Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 26 May 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ मे २०२५ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील
दाहोद इथं रेल्वेच्या रोलिंग स्टॉक वर्कशॉपचं लोकार्पण केलं. तसंच याठिकाणी उत्पादित
पहिल्या इलेक्ट्रिक इंजिनाला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केलं. हे इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह
ताशी १२० किलोमीटर वेगानं आणि ९००० हॉर्सपॉवर क्षमतेनं चालतं. इंजिनमध्ये वातानुकूलित
व्यवस्थेसह चालकासाठी सुविधा करण्यात आल्या आहेत. सुरक्षितता वाढविण्यासाठी आणि अपघात
टाळण्यासाठी या इंजिनमध्ये प्रगत यंत्रणा आहे. आत्मनिर्भर भारत संकल्पनेला चालना देत
या कारखान्यात स्वदेशी बनावटीची यंत्रसामग्री बसवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या हस्ते दाहोद,
भूज आणि गांधीनगर इथं ८२ हजार कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन
आणि पायाभरणी करण्यात येत आहे.
तत्पूर्वी, ऑपरेशन
सिंदूरनंतर प्रथमच गुजरात दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांचं वडोदरा इथं नागरिकांनी तिरंगा
ध्वज फडकावत जल्लोषात स्वागत केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या
कार्यकालाची ११ वर्षे पूर्ण केली. २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची
शपथ घेतली होती. आघाडी सरकारांच्या काळात तब्बल ३० वर्षानंतर भारतीय जनता पक्षाला स्पष्ट
बहुमत मिळालं होतं.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नागपूर
मधल्या जामठा इथं राष्ट्रीय कर्करोग संस्थेत राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाचे नेते आबाजी थत्ते यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली
वाहिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर
बावनकुळे उपस्थित होते. त्यानंतर याह यांनी संस्थेची पाहणी केली. याठिकाणी शाह यांच्या
हस्ते स्वस्ती निवासचं या कर्क रुग्णांसाठी असलेल्या रहिवाशी सुविधेचं भूमिपूजन झालं.
यानंतर अमित शहा नांदेडला रवाना होणार असून याठिकाणी ते जाहीर सभा घेणार आहेत. उद्या
शहा दक्षिण मुंबईतल्या माधवबाग लक्ष्मीनारायण मंदिराच्या दीडशेव्या वर्धापनदिन महोत्सवाला
उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून काल रात्री त्यांचं नागपूरमध्ये
आगमन झालं.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळातर्फे जून-जुलै २०२५ मध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या
पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालं आहे. इयत्ता बारावीची लेखी परीक्षा २४ जून ते
१६ जुलै तर दहावीची परीक्षा २४ जून ते ८ जुलै या कालावधीत घेतली जाणार आहे. राज्य मंडळाच्या
संकेतस्थळावर परीक्षेचे विषय निहाय वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक
आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी अकरावीच्या ऑनलाईन
प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरूवात झाली. प्रवेशासाठी अंतिम अर्ज तीन जून पर्यंत भरता
येणार आहे. विद्यार्थी कमीतकमी एक आणि जास्तीतजास्त १० महाविद्यालयांच्या नावाचा पसंतीक्रम
देऊ शकतात. तात्पुरती गुणवत्ता यादी पाच जूनला प्रसिद्ध केली जाईल. काही आक्षेप असल्यास
विद्यार्थी सहा आणि सात जूनला तक्रार निवारण पोर्टलवर तक्रार दाखल करू शकतात. अंतिम
गुणवत्ता यादी आठ जून रोजी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती संचालनालयानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे
दिली आहे.
****
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या
विविध विद्याशाखांच्या ११२ शिक्षणक्रमांच्या परीक्षांना उद्यापासून सुरूवात होत आहे.
राज्यभराल्या ५८० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून चार लाख २५ हजार २०८ विद्यार्थी
ही परीक्षा देणार आहेत. यात १२१ जेष्ठ नागरिक आणि राज्यातल्या विविध तुरुंगातील ३ हजार
१६ कैद्यांचा समावेश आहे. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या
परीक्षेमुळे विद्यापीठाची १ जून ची पूर्वघोषित परीक्षा रद्द करून ती पुढे नियोजित करण्यात
आली आहे. ही परीक्षा १७ जून पर्यंत चालणार आहे.
****
राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असून
प्रशासनाने सतर्क राहून मदत कार्य करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
प्रशासनाला दिले आहेत. शिंदे यांनी ठाणे जिल्हा तसेच अधिक पाऊस पडत असलेल्या जिल्ह्यांच्या
परिस्थितीचा आढावा घेतला,
तसंच आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पावसामुळे
जनजीवन विस्कळीत होऊ नये,
कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी
प्रशासनाने वेळेवर आणि प्रभावीपणे कार्य करावे असे निर्देश त्यांनी दिले. या परिस्थितीवर
शासनाचे लक्ष असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाययोजना राबवण्यात येत असल्याचं
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.
दरम्यान, मुंबई आणि कोकणातील बहुतांश
ठिकाणी पाऊस सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड इथं सर्वाधिक २११ पूर्णांक २५ मिलीमीटर
पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरातही आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. विजांच्या
कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. सकाळी साडेआठ ते साडेदहा या दोन तासांत नवी मुंबईत
३४ पूर्णांक ८५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
****
No comments:
Post a Comment