती कामाला वेळ लागणार असेल तर त्याबाबत संबंधित ग्राहकांना ताबडतोब कळवण्यात यावं, आदी सूचना त्यांनी केल्या.

****

राज्यभरात अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात दुपारपासून पावसाची संततधार सुरु आहे. नांदेड जिल्ह्यात आज दुपारी मध्यम स्वरूपाच्या पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

दरम्यान, हवामान विभागाने नांदेड आणि लातूर जिल्ह्यासाठी उद्या २४ मे रोजी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असं आवाहन नांदेडचे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केलं आहे.

****

No comments: