Friday, 21 August 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.08.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२१ ऑगस्ट २०२० सकाळी ११.०० वाजता

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोना विषाणू बाधा झालेले नवीन ११७ रुग्ण आढळले. यामध्ये ग्रामीण भागातले ५२ तर महानगरपालिका हद्दीतील ६५ रुग्ण आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणू बधित रुग्णांची एकूण संख्या १९ हजार ८५१ एवढी झाली आहे.

****

सांगली जिल्ह्यातले सहकारी चळवळीतील अभ्यासू नेते विलासराव पाटील मांगलेकर यांचं आज निधन झाले. मोरणा सहकारी दूध संघाची स्थापना करून मांगलेकर यांनी ग्रामीण दूध उत्पादक शेतकऱ्यांना भरीव आधार उपलब्ध करून दिला. वारणा दूध संघाचे संचालक आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं.

****

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रायगड पोलिसांनी महामार्गावर सुरक्षा व्यवस्था चोख केली आहे. १६ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून महामार्गावर ९ मदत केंद्रं, ९ रूग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.

****

ईसापूर धरणातला जलसाठा काल सायंकाळी सहा वाजेपर्यंत ८२ टक्क्यांवर पोहोचला. सात वर्षांच्या खंडानंतर धरणात प्रथमच समाधानकारक जलसाठा झाला असून, धरण पहिल्यांदाच ओसंडून वाहण्याच्या मार्गावर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

दरम्यान, येलदरी धरणातूनही सध्या सुमारे २० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे

****

हिंगोली जिल्ह्यात अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, मदती पासून एकही शेतकरी वंचित राहू नये अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० तारखेला आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ६८ वा भाग असेल.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 12 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...