Tuesday, 26 March 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 26.03.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

२६  मार्च २०१९ सकाळी ११.०० वाजता

****



 लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात नामांकन दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या टप्प्यात १३ राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशातल्या ९७ मतदारसंघात १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यात राज्यातल्या नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, लातूर, बुलडाणा, अकोला, अमरावती आणि सोलापूर या दहा मतदारसंघाचा समावेश आहे. उद्या नामांकन अर्जांची छाननी होईल तर २९ मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येतील.

****



 लोकसभा निवडणुकी दरम्यान पैशांच्या अवैध व्यवहारावर नजर ठेवण्यासाठी निवडणूक आयोग विशेष निरिक्षकांची संख्या वाढवणार आहे. देशभरात यादृष्टीनं संवेदनशील असे एकशे वीस मतदारसंघ आहेत. आयोगानं मागच्या आठवड्यात महाराष्ट्र आणि तामीळनाडूसाठी दोन विशेष निरिक्षक नेमले असून, असं होण्याची ही देशाच्या निवडणूक इतिहासातली पहिलीच वेळ आहे.

****



 लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी राज्यात 3 लाख शाईच्या बाटल्या लागणार असून त्यांचं वाटप संबधित जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे. या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातल्या 48 मतदार संघांमध्ये पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

****



 काँग्रेस पक्षानं लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली. यात दीव-दमण, गोवा आणि छत्तीसगडमधल्या एकूण पाच जागांचा समावेश आहे. यात उत्तर गोव्यासाठी गिरीश चोडणकर तर दक्षिण गोव्यासाठी फ्रांसिस्को सारदिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.





 दरम्यान, काँग्रेस पक्षानं, भिवंडी लोकसभा मतदार संघातून जाहीर केलेल्या उमेदवारीबाबत फेरविचार करावा, अशी मागणी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. अल्पसंख्याक मतदारांची संख्या लक्षणीय असलेल्या भिवंडीतून काँग्रेसनं माजी खासदार सुरेश टावरे यांना उमेदवारी दिली आहे. टावरे हे पक्षविरोधी कारवायांमध्ये लिप्त असल्याचा आरोप करत, उमेदवारीचा फेरविचार न केल्यास, महापालिकेतल्या पदांचा राजीनामा देण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

 ****



 मराठवाड्यात काल अनेक भागात पावसानं हजेरी लावली. लातूर, नांदेड, हिंगोली, आणि बीड, जिल्ह्याच्या काही भागात काल अवकाळी पाऊस झाला.



 लातूर जिल्ह्यात रेणापूर परिसरात पाऊस पडला, यामुळे लातूर आणि परिसरात वातावरणात बदल होऊन थंडावा निर्माण झाला होता.



 नांदेड शहरात मध्यरात्री 12 ते साडे बारा या वेळात अर्धा तास पाऊस झाला. या पावसामुळे शहराच्या अनेक भागातला विद्युत पुरवठा खंडीत झाला.



 हिंगोली शहरासह औंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी, आखाडा बाळापूर, पोत्रा, आडगाव रंजे या गावांमध्येही काल पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. अनेक गावांमध्ये हळद काढणी तसंच हळद शिजवण्याचं काम सुरू आहे. हळद भिजू नये म्हणून ती झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

 दरम्यान, औंढा नागनाथ तालुक्यात दुघाळा इथले शेतकरी, बबन संतोबा पोले यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. काल रात्री दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. महसूल विभागानं तत्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले. याबाबतचा अहवाल महसूल यंत्रणेला कळवण्यात आला आहे.



 सातारा तालुक्यातल्या लिंब आणि आजूबाजूच्या परिसरात, तसंच कोल्हापूर शहर आणि परिसरात पावसासह गारपीट झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

****



 छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले. रायपूरहून सुमारे पाचशे किलोमीटर अंतरावर, बस्तर विभागात असलेल्या कारकनगुंडा गावाजवळच्या जंगलात, आज पहाटेच्या सुमारास ही चकमक झाली. या ठिकाणाहून अत्याधुनिक शस्त्रास्त्रं पोलिसांनी हस्तगत केली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात नक्षलविरोधी अभियान राबवलं जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली.

****



 भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रो येत्या १ एप्रिल मिसॅट या रडार यंत्रणेवर नियंत्रण ठेवणाऱ्या उपग्रहासह २९ उपग्रहांचं प्रक्षेपण करणार आहे. इतर २९ उपग्रहांमध्ये स्पेन, स्वित्झरलँड आणि अमेरिकेच्या उपग्रहांचा समावेश आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून उपग्रह प्रक्षेपण वाहक, पीएसएलव्ही-सी 45 च्या सहाय्यानं हे उपग्रह प्रक्षेपित होणार आहेत.

****



         अजलन शाह चषक हॉकी स्पर्धेच्या साखळी सामन्यांमधे आज भारताचा सामना मलेशियाशी होणार आहे.

*****

***

No comments: