Saturday, 1 August 2020

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 01.08.2020 18.00

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 August 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ ऑगस्ट २०२० सायंकाळी ६.००

****

§   साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं मुंबईत स्मारक उभारणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

§  औरंगाबादमधे कोरोना विषाणुचे ७२ नवे रुग्ण, तीन रुग्णांचा मृत्यू

§  खासदार अमरसिंह यांचं निधन

आणि

§  शेतकऱ्यांना `डिजीटल आठ अ` चा उतारा आता `ऑनलाईन` मिळणार

*****

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं मुंबईत लवकरच स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबई विद्यापीठानं अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या समारंभ समारोप सत्रात ते आज बोलत होते. अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून जनजागृती केली आणि आगामी पिढ्यांनाही त्यांच्या लेखनातून प्रेरणा मिळेल, त्यांचं समग्र साहित्य एकत्र उपलब्ध व्हावं, असं ते म्हणाले. त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून लोक धैर्य जागृत केलं, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचं योगदान अविस्मरणीय असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमुद केलं.

****

 

महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रात अढळ स्थान असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात यावा यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचं,विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं.नागपूर इथं दीक्षाभूमी परिसरात अण्णाभाऊ साठे जन्म शताब्दी वर्षाच्या सांगता समारोहात ते आज बोलत होते. यावेळी पटोले यांनी   अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोना विषाणुचे ७१ नवे रुग्ण आढळून आले.सकाळी ६९ तर दुपारच्या सत्रात दोन नवे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातल्या रुग्णांची संख्या १४ हजार १९४ झाली असून सध्या तीन हजार ५२४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोना विषाणु बाधित तीन पुरुष रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. यामधे वाळूजच्या बजाजनगर मधील ४५ वर्षीय, रांजणगावमधील ६५ वर्षीय आणि सिल्क मील कॉलनीतील ४९ वर्षीय रुग्णाचा समावेश आहे.

****

नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणुचे रूग्ण शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. आज अर्धापूर तालुक्या लहान या गावात या मोहिमे अंतर्गत ५० वर्षे वयावरील व्यक्तींची तपासणी करण्यात आली. या कामात जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका सहभागी झाले आहेत.

****

अमरावती जिल्ह्यात कोरोना विषाणुचे नवे १४ रुग्ण आज आढळले. जिल्ह्यातल्या रुग्णांची संख्या दोन हजार एकशे एकाहत्तर झाली आहे. जिल्ह्यात काल रात्री तीन रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. मृतांची एकूण संख्या आता ६१ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ५१३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून सध्या ५३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

 

धुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणुचे तीन हजार २१२ रुग्ण आढळले आहेत. शहरातल्या प्रतिबंधित क्षेत्रात निर्जंतुकीकरण फवारणी करणाऱ्या महापालिकेच्या सहा कर्मचाऱ्यांना याची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर शहरातलं फवारणीचं काम बंद   करण्यात आलं आहे. धुळे जिल्ह्यात या विषाणू संसर्गामुळे १०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

****

पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोना विषाणुचे २८१ नवे रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांची संख्या १५ हजार तीनशे एकोणसाठ झाली आहे. जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात ३८१ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत.

****

राज्यसभेचे सदस्य खासदार अमरसिंह यांचं आज सिंगापूर इथं निधन झालं. ते ६४ वर्षांचे होते. मूत्र पिंडाच्या विकारामुळे त्यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून सिंगापूर इथल्या रुग्णालयात उपचार सुरु होते. ते चार वेळा राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त झाले होते. त्यांचा पार्थीव देह दिल्लीला आणला जाणार असल्याचं वृत्त आहे.

****

औरंगाबादमधे केंब्रिज चौकात भारतीय जनता पक्षातर्फे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, तसंच विविध मागण्यांसाठी राज्य सरकार विरोधात `महाएल्गार` आणि `रस्ता बंद` आंदोलन आज करण्यात आलं. पक्षाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी आंदोलकांचं नेतृत्त्व केलं. आमदार अतुल सावे आणि शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांच्या नेतृत्वाखाली शहरात जिल्हा दुध उत्पादक संघाच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी यावेळी विविध मागण्यांचे फलक हातात घेवून राज्य सरकार विरोधी घोषणा दिल्या.

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव ओमप्रकाश चितळकर यांच्या नेतृत्वात आज जालन्यात गरजुंना दुध वाटप करून लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं.

****

परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी दुध दरवाढीसाठी भाजप महायुतीनं आंदोलन केलं. परभणी इथं उड्डाणपुलावर `रस्ता बंद` आंदोलन करण्यात आलं. दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य करा अन्यथा मंत्रालयावर मोर्चा काढू, असा इशारा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या राहता तालुक्यात दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी विखे पाटील यांच्या नेतृत्वा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी अहमद नगर-मनमाड मार्गावर रस्ता बंद आंदोलन केलं, त्यावेळी ते बोलत होते.

****

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्तानं रत्नागिरीत आज त्यांच्या जन्मस्थानी अभिवादन कार्यक्रम झाला. हे स्थान भारतीय पुरातत्त्व संरक्षण खात्यातर्फे राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्यात आलं असून घराच्या आवारात उभारण्यात आलेल्या मेघडंबरीसह पूर्णाकृती पुतळ्याला जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पुष्पाजंली अर्पण केली. अहमदनगर इथंही लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं.  ३१ मे १९१६ रोजी लोकमान्य टिळकांनी  अहमदनगर इथं एका सभेमधे `स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे` असं म्हणत स्वराज्याची संकल्पना मांडली होती, त्या आवारात लोकमान्यांचं स्मरण करण्यात आलं. औरंगाबाद इथं बलवंत वाचनालय शताब्दी महोत्सव आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त वाचनालयाच्या दर्शनी भागावर लोकमान्य टिळकांचंवं चित्र आज बसवण्यात आलं.

****

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यात वर्गसंघर्ष, जातिअंताचा लढा याचं चित्रण प्रभावीपणे केलं असल्याचं प्रतिपादन साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी केलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि राजर्षी शाहू महाराज अध्यासन केंद्राच्या वतीनं जन्मशताब्दी सांगता समारंभाच्या ऑनलाईन व्याख्यानमालेत ते आज बोलत होते. डॉ. मुकुंद राजपंखे यांचं व्याख्यान यावेळी झालं. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते.

****

परभणी इथं जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. लातूर जिल्ह्यात औसा इथं आमदार अभिमन्यू पवार यांनी आपल्या निवासस्थानी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती तसंच लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पांजली अर्पण केली.

****

राज्यात आज महसूल दिन साजरा केला जात आहे. या अनुषंगानं आजपासून शेती व्यवहारातील आवश्यक 'डिजिटल आठ अ' चा उतारा आता ऑनलाईन देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेचा महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते दूरदुश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून शुभारंभ करण्यात आला. नांदेड शहरातल्या तहसील कार्यालय परिसरात आज महसुल दिनानिमित्त घनवन आनंदवन प्रकल्पाचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सामाजिक वनीकरण तसंच वृक्षमित्र फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं ४००० वृक्षांची लागवड करण्यात आली.

****

औरंगाबाद आणि नांदेड इथल्या दोन मद्य निर्मीती उद्योगांनी कथितरित्या सुमारे १०८ कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर बुडवल्याची माहिती समोर आली आहे. वस्तू आणि सेवा कर गुप्तचर महासंचालनालयाच्या नागपूर विभागीय कार्यालयानं याची माहिती दिली आहे. गेल्या २८ आणि २९ तारखेला या दोन्ही मद्य निर्मीतीं उद्योगांवर धाड टाकून तपासणी करण्यात आली. त्यावेळी हे समोर आलं असल्याचं या कार्यालयानं स्पष्ट केलं आहे.       

****

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतला तांदुळ खुल्या बाजारात वळवल्याच्या आरोपावरून नवी मुंबईत तीघांना अटक करण्यात आली आहे. सोलापूर इथून चार कंटेनरमधे  सुमारे हा तांदुळ आणला गेला होता आणि पळसफे इथं एका गोदामामधे ठेवल्यानंतर खुल्या बाजारात विकण्यात आला होता. त्यावरून ही अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तेहतीस लाख आठ हजार रुपये किमतीचा एकशे दहा टन तांदुळही या कारवाईत जप्त करण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. 

****

बुलडाणा जिल्हयातल्या संग्रामपुचे तहसीलदार समाधान राठोड यांना शेतीची वाटणी करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे. तालुक्यातल्या आलेवाडी इथल्या नागरिकांनी या संदर्भातली तक्रार केली होती. जळगाव जामोदच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे या संदर्भात अहवाल सादर केल्यानंतर अमरावती विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी तहसीलदार राठोड यांच्या निलंबनाचे निर्देश दिले आहेत.

//**********//

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 03 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...