Friday, 21 August 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.08.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 August 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ ऑगस्ट २०२० सकाळी ७.१० मि.

****

·      केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात राज्याला १७ पुरस्कार, मध्यप्रदेशातील इंदूर सलग चौथ्यावर्षी प्रथम, गुजरात मधील सूरत दुसऱ्या तर नवी मुंबई तिसऱ्या स्थानावर, दहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या गटात औरंगाबाद २६व्या स्थानावर.

·      शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असं सुरु करण्यासाठी केंद्राशी विचारविनिमय करण्याची मुख्यमंत्र्यांची शिक्षण विभागाला सूचना.

·      पाच महिन्याच्या खंडानंतर राज्यात राज्य परिवहन महामंडळाची आंतरजिल्हा बससेवा सुरु.

·      सततच्या पावसामुळे मराठवाड्यात मूग आणि कापसाच्या पिकांचं मोठं नुकसान.

·      डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्राचं विद्यापीठात रूपांतर करण्यासंदर्भात सात सदस्यांचा अभ्यासगट.

·      राज्यात १४ हजार ४९२ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, ३२६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू.

आणि

·      मराठवाड्यात ७२ बाधितांचा मृत्यू, तर नव्या एक हजार १८३ रुग्णांची नोंद.

****

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२० पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत. केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी काल नवी दिल्लीत दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या पुरस्कारांची घोषणा केली. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. नागरी स्वच्छता अभियानातल्या १२ राष्ट्रीय पुरस्कारांपैकी सर्वाधिक चार पुरस्कारांसह अन्य १३ असे एकूण १७ पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत. मोठ्या राज्यांच्या मानांकनात महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळाला आहे. देशातल्या सर्वाधिक स्वच्छ शहर श्रेणीमध्ये तृतीय क्रमांकाचा पुरस्कार नवी मुंबई शहराला मिळाला आहे. या श्रेणी प्रथम पुरस्कार इंदूर शहराला तर द्वितीय पुरस्कार सुरत शहराला मिळाला आहे.

एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहर श्रेणीमध्ये प्रथम पुरस्कार कराड, द्वितीय सासवड तर तृतीय क्रमांक लोणावळा शहरानं मिळविला आहे. पश्चिम विभाग श्रेणीमधील २५ हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये पन्हाळा शहराला, शाश्वत स्वच्छता शहर म्हणून जेजुरी तर स्वच्छतेकामी नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या अकोले शहराला पुरस्कार मिळाला आहे.

२५ ते ५० हजार या दरम्यान लोकसंख्येच्या श्रेणीतील शिर्डीला स्वच्छ शहर म्हणून तर स्वच्छतेकामी नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या विटा शहराला पुरस्कार मिळाला आहे.  शाश्वत स्वच्छता ठेवणाऱ्या श्रेणीमध्ये इंदापूरला पुरस्कार मिळाला आहे. नागरिकांनी दिलेल्या उत्कृष्ट प्रतिसाद या श्रेणीत हिंगोली तर गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणाऱ्या शेगाव शहराला आणि स्वच्छ शहर म्हणून रत्नागिरीला सन्मानित करण्यात आलं आहे.

एक ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या क्रमवारीत जालना २२ व्या, उदगीर ५५ व्या, नांदेड साठ, परभणी ७०, बीड ११०, तर लातूर शहर एकशे सदोतिसाव्या स्थानावर आहे.

दहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या क्रमवारीत औरंगाबाद शहर देशात सव्वीसाव्या क्रमांकावर आलं आहे. नाशिक महापालिकेचा यंदा देशात अकरावा तर राज्यात दुसरा क्रमांक आला आहे. या यादीत ठाणे चौदाव्या, पुणे पंधराव्या, नागपूर १८, कल्याण-डोंबिवली २२ तर पिंपरी चिंचवड २४ व्या क्रमांकावर आहे.

****

सध्याचा काळ पाहता जानेवारी ते डिसेंबर असं शैक्षणिक वर्ष सुरु करता येईल का, त्याबाबत केंद्राशी विचारविनिमय करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाला केली आहे. मुख्यमंत्र्यांनी काल केंद्राने नुकत्याच घोषित केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणासंदर्भात माहिती जाणून घेतली, त्यावेळी ते बोलत होते. शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्यात सर्व विभागांतल्या शिक्षण तज्ञांचा आणि अभ्यासकांचा समावेश असलेली समिती नेमून या धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात व्यवस्थित विचार विनिमय करावा, असे निर्देश त्यांनी दिले. या धोरणात अनेक संकल्पना असून, त्यादृष्टीने राज्य सरकारला कायद्यातही अनेक बदल करावे लागतील, त्यामुळे या धोरणाचा अभ्यास आवश्यक असल्याचं ते म्हणाले. या धोरणामुळे राज्यातल्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने लाभ आणि एकूणच शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडू शकतील का ते पाहण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

****

कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेला तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेची मुदत ३१ जुलै रोजी संपली होती, मात्र आता ही योजना ३१ ऑक्टोबरपर्यंत चालू राहणार आहे.

****

मुस्लिम धर्मीयांनी मुहर्रमच्या परंपरेचं साधेपणानं पालन करावं, असं राज्य शासनानं म्हटलं आहे. यासंदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात आलं असून, यंदा कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुहर्रमच्या मातमी मिरवणुका काढण्यास परवानगी नसल्याचं, या पत्रकात म्हटलं आहे. टाळेबंदीच्या काळात इतर धार्मिक कार्यक्रम ज्याप्रमाणे घरात राहून पाळले गेले, त्याप्रमाणे मुहर्रमचा शोकही घरातच राहून करावा, असं या पत्रात म्हटलं आहे.

****

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआयचं पथक काल मुंबईत दाखल झालं. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला होता, त्यानुसार हे पथक आता सर्व पुरावे आणि यासंबंधीच्या इतर दाखल गुन्ह्यांचीही तपासणी करणार आहे. १४ जूनला सुशांतचा मृतदेह त्याच्या खोलीत आढळला होता. 

****

चालू शैक्षणिक वर्षाकरीता सध्या सुरु असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधल्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी काल ही माहिती दिली. ऑनलाईन प्रवेशाची मुदत आज संपणार होती.

**

पाच महिन्याच्या खंडानंतर राज्यात काल पासून राज्य परिवहन महामंडळ - एसटीची आंतरजिल्हा बससेवा पुन्हा सुरु झाली.

परभणी बसस्थानकावर काल अनेक दिवसानंतर औरंगाबाद, बीड, लातूरकडे जाणारी बस उभी असल्याची उद्घोषणा ऐकायला मिळाली. काल दिवसभरात ३५ बस सोडण्यात आल्या.

लातूर जिल्ह्यातल्या पाच डेपोमधून बससेवेला प्रारंभ झाला असून, लातूर लगतच्या उस्मानाबाद, नांदेड, सोलापूर या भागात बस सेवा सुरू झाली. पुणे, औरंगाबाद याठिकाणी बस सेवा सुरू करण्यासाठी सोमवार पासून प्रयत्न केले जाणार असून ज्या जिल्ह्यांमध्ये जाताना टाळेबंदीचा अडथळा आहे, अशा जिल्ह्यात सेवा सुरू केली जाणार नसल्याचं विभाग नियंत्रकांनी सांगितलं.

औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यातही सर्व नियमांचं पालन करुन बससेवा सुरु झाली.

****

मराठवाड्यात सततच्या पावसामुळे मूग तसंच कापसाच्या पिकाचं मोठं नुकसान होत आहे. जालना जिल्ह्यात काल सकाळपासून पावसाची संततधार सुरूच आहे. जिल्ह्यात सततच्या पावसामुळे बहुतांश भागात शेतांमध्ये पाणी साचल्यामुळं पिकांचं नुकसान होत आहे. शेतात उभ्या मुगाच्या शेंगांना कोंब फुटत असून, काही भागात कापूस पीकही करपत आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १११ टक्के पाऊस झाला आहे.

परभणी जिल्ह्यातही काढणीला आलेल्या मूग पिकांचं नुकसान होत आहे. मानवत तालुक्यात अनेक भागात मूग काढणीला मजूर मिळत नसल्याने काही ठिकाणी मुगांना अंकुर फुटले आहेत. रिमझिम पावसामुळे कापसाचं पिक पिवळं पडत असल्यानं शेतकरी चिंतेत पडला आहे.

पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी राज्य सरकार आणि कृषी विभागाला केली आहे.

नांदेड जिल्ह्यातही सततच्या पावसामुळे पिकांच नुकसान होत असल्याचं आमच्य वार्ताहरानं कळवलं आहे. 

दरम्यान, ईसापूर धरणातून पैनगंगा नदीत पाणी सोडण्यात येत असल्यामुळे नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातल्या पैनगंगा नदीला पूर आला आहे. धानोरा पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे राज्य महामार्ग बंद झाला असून, विदर्भाचा संपर्क तुटला आहे.

परभणी जिल्ह्यातल्या येलदरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याचं काल या धरणाच्या दहा दरवाजातून १९ हजार ६२९ पूर्णांक ९७ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

दरम्यान, पालम तालुक्यातल्या दिग्रस उच्च पातळी बंधाऱ्याचाही एक दरवाजा उघडण्यात आला असून, त्यातून पाच दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात येत आहे. 

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद इथल्या उपकेंद्राचं विद्यापीठात रूपांतर करता येईल का, यासाठी एक अभ्यासगट म्हणून सात सदस्यांची समिती गठीत करण्यात येईल, असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संगितलं. मुंबईत काल यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ते उस्मानाबाद जिल्ह्याचं अंतर अधिक असून, भौगोलिक दृष्टीने विचार करून विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी उस्मानाबाद उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करावे अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. गठीत केलेल्या समितीनं विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या अडचणी काय आहेत, याचा अभ्यास करून तीन महिन्यांत आपला अहवाल शासनाकडे सादर करावा, अशा सूचनाही सामंत यांनी केली.

****

राज्यात काल १४ हजार ४९२ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या सहा लाख ४३ हजार ३८९ झाली आहे. एका दिवसात रुग्ण सापडण्याचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. काल ३२६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत २१ हजार ३५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल १२ हजार २४३ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत चार लाख ५९ हजार १२४ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ६२ हजार ४९१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

****

मराठवाड्यात काल ७२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या एक हजार १८३ रुग्णांची नोंद झाली.

औरंगाबाद जिल्ह्यात काल ११ रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी ३२७ रुग्णांची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात दहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या १५३ रुग्णांची भर पडली. लातूर जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू झाला, तर आणखी १२४ रुग्ण आढळले. परभणी जिल्ह्यात काल चार जणांचा मृत्यू झाला, तर नव्या ८१ रुग्णांची भर पडली. जालना जिल्ह्यात काल दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी ३८ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर नव्या ११५ रुग्णांची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यातही काल एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर आणखी ३७ रुग्ण आढळले. तर बीड जिल्ह्यात काल आणखी ३०८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.  

****

मुंबईत काल आणखी एक हजार २७५ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ४६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात काल तीन हजार ५४४ नवे रुग्ण आणि ७१ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात ९०३ रुग्ण आढळले, तर १७ जणांचा मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यात एक हजार ४८३, नागपूर ९८९, रायगड ५३५, पालघर ३४८, सांगली ३४०, सातारा ३३७, अमरावती ९४, अहमदनगर ५७, वाशिम २०, तर गडचिरोली जिल्ह्यात काल आणखी दहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. 

****

कोरोना विषाणूबाधित रूग्णांची संख्या वाढल्याने बीड जिल्ह्यातल्या सहा मुख्य शहरातील व्यावसायिक, विक्रेते, व्यापाऱ्यांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या चाचण्या करण्यात आल्या. विक्रेते, व्यापारी आणि नागरीकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

दरम्यान, जिल्ह्यात घरोघरी जाऊन गणेशमूर्ती विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. गणेशोत्सवाला उद्यापासून प्रारंभ होत आहे, मात्र जिल्ह्यात आज मध्यरात्रीपर्यंत टाळेबंदी असल्यानं, हा निर्णय घेण्यात आला आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या सर्व आस्थापना आणि अत्यावश्यक सेवा सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कालपासून हा नवा आदेश लागू झाला. ज्या आस्थापना आणि दुकानं सुरू ठेवण्यास परवानगी दिली नाही त्या बंदच राहतील, असं जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी स्पष्ट केलं आहे.

****

जालना इथल्या विशेष कोविड रुग्णालयात जेष्ठ नागरिक असलेल्या एका वयोवृध्द महिलेनं कोरोना विषाणू संसर्गावर यशस्वी मात केली आहे. १०७ वर्षांच्या या आजीबाईंना दहा दिवसांच्या उपचारानंतर जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना पाटील यांच्या उपस्थितीत काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

****

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या गाडीवाट इथल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना क्रमिक अभ्यासासोबतच जपानी भाषा शिकवली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ही मुलं जपानी भाषा शिकत असल्याचं या प्राथमिक शाळेचे शिक्षक दादासाहेब नवपुते यांनी सांगितलं. ते म्हणाले –

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाडीवाट या शाळेवर ‘Learn Foreign Language’ या उपक्रमाअंतर्गत मुलांना कुठलीतरी एक foreign ची language शिकवण्याविषयीचा प्रस्ताव दिला होता. त्यात मुलांनी विचार करून जपानीज भाषा शिकू या असं ठरवलं. आणि मग ती कशी शिकायची तर तंत्रज्ञानाचा वापर करून शिकू यात. मग सुरूवातीला android mobile वर ‘Learn Japanies App’ शोधून काढलं. त्यावरून ते शिकले. तिथे जपानी शिकविणारे व्हिडिओ होते. त्या व्हिडिओचा वापर करून शिकायला लागले. मग ही धडपड सुनील जोगदळकर औरंगाबादचे आहेत त्यांच्या कानावर गेली. ते जपानीज्‌ चे टीचर आहेत. आणि मग आता दोन महिन्यापासून जापनीज् भाषेचं शिक्षण मुलांना देतायेत. ‘Google Meet’ या ॲपवरून ऑनलाईन संध्याकाळी सात ते साडे आठ या वेळेत.

****

उस्मानाबादचे नवे जिल्हाधिकारी म्हणून कौस्तुभ दिवेगावकर यांची काल नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते पुण्यात भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक म्हणून कार्यरत होते. डॉक्टर कुणाल खेमनार यांची पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.

****

राज्यातल्या कोरडवाहू भागामध्ये ओवा या पिकाच्या क्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी आणि यातील निर्यातीच्या संधीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटांच्या माध्यमातून या पिकाची लागवड करणं गरजेचं असल्याचं परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.अशोक ढवण यांनी म्हटलं आहे. राज्यस्तरीय ऑनलाईन ओवा पीक लागवड तंत्रज्ञान कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते काल बोलत होते. 

****

हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव पोलीस ठाण्यात एका कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानं सर्व अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांना शासकीय विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं आहे. पुढचे काही दिवस पोलिस ठाणे बंद राहणार असून या ठाण्याचा अतिरिक्त कारभार नर्सी नामदेव पोलीस ठाण्यातून चालणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...