Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 02 August 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२
ऑगस्ट
२०२० सकाळी ७.१० मि.
****
· सूक्ष्म, लघु
आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या पत हमी योजनेच्या व्याप्तीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
· दुधाला प्रति लीटर ३० रुपये भाव देण्यासह विविध मागण्यांसाठी
भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांचं राज्यभर
आंदोलन
·
राज्यात आणखी नऊ हजार ६०१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची
नोंद, उपचारादरम्यान ३२२ रुग्णांचा मृत्यू
· औरंगाबादमध्ये सात, बीड आणि लातूरमध्ये प्रत्येकी पाच, उस्मानाबाद
आणि परभणीमध्ये प्रत्येकी तीन, नांदेड आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्णांचं
निधन तर हिंगोलीत आठ नवे रुग्ण
आणि
· औरंगाबाद आणि नांदेडच्या दोन मद्य कंपन्यांनी १०८ कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर बुडवल्याचं उघडकीस
****
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या पत हमी योजनेच्या व्याप्तीत
सरकारनं वाढ केली आहे. आता २५० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या उद्योगांसह
डॉक्टर, वकील, सनदी लेखापाल या व्यावसायिकांनाही व्यवसाय वृद्धीसाठी
या योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
यांनी याबाबत काल माहिती दिली. आपत्कालीन
कर्ज योजनेत हमी योजनेअंतर्गत पात्र अर्जदारांना वैयक्तिक
कर्ज दिलं जाईल, असं त्यांनी सांगितलं. या
कर्जाची कमाल मर्यादाही पाच कोटी रुपयांवरून दहा कोटी रुपये करण्यात आल्याची माहिती
अर्थमंत्र्यांनी दिली. या कर्ज योजनेचा
अधिकाधिक कंपन्यांना लाभ व्हावा म्हणून २९ फेब्रुवारीपर्यंत कर्ज थकबाकीची मर्यादा
२५ कोटी रूपयांवरून ५० कोटी रूपये करण्यात आली आहे. कोविड प्रादुर्भावातून सावरण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या सुमारे २१ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा
भाग असलेली ही योजना येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत लागू असेल.
****
दुधाला प्रति लीटर ३० रुपये भाव
देण्यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय जनता पक्ष, मित्रपक्ष आणि विविध संघटनांतर्फे काल राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात
आलं. औरंगाबाद इथं जालना रस्त्यावर केंब्रिज चौकात भाजपचे ज्येष्ठ
नेते हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. तर आमदार अतुल सावे आणि शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांच्या नेतृत्वात जिल्हा
दूध उत्पादक संघाच्या कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. दूध
उत्पादकांना प्रति लिटर दहा रुपये अनुदान द्यावं, दूध
भुकटीला पन्नास रुपये अनुदान द्यावं या मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात वाळूज इथं आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
वैजापूर तालुक्यातल्या लाडगाव इथंही आंदोलन करण्यात आलं.
जालना इथं राष्ट्रीय समाज पक्षाचे
प्रदेश सचिव ओमप्रकाश चितळकर यांच्या नेतृत्वात गरजुंना दूध वाटप करून आंदोलन
करण्यात आलं. परभणी इथं उड्डाणपुलावर रस्ता रोको
आंदोलन करण्यात आलं. जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजपनं रास्तारोको आंदोलन
केलं.
बीड जिल्ह्यात कडा इथं माजी मंत्री सुरेश धस यांच्या नेतृत्त्वाखाली
आंदोलन करण्यात आलं. बीड शहरात शिवसंग्राम
संघटनेनं महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत गरजुंना दुधाचं वाटप केलं. दूध दराबाबत शासनानं आपली भूमिका बदलली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी
देण्यात आला.
उस्मानाबाद इथं भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या
नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन झालं.
नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर
तालुक्यातल्या सोनारी फाटा इथं भाजपनं `रस्ता रोको` आंदोलन केलं.
अहमदनगर जिल्ह्यातल्या
राहता तालुक्यात अहमदनगर-मनमाड मार्गावर दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी आमदार राधाकृष्ण
विखे पाटील यांच्या नेतृत्वात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रस्ता रोको
आंदोलन केलं. मागण्या मान्य न केल्यास, मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा विखे पाटील यांनी यावेळी दिला.
****
राज्यात काल आणखी नऊ हजार ६०१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची
नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या चार लाख
३१ हजार ७१९ झाली आहे. काल ३२२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत १५ हजार ३१६ रुग्णांचा
मृत्यू झाला आहे. तर काल दहा हजार ७२५ रुग्णांना बरे झाल्यानं
रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यात आतापर्यंत दोन लाख ६६
हजार ८८३ रुग्ण बरे झाले असून, सध्या एक लाख ४९ हजार २१४ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत २१ लाख ९४ हजार ९४३ चाचण्या
करण्यात आल्या.
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल सात कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू
झाला. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत ४७८
रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल आणखी २०४
रुग्ण आढळले. शहरात काल दोन हजार ६४२ अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या.
त्यापैकी ५१ जणांचा अहवाल बाधित असा आला. त्यामुळे
जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या १४ हजार ३२७ झाली आहे. तर काल ४०९
रुग्णांना बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. औरंगाबाद
जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार ६०१ रुग्ण बरे झाले असून, सध्या
तीन हजार २४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
बीड जिल्ह्यात काल आणखी पाच कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू
झाला. जिल्ह्यात आतापर्यंत या आजारानं ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काल आणखी ८३ रुग्णांची
नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ८६७ झाली असून, ४२८ रुग्ण बरे झाले
आहेत.
****
लातूर जिल्ह्यात काल पाच कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातली एकूण मृत्यूंची संख्या १०० झाली आहे. तर
काल आणखी १८८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यापैकी
६९ जण अँटिजेन चाचणीतून बाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण
रुग्णसंख्या दोन हजार ३११ झाली आहे. त्यापैकी एक हजार २८४ रुग्ण
बरे झाले असून, सध्या ९२७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा
मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत या आजारानं ५७ जणांचा मृत्यू
झाला आहे. तर काल आणखी १२७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले.
त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या एक हजार २९० झाली आहे.
त्यापैकी ५१६ रुग्ण बरे झाले असून, सध्या ७१७ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
परभणी जिल्ह्यात काल तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू
झाला. जिल्ह्यात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं ३३
जणांचा मृत्यू झाला आहे. तर काल आणखी ५४ रुग्णांची भर पडली.
यामध्ये अँटिजेन चाचणीत ३४ जण बाधित आढळले. जिल्ह्यातली
एकूण रुग्णसंख्या ६७६ झाली आहे. त्यापैकी ३९२ रुग्ण बरे झाले
असून, सध्या २५१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू
झाला. जिल्ह्यात या आजारानं आतापर्यंत ८३ रुग्णांचा
मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात काल आणखी १४७ कोरोना विषाणू
बाधित रुग्णांची नोंद झाली. यामध्ये आरटीपीसीआर
चाचणीत ९६ तर अँटिजेन चाचणीत ५१ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली
एकूण रुग्णसंख्या एक हजार ९८६ झाली आहे. त्यापैकी ९३५ रुग्ण बरे
झाले असून, सध्या ९७५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
जालना जिल्ह्यात काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू
झाला. जिल्ह्यात या आजारानं आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू
झाला आहे. तर काल ८२ नव्या रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या दोन हजार २६९ इतकी झाली आहे. काल ५२ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. जालना जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ५०६ रुग्ण बरे झाले असून, सध्या ६९१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात काल आठ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ६६२ झाली आहे. काल १५ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. जिल्ह्यात आतापर्यंत ४५० रुग्ण बरे झाले असून, सध्या
२०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मुंबईत काल आणखी एक हजार ५९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ४५ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात काल एक हजार
५०६ नवे रुग्ण आणि २३ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात काल
६०३ रुग्ण आढळले, तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यात ३९१, पालघर २८१, नागपूर २७०, धुळे २१२, सातारा २०२,
सांगली १५६, बुलडाणा ८०, अमरावती ७१, तर वाशिम जिल्ह्यात काल आणखी आठ कोरोना विषाणू
बाधित रुग्णांची नोंद झाली.
****
औरंगाबाद आणि
नांदेड इथल्या दोन मद्य कंपन्यांनी कथितरित्या सुमारे १०८ कोटी रुपयांचा वस्तू आणि
सेवा कर बुडवल्याची माहिती समोर आली आहे. वस्तू आणि सेवा
कर गुप्तचर महासंचालनालयाच्या नागपूर विभागीय कार्यालयानं याची माहिती दिली आहे.
गेल्या २८ आणि २९ तारखेला या दोन्ही कंपन्यांवर धाड टाकून तपासणी करण्यात
आली. त्यावेळी हे समोर आलं असल्याचं या कार्यालयानं स्पष्ट केलं
आहे.
****
लोकमान्य टिळक स्मृतीशताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
जन्मशताब्दी निमित्तानं काल राज्यभरात त्यांना अभिवादन करण्यात आलं.
राज्य शासनाचा
उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, मुंबई विद्यापीठ आणि
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं घेण्यात आलेल्या
ऑनलाईन कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी
अण्णाभाऊ साठे यांचं मुंबईत लवकरच स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा केली.
****
औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि राजर्षी शाहू महाराज अध्यासन
केंद्राच्या वतीनं जन्मशताब्दी सांगता समारंभाच्या ऑनलाईन व्याख्यानमालेत काल साहित्यिक
डॉ. ॠषिकेश कांबळे यांचं व्याख्यान झालं. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यात वर्गसंघर्ष, जातिअंताचा
लढा याचं चित्रण प्रभावीपणे केलं असल्याचं ते यावेळी म्हणाले.
परभणी इथं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. महापौर अनिता सोनकांबळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास
पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
पूर्णा तालुक्यातल्या खुजडा इथं यानिमित्त जनकल्याण सामाजिक
आणि विकास संस्थेच्या वतीनं गरजू व्यक्तींना अन्नधान्य वाटप आणि वृक्षारोपण करण्यात
आलं.
लातूर जिल्ह्यात औसा इथं आमदार अभिमन्यू पवार यांनी आपल्या
निवासस्थानी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती तसंच लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त
पुष्पांजली अर्पण केली.
****
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्तानं
रत्नागिरीत काल त्यांच्या जन्मस्थानी अभिवादन कार्यक्रम झाला. हे स्थान भारतीय पुरातत्त्व संरक्षण खात्यातर्फे राष्ट्रीय स्मारक म्हणून
जतन करण्यात आलं असून, घराच्या आवारात उभारण्यात आलेल्या
मेघडंबरीसह पूर्णाकृती पुतळ्याला जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी
पुष्पाजंली अर्पण केली.
अहमदनगर इथंही लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण
करुन अभिवादन करण्यात आलं. औरंगाबाद इथं बलवंत वाचनालय शताब्दी
महोत्सव आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त वाचनालयाच्या दर्शनी भागावर लोकमान्य
टिळकांच्या नव्या भित्तीचित्राचं अनावरण करण्यात आलं.
****
महसूल दिन काल राज्यात साजरा झाला. यानिमित्तानं कालपासून शेती व्यवहारातल्या आवश्यक 'डिजिटल
आठ अ' चा उतारा आता ऑनलाईन देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात
आली आहे. या सुविधेचा महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते
दूरदुश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून शुभारंभ झाला. यावेळी
केलेल्या भाषणात थोरात म्हणाले...
महसूल दिनाचं औचित्य साधून ‘आठ अ’ आपल्या
सर्वांना विना सायस उपलब्ध होणार आहेत. ई – फेरफार लाही आपण जास्तीत जास्त चांगलं स्वरुप
आणि सहजता देण्याचा प्रयत्न करतो आहोत गावाचा नकाशा बनवण्याचे काम करतो आहे ते सुद्धा
प्रगतीपथावर आहे.
नांदेड तहसील कार्यालय परिसरात काल महसूल दिनानिमित्त घनवन आनंदवन
प्रकल्पाचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांच्या हस्ते झालं. यावेळी सामाजिक वनीकरण
तसंच वृक्षमित्र फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं चार हजार वृक्षांची
लागवड करण्यात आली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातली आरोग्य व्यवस्था रुळावर आणण्यासाठी तातडीनं
आरोग्य क्षेत्रातला वरिष्ठ अधिकारी नेमण्याची मागणी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यात कोविड-१९ चा वेगानं प्रसार होत असून त्याला तोंड देण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ आणि
यंत्र सामुग्री नसल्यानं आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडली असल्याचं पाटील यांनी म्हटलं
आहे. जिल्ह्यातली वैद्यकीय व्यवस्था अपुरी असल्यानं आणि वैद्यकीय
महाविद्यालय नसल्यानं पुढील काळात नागरिकांना गंभीर परिस्थितीला सामोरं जावं लागेल
याबाबत आपण आरोग्य मंत्र्यांना अवगत केल्याचं ते म्हणाले.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड मधल्या
शिवना टाकळी धरणाचे तीन दरवाजे काल वीस सेंटी मीटरनं उघडण्यात
आले. धरणातून १८००
घन फूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
धरणात सध्या ९८ टक्के पाणीसाठा असून कन्नड आणि परिसरात परवा
जोरदार पाऊस झाल्यानं धरणात पाण्याची आवक सुरुच असल्याची माहिती विभाग
अभियंता पुरुषोत्तम कडवे यांनी दिली. शिवना नदीकाठच्या टाकळी,
लव्हाळी, बोरसर खूर्द, बोरसर
बुद्रुक, शेवता, लामणगाव, झोलेगाव, लाखणी, मांडकी,
सनव, देवकी, वैरागड,
लासुर या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
औरंगाबाद
शहरालगत असलेल्या हर्सूल - जटवाडा तलावात सध्या पाण्याचा ओघ सुरु असल्यानं तो केंव्हाही
ओसांडून वाहू शकतो. त्यामुळे बिस्मिल्ला कॉलनी, दिलरस कॉलनी, हिलाल कॉलनी, आरेफ कॉलनी,
बेगमपुरा, बारापुल्ला दरवाजा या मार्गांवर
नदीच्या काठावरच्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा महापालिकेनं
दिला आहे.
दरम्यान, औरंगाबाद शहर आणि परिसरात
मागील दोन दिवसांपासून रात्री पाऊस होत आहे. त्यामुळे छोट्या
- मोठ्या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत तर तलाव ओसंडून वाहत आहेत.
शहरानजिक सुखना धरणाजवळ नदीप्रवाहात अडकलेल्या ७० बकऱ्या अग्निशमन दलाच्या
जवानांनी काल बाहेर काढल्याची माहिती अधिकारी आर. के.
सुरे यांनी दिली.
दरम्यान राज्यात
बीड, लातूर, उस्मानाबादसह अनेक जिल्ह्यात पुढचे तीन दिवस जोरदार पावसाची
शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. औरंगाबाद, जालना, नांदेड, हिंगोली, परभणीसह
अनेक जिल्ह्यात पाच ऑगस्टपर्यंत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
****
जालना इथल्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षा शारदा टोपे यांचं काल दीर्घ आजारानं मुंबईत निधन झालं, त्या ७४ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर गेल्या महिनाभरापासून बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पार्थिवावर आज अंबड तालुक्यातल्या अंकुशनगर महाकाळा इथल्या साखर कारखान्याच्या परिसरात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या नियमाचं पालन करून मर्यादित लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
परभणी महानगरपालिकेनं घरपट्टी आणि नळपट्टी शास्ती भरण्यासाठीची
मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. महानगरपालिकेनं टाळेबंदीच्या
पार्श्वभूमीवर घरपट्टीच्या शास्तीत ५० टक्के तर नळपट्टीच्या शास्तीत १०० टक्के सूट
दिली असून, याआधी ही शास्ती भरण्याची मुदत ३१ जुलै ही होती.
//**************//
No comments:
Post a Comment