Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 25 March 2019
Time 7.10 AM to
7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ मार्च २०१९ सकाळी ७.१० मि.
****
§
पहिल्या टप्प्यातल्या
लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन पत्र दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस; विदर्भातल्या सात मतदारसंघाचा समावेश
§ कॉंग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी आणि शिवसेना- भाजप महायुतीच्या प्रचाराचा बिगुल
वाजला; महाआघाडीची कराडमध्ये सभा तर युतीचं कोल्हापूरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन
§ हिंगोलीतून काँग्रेसची सुभाष वानखेडेंना,
भंडारा- गोंदियातून राष्ट्रवादी काँग्रेसची नाना पंचबुद्धे ,तर भाजपची सुनिल मेंढे
आणि साताऱ्यातून शिवसेनेची माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना उमेदवारी.
आणि
§ औरंगाबादमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार लोकसभा निवडणूक
लढण्यास तयार असतील तर माघार घेण्याची आमदार सुभाष झांबड यांची तयारी
****
पहिल्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन
पत्र दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पहिल्या टप्प्यात २० राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसह ९१ मतदारसंघात ११ एप्रिलला मतदान होणार आहे. या पहिल्या
टप्प्यात राज्यातल्या वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर,
चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात
उद्या अर्जांची छाननी होईल तर येत्या गुरुवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.
शेवटचा दिवस असल्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार आज आपले उमेदवारी अर्ज
दाखल करतील.
****
राज्यात काल कॉंग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी आणि शिवसेना - भारतीय जनता पक्ष महायुतीनं लोकसभा
निवडणुकीसाठीच्या प्रचाराला सुरूवात केली. कॉंग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीनं सातारा जिल्ह्यात कराड
इथून तर शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीनं कोल्हापूरमधून ही सुरूवात केली. कराड इथं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ
झालेल्या सभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते
पृथ्वीराज चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी, रिपब्लिकन पार्टी
ऑफ इंडियाचे जोगेंद्र कवाडे यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. पवार
आणि चव्हाण यांनी यावेळी आपल्या भाषणातून केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी
धोरणावर जोरदार टीका केली.
कोल्हापूरमध्ये झालेल्या शिवसेना
- भारती जनता पक्ष युतीच्या प्रचार सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना
पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह घटक पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय
मंत्री रामदास आठवले, रासपचे मंत्री महादेव जानकर, सदाभाऊ
खोत उपस्थित होते. या सभेत बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकिस्तानवर
केलेल्या हल्ल्याबाबत शंका घेतल्याबद्दल काँग्रेस पक्षावर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे
अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही त्यांनी यावेळी टीका केली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव
ठाकरे यांनीही पवार यांच्या राजवटीत राज्य उद्ध्वस्त झाल्याची टीका केली. मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करण्यात आलेल्या या जिल्ह्यात कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही
मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आहेत.
****
काँग्रेस पक्षानं लोकसभेसाठीच्या
आणखी दहा उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये राज्यातल्या चंद्रपूर मतदार संघातला काँग्रेसचा
उमेदवार बदलण्यात आला असून आता शिवसेनेतून काँग्रेसमध्ये दाखल झालेले आमदार सुरेश धानोरकर
यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी या मतदार संघातून विनायक बांगडे यांना उमेदवारी
देण्यात आली होती. अकोला मतदार संघातून हिदायत पटेल, रामटेकमधून किशोर गजभिये यांना
उमेदवारी देण्यात आली आहे.
हिंगोली मतदार संघातून माजी खासदार सुभाष वानखेडे
यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वानखेडे यापूर्वी दोनवेळा याच मतदार संघातून शिवसेनेच्या
तिकिटावर निवडून आलेले आहेत. अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर
२०१४ च्या लोकसभा
निवडणुकीत मोदी लाटेतही काँग्रेसचा विजय साकारणारे विद्यमान खासदार राजीव सातव यांनी
निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर हिंगोली लोकसभा मतदारसंघात प्रचंड संभ्रमाचे वातावरण
पसरले होते. शिवसेनेचे माजी खासदार तथा भाजप नेते आणि मागील निवडणुकीत काँग्रेसकडून
पराभूत झालेले सुभाष वानखेडे यांनाच काँग्रेसकडून आश्चर्यकारकरित्या उमेदवारी घोषित
झाले. मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये यामुळे गोंधळाचे वातावरण पसरले आहेत. शिवसेनेचे
आमदार हेमंत पाटील, काँग्रेसकडून सुभाष वानखेडे आणि वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोड
अशी तिरंगी लढत येथे रंगणार आहे. कालपर्यंत एकमेकांच्या विरोधात लढणाऱ्यांना आता एकमेकांना
अलिंगन द्यावे लागणार आहे.
आकाशवणी बातम्यांसाठी, रमेश कदम,
हिंगोली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं राज्यातल्या भंडारा-गोंदिया
मतदारसंघातून नाना पंचबुध्दे यांना उमेदवारी दिली आहे.
****
भारतीय जनता पक्षानं
आतापर्यंत लोकसभेसाठी ३०६ उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या
टप्प्यात मतदान होणाऱ्या सर्व मतदार संघांचा समावेश आहे. पक्षानं नऊ लोकसभा मतदारसंघांची यादी घोषित केली असून यात राज्यातल्या
भंडारा - गोंदिया मतदार संघातून सुनील बाबूराव मेंढे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
सातारा लोकसभा मतदार संघातून शिवसेनेनं
नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आहे, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी काल
शिवसेनेत प्रवेश केला, त्यानंतर लगेचच त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं
जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
औरंगाबादचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांना लोकसभा निवडणूक
लढवण्यासाठी बंडखोरी करण्याची गरज नाही. औरंगाबादेतून लढण्याची त्यांची खरंच इच्छा असेल, तर आपण माघार
घ्यायला तयार असल्याचं कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार
आमदार सुभाष झांबड यांनी काल जाहीर केलं. पक्षानं
त्यांनाही जालना आणि औरंगाबाद या दोन्ही मतदारसंघातून
उमेदवारी देऊ केली होती, पण त्यांनी ती नाकारली. मग आता बंडखोरी कशासाठी, असा सवालही त्यांनी माध्यमांशी बोलतांना केला.
दरम्यान, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसनं
सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे इच्छुक उमेदवार
आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी आघाडीचा धर्म पाळणार
असल्याचं जाहीर केलं आहे. शहरातल्या राष्ट्रवादी भवन या पक्ष कार्यालयात काल जिल्हाभरातून
आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली.
****
लोकसभेच्या निवडणुकीसाठी बीड लोकसभा मतदार संघात
भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांमध्ये
लढत होणार आहे. मराठवाड्यातल्या या मतदारसंघाकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागून
आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे
या दोघा बहिण भावांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. अधिक माहिती देत आहेत
आमचे वार्ताहर –
बीड लोकसभा
मतदार संघाचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालं असून, या मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी
काँग्रेस अशी सरळ लढत होत आहे. भाजपनं विद्यमान खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांना पुन्हा
उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीने यानिवडणूकीत बजरंग सोनवणेच्या रूपाने नवीन उमेदवार दिला आहे. बीड लोकसभेत वंचित लोकसभा
आघाडीच्या वतीने प्राध्यापक रवी जाधव कैकाडी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर मागील
चार दिवसात केवळ एक अपक्ष उमेदवारी अर्ज या लोकसभा मतदार संघात दाखल झाला आहे.
आकाशवाणी बातम्यासाठी शशी केवडकर, बीड
****
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आता चौरंगी लढत पाहायला
मिळण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा मुलगा
सुवेंद्र गांधी यांनी लोकसभा निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्णय काल जाहीर केला. खासदार गांधी यांनी बोलावलेल्या कार्यकर्त्यांच्या
मेळाव्यात सुवेंद्र यांनी ही घोषणा केली. भाजपनं डॉ. सुजय विखे, राष्ट्रवादी काँग्रेसनं आमदार
संग्राम जगताप, बहुजन वंचित आघाडीनं सुधाकर आव्हाड यांना उमेदवारी दिली आहे. अधिक माहिती
देत आहेत, आमचे वार्ताहर
काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा अहमदनगर येथे
नुकताच पार पडला. खासदार दिलीप गांधीचाही मेळावा झाला. त्यामूळे लोकसभेच्या निवडणुकीचे
जोरात पडघंम सुरू झाले आहेत. काँग्रेसच्या
मेळाव्यात बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्व कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचं
आवाहन केलं. तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण
विखे पाटील यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली. काँग्रेसच्या वतीने सर्वांना निरोप देण्यात
आले होते. असं थोरात यांनी सांगितलं. त्यामुळे आता राजकीय उलथापालथ मोठ्या प्रमाणावर
होत आहे.
आकाशवाणी बातम्यासाठी, मनोज सातपूते, अहमदनगर.
****
सांगलीचे काँग्रेस पक्षाचे नेते, माजी केंद्रीय मंत्री
प्रतीक पाटील यांनी आपण काँग्रेस पक्ष सोडल्याचं काल जाहीर केलं. सांगली इथं काल झालेल्या
कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. काँग्रेसनं सांगली लोकसभा मतदारसंघातून
स्वाभिमानी शेतकरी संघटनेला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्यानं, नाराज झालेल्या पाटील
यांनी हा निर्णय घेतला.
*****
***
No comments:
Post a Comment