Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 24 May 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ मे २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा
परिषदेत दहशतवादावरुन पाकिस्तानवर कठोर शब्दात टीका केली आहे. भारत गेल्या अनेक दशकांपासून
सीमेपलीकडून होणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांना तोंड देत असल्याचं संयुक्त
राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पी.
हरीश यांनी म्हटलं आहे. सशस्त्र संघर्षांमध्ये
नागरिकांच्या संरक्षणावरील खुल्या चर्चेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं.
पाकिस्ताननं दहशतवादाला प्रोत्साहन
देण्यासाठी वारंवार नागरिकांचा ढाल म्हणून वापर केला, ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या
गेलेल्या कुख्यात दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानातील वरिष्ठ सरकारी, पोलिस आणि लष्करी अधिकारी उपस्थित
असल्याचं जगानंही पाहिलं असून पाकिस्तानी सैन्यानं या महिन्याच्या सुरुवातीला जाणूनबुजून
भारतीय सीमावर्ती गावांना लक्ष्य केलं होतं, असंही पी. हरिश यांनी म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली
इथं नीति आयोगाच्या दहाव्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवतील. 'विकसित भारतासाठी विकसित राज्ये २०४७' अशी या वर्षीच्या बैठकीची संकल्पना
आहे. याच विषयावर या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीला राज्यांचे मुख्यमंत्री आणि
केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल, केंद्रीय मंत्री आणि
नीती आयोगाचे उपाध्यक्ष, सदस्य आणि मुख्य कार्यकारी
अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
****
पंतप्रधान आदिवासी न्याय महामोहिमेअंतर्गत
राज्यातल्या काही अत्यंत दुर्गम आदिवासी भागात ३८ नव्या अंगणवाडी केंद्रांना मंजुरी
मिळाली आहे. वंचित भागातील मुलं आणि गर्भवती
महिलांसाठी पोषण आणि आरोग्यसेवेची उपलब्धता वाढवणं हे या उपक्रमाचं उद्दिष्ट असल्याची
माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे
यांनी दिली तसंच, राज्यात अती दुर्गम भागातही
पोषण आहार पुरवला जाणार असल्याचंही त्यांनी
सांगितलं.
****
भारतीय सैन्यातील शहिद झालेले जवान
संदिप गायकर यांचं पार्थिव आज अहिल्यानगर जिल्ह्याच्या ब्राम्हनवाडा या गावी आणण्यात आलं. जम्मु-काश्मिरमध्ये किश्तवाडच्या चतरु भागात दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत
संदिप गायकर यांना वीर मरण आलं होतं.
****
महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसांच्या
कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात अकोला बांधकाम विभाग परिमंडळानं संपूर्ण राज्यात प्रथम
क्रमांक पटकावला आहे. भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे
या योजनेचं मूल्यमापन करण्यात आलं. अकोल्यातल्या
सार्वजनिक बांधकाम मंडळानं नाविन्यपूर्ण, प्रभावी उपाययोजना राबवल्या. यामध्ये स्मार्ट बजेट सिस्टममध्ये
अर्थसंकल्पीय कामाचे नियोजन, मागील ३० वर्षांतील सर्व
अभिलेखांचं डिजिटायलेझन आणि जुन्या कालबाह्य नोंदणी नष्ट करून उर्वरित अभिलेख सुरक्षितरित्या
संग्रहित करणं आदी महत्वपुर्ण कामांचा समावेश आहे.
****
पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांची
तिनशेवी जयंती राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या निमित्तानं नाशिक, पुणे आणि नागपूर इथं विशेष सांस्कृतिक
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. उद्यापासून ३१ मे दरम्यान हे कार्यक्रम होणार
असल्याची माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली. दरम्यान, जालना शहरात उभारण्यात येणाऱ्या अहिल्यादेवी
होळकर यांचा स्मारकाच्या ठिकाणाची पाहणी काल
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केली.
****
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीकोनातून
महिला, मुलं आणि ज्येष्ठ नागरीक यांच्या
सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्याची सूचना विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी केली.
कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विविध विषयांबाबत काल आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.
****
येत्या दोन दिवसांत केरळमध्ये मान्सून सक्रीय होण्यास अनुकुल परिस्थीती असल्याचं भारतीय हवामानशास्त्र
विभागातर्फे सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आज मराठवाड्यासह, विदर्भ-कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील नांदेडसह
लातूर आणि विदर्भातील बुलडाणा, मध्य महाराष्ट्रातील
पुणे तसंच कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट-वादळी वाऱ्यांसह हलका
ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
****
दरम्यान, रायगड -रायगड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून
मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे
सखल भागात पाणीच पाणी झाले आहे. जिल्ह्यातले
जनजीवन विस्कळीत झाले असून आज आणि उद्या देखील रायगडला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला
आहे.
****
दीव-दमणच्या दीवमध्ये घोघला समुद्र
किनाऱ्यावर सुरू असलेल्या खेलो इंडिया बीच स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी कालही
चमकदार कामगिरी केली. मुंबईच्या वैभव काळेनं पारंपरिक पेंचक सिलट प्रकारात सुवर्ण पदक
जिंकलं. कबड्डीमध्ये महाराष्ट्राच्या दोन्ही संघांना कास्य पदकावर समाधान मानावं
लागलं. या स्पर्धेत पाच सुवर्ण, चार रौप्य, आणि नऊ कास्य अशी १८ पदकं जिंकून
राज्याचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत, आज पंजाब किंग्जचा सामना दिल्ली कॅपिटल्स
बरोबर जयपूर इथं होणार आहे. हा सामना आज सायंकाळी
साडेसात वाजता खेळवला जाईल. दोन्हीही संघ प्ले-ऑफच्या लढतीसाठी याआधीच अपात्र ठरले
आहेत, हा सामना आज केवळ औपचारिक असणार आहे.
दरम्यान, लखनऊ इथं काल रात्री झालेल्या सामन्यात
सनरायझर्स हैद्राबादनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर ४२ धावांनी विजय मिळवला.
****
No comments:
Post a Comment